महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
सर्वांनी सक्रिय सहभाग घेऊन उद्दिष्ट पूर्ण करावे - वनमंत्री सुधीर मुनगंटीवार सोमवार, ०३ जून, २०१९


  • पुणे विभागाला ५ कोटी ४७ लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट
  • आमदारांच्या अध्यक्षतेखाली विधानसभानिहाय समित्या स्थापन करुन मोहीम व्यापक करणार

पुणे : पुणे विभागाचे वृक्ष जगविण्याचे प्रमाण ८६ टक्के ही समाधानाची बाब आहे. यार्षीचे उद्दिष्ट निश्चित पूर्ण होईल. तथापि, वृक्षलागवड ही लोक चळवळ बनावी, अशी अपेक्षा आढावा बैठकीत केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आमदारांच्या अध्यक्षतेखाली विधानसभानिहाय समित्या स्थापन करून ही मोहीम अधिक व्यापक करणार असल्याचे सांगितले.

३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम राबविण्याच्या अनुषंगाने पुणे विभागाची आज आढावा बैठक वित्त व नियोजन आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीला पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख, साताऱ्याचे पालकमंत्री विजय शिवतारे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते, खासदार अमर साबळे, आमदार दत्तात्रय भरणे, प्रशांत परिचारक, राहुल कुल, आमदार मेधा कुलकर्णी, वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, विभागातील जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, मनपा आयुक्त व विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

पत्रकारांशी बोलताना श्री.मुनगंटीवार म्हणाले, पुणे विभागात १०.७८ टक्के वनक्षेत्र आहे. १ जुलै २०१६ पासून वृक्ष लागवडीची मोहीम सुरू केली. त्यावेळी २ कोटीचे उद्दिष्ट होते, पण २.८३ कोटी वृक्ष लागवड करण्यात आली. पहिल्याच वर्षी लोकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. आता आपण ३३ कोटीच्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचलो आहे. ही मोहीम ९० दिवसाची असणार आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, या जिल्ह्यांना दिलेले उद्दिष्ट निश्चितच पूर्ण करतील. जिल्हांतर्गत, ग्रामपंचायत, सामाजिक वनीकरण विविध विभागांना उद्दिष्ट देण्यात आले आहे. २०९ नर्सरींमध्ये रोपे तयार करण्यात आली आहेत.

वनविभागातर्फे हरित सेना हा उपक्रम राबविण्यात येत असून याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. १ कोटी उद्दिष्टांपैकी आतापर्यंत ६१ लाख लोकांनी सदस्यत्व स्वीकारले आहे. पुणे विभागाला २८ लक्ष ६६ हजाराचे उद्दिष्ट देण्यात आले असून ११ लक्ष ९० हजार ६६६ लोकांनी आतापर्यंत सदस्यत्व स्वीकारले आहे.

वृक्ष लागवडीची मोहिम अधिक व्यापक होण्याच्या दृष्टीने आमदारांच्या अध्यक्षतेखाली विधानसभानिहाय समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. ग्रीन व्हिलेज, ग्रीन आर्मी, ग्रीन स्कूल असे उपक्रम राबवित असल्याचे अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले असल्याचे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले, राष्ट्रीय महामार्ग किंवा अन्य प्रकल्पांसाठी वृक्ष तोडली जातात. परंतु त्या प्रमाणात लावण्याची जबाबदारी देखील निश्चित केली आहे. मात्र जी यंत्रणा त्याकडे दुर्लक्ष करेल, त्यावर दंड व शिक्षा करण्याचा निर्णय शासन घेणार आहे.


ही मोहीम आता चळवळ बनली आहे. देशात महाराष्ट्राने प्रथम क्रमांक पटकविला असून बहुउपयोगी वनस्पती म्हणून पाहिल्या जाणाऱ्या बांबू लागवडीकडे सुध्दा वनविभागाने लक्ष दिले आहे. यासाठी तर मागच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने १२९० कोटींची तरतूद केली होती. बांबू व्यवसाय पासून रोजगार तर मिळतोच, पण ठिकठिकाणी प्रशिक्षण केंद्र सुरु केले आहे. बांबूची नर्सरी तयार करण्याबाबत विद्यापीठांना निर्देश देण्यात आले आहेत. हरित महाराष्ट्र या उपक्रमात सामाजिक संस्थांनी विशेष सहभाग नोंदविला आहे. उद्योजकांनी यासाठी विशेष योगदान दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात ज्या भागात वनसंपदा अधिक प्रमाणात आहे. त्याठिकाणी पावसाचे प्रमाण चांगले असल्याचे दिसते. सिंधूदुर्ग, रत्नागिरीच्या तुलनेत लातूर, उस्मानाबाद या भागात जंगलाचे प्रमाण कमी असल्यामुळे या ठिकाणी पाण्याची टंचाई भासते. उत्तम पर्यावरणासाठी वृक्षाचे प्रमाण वाढवणे काळाची गरज आहे. जेणेकरुन पावसाचे प्रमाण वाढून पाणी टंचाई भासणार नाही.

वनसंपदेचे महत्त्व विशद करताना, ‘वन है तो जल है, जल है तो कल है’ असे सांगून श्री.मुनगंटीवार म्हणाले, मनुष्याच्या उत्तम भविष्यासाठी वनसंपदा वाढविणे गरजेचे आहे. वृक्ष लागवडीचे महत्त्व ओळखून या अभियानात सर्वांनी स्वत: सहभागी होऊन इतरांनाही यात सहभागी होण्यासाठी प्रेरित करावे. तसेच वृक्ष लावण्याच्या मानसिकतेचे बिजारोपण करायला हवे. वनविभागाचे काम चांगल्या प्रकारे करणाऱ्या जिल्ह्याला निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे सांगून ते म्हणाले, हे अभियान राबविण्यासाठी पुणे विभागाने उत्तम नियोजन केले आहे.

बैठकीत प्रधान सचिव विकास खारगे म्हणाले, राज्य शासनाने सन २०१७ ते २०१९ या तीन वर्षात ५० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. यावर्षी १ जुलै ते ३० सप्टेंबर २०१९ या तीन महिन्यात ३३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट ठरविण्यात आले आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी यात सहभागी व्हावे,असे आवाहन त्यांनी केले.

प्रारंभी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पुणे विभागाच्या ५ कोटी ४७ लाख ५१ हजार वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्यात आले असल्याचे सांगून या अभियांनांतर्गत प्रगतीची माहिती दिली. पुणे विभागातील पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर व सांगलीचे जिल्हाधिकारी अनुक्रमे नवल किशोर राम, श्वेता सिंघल, डॉ. राजेंद्र भोसले, दौलत देसाई, अभिजीत बांगर, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक यांनी या अभियाना अंतर्गत झालेल्या व नियोजित कामाची माहिती दिली.
Share बातमी छापा