महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
पर्यावरण रक्षणासाठी वनसंवर्धन आवश्यक - सुधीर मुनगंटीवार सोमवार, १० जून, २०१९

नाशिक : पर्यावरण रक्षणासाठी वनसंवर्धन आवश्यक असून त्यासाठी 33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाला वन आंदोलन आणि वृक्ष सत्याग्रहाचे स्वरुप लोकसहभागातून येणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

म.वि.प्र. संस्थेच्या वाणिज्य, व्यवस्थापन आणि संशोधन महाविद्यालयात 33 कोटी वृक्ष लागवडीसंदर्भात आयोजित विभागीय बैठकीत ते बोलत होते. बैठकीस वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, विभागीय आयुक्त राजाराम माने, महापौर रंजना भानसी, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक टी.के. चौबे, विशेष पोलीस महानिरीक्षक छेरींग दोरजे, मुख्य वनसंरक्षक विजय शेळके, ए.के.कळसकर, पोपटराव पवार आदी उपस्थित होते.

श्री.मुनगंटीवार म्हणाले, वृक्ष संवर्धनासाठी पुढील दहा वर्षाचे नियोजन करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने वृक्ष लावण्याच्या मानसिकतेचे बिजारोपण होण्यासाठी जनजागृतीवर भर देण्यात यावा. रोजगार हमी योजना, कृषी विभागाच्या योजना, शहरातील वृक्ष लागवडीचे नियोजन अशा विविध घटकांवरही लक्ष देण्यात यावे.

रानमळा पद्धत, कन्या वन समृद्धी योजना हे उपक्रम याच प्रयत्नांचा भाग असून त्याबाबत जनतेला अधिकाधीक माहिती देण्यात यावी. वृक्ष संवर्धन हा सहज, सरल आणि स्थायी भाव होणे गरजेचे आहे. वृक्ष लागवड उपक्रमापुरती मर्यादित न राहता या उपक्रमात हरितसेनेच्या माध्यमातून जाणिवेने  काम करणाऱ्या पर्यावरणप्रेमींचा सहभाग वाढविण्याचा प्रयत्न करावा.

वन विभागातर्फे वृक्ष संवर्धनासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. 12 हजार 665 गावात संयुक्त वनसमित्यांची स्थापना करण्यात आली आहे. हरितसेनेच्या माध्यमातून एक कोटी स्वयंसेवकांची नोंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे. वृक्ष लागवडीची सांगड आणि आर्थिक आणि सामाजिक विकासाशी घालून त्याला लोकचळवळीचे रुप देण्याचा प्रयत्न असून जनतेने यात मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. लावलेले वृक्ष जगविण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याची सुचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली. समाजातील सर्व घटकांनी  वृक्षारोपण उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन श्री.मुनगंटीवार यांनी केले.

श्री.खारगे म्हणाले, वृक्ष लागवडीच्या कामात पारदर्शकता असावी यासाठी संकेतस्थळावर लावलेल्या रोपांची माहिती अपलोड करण्यात यावी. कन्या समृद्धी योजनेचा अधिक प्रसार करण्याचे काम जिल्हा परिषदेमार्फत करण्यात यावे. वृक्ष संवर्धनाच्या कामात सातत्य राखून लावलेली झाडे जगविण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून विविध विभागांच्या आढावा बैठकीत शेवटची काही मिनिटे वृक्ष संवर्धनाबाबत चर्चा करण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.

विभागीय आयुक्त माने यांनी 33 कोटी वृक्ष लागवड उपक्रमांतर्गत विभागातील पूर्वतयारीची माहिती दिली. नाशिक विभागात 1 जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीत 5 कोटी 82  लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून 6 कोटी 85 रोपे उपलब्ध आहेत. 5 कोटी 4 लक्ष खड्डे खोदण्यात आले आहे. हरितसेनेअंतर्गत 7 लाख 95 हजार नोंदणी करण्यात आली असल्याचे ते म्हणाले.

श्री.पवार यांनी मधमाशा आकर्षित करणाऱ्या आणि पक्ष्यांच्या अधिवासासाठी उपयुक्त प्रजातीची झाडे लावण्याचे आवाहन केले.

धुळे ‍जिल्ह्यात स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने वन विभागाच्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्यात रोटरी क्लब आणि जैन इरिगेशनच्या माध्यमातून त्रिपक्षीय कराराद्वारे वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील कोठली खुर्द गावात सघन वृक्ष लागवड करण्यात येणार असून 22 गावात स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने वृक्ष लागवड होणार आहे. नाशिक जिल्ह्यात देवराईच्या माध्यमातून वृक्षारोपणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि अहमदनगर जिल्ह्यात वृक्ष लागवडीसाठी साखर कारखान्यांची मदत घेण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या सादरीकरणात देण्यात आली.

नाशिक जिल्ह्यात राष्ट्रीय एकात्मता उद्यानाच्या माध्यमातून देशातील सर्व राज्यांच्या वृक्षांची माहिती देण्यात येईल. तर नवग्रह उद्यान, फळ उद्यान, नक्षत्र उद्यान आणि औषधी वनस्पती उद्यान असे अभिनव उपक्रम राबविण्याचा प्रयत्न असल्याचे यावेळी सांगण्यात आले. रेशीम शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी नाशिक, अहमदनगर आणि जळगाव जिल्ह्यात 10 लाख तुतीची झाडे लावण्यात येणार असल्याची माहितीदेखील यावेळी देण्यात आली.

बैठकीत विभागातील जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महापालिका आयुक्त यांनी वृक्ष लागवडीबाबत सादरीकरण केले. यावेळी मंत्री महोदयांनी सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा आणि कृषी विभागाने केलेल्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. बैठकीला विविध विभागाचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. वनमंत्री श्री.मुनगंटीवार यांच्या हस्ते महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

Share बातमी छापा