महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
विहिरी खोल व गाळ काढणे कामे त्वरीत पूर्ण करावीत - पालकमंत्री दीपक केसरकर मंगळवार, २८ मे, २०१९
सिंधुदुर्गनगरी : विहिरी खोल करणे तसेच विहिरीतील गाळ काढणे ही कामे त्वरीत पूर्ण करावीत अशी सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पाणीटंचाई बाबत व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे घेतेलेल्या आढावा बैठकीत केली.

काल सायंकाळी झालेल्या या आढावा बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी के.मंजुलक्ष्मी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हरिष जगताप, निवासी उपजिल्हाधिकारी शुंभागी साठे, कार्यकारी अभियंता श्री. मठकर, श्रीपाद पाताडे, सर्व गटविकास अधिकारी, सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी आदी अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील पाणी टंचाईबाबत प्रस्तावित तसेच सुरू झालेल्या सर्व २८० कामांचा तालुकावार आढावा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी घेतला. जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे त्यांचे समवेत उपस्थित होते.

पाणी टंचाईबाबत नव्याने आलेल्या प्रस्तावांना तातडीने मंजुरी देऊन सदर कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होतील याचे नियोजन काटेकोर करावे, अशी सूचना करून पालकमंत्री म्हणाले, काही योजनेत वर्ग-२ च्या जमिनी संदर्भात आलेली अडचण उपविभागीय अधिकारी यांचे संपर्क साधून दूर करावी, अद्यापही अप्राप्त प्रस्ताव असलेल्या ग्रामपंचायतींशी त्वरीत संपर्क साधावा, बोअरवेलसाठी रिंग पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून घ्याव्यात, वेंगुर्ला निशान तलावातील गाळ काढण्सासाठी जादा निधीची मागणी करावी व जास्तीत जास्त गाळ काढण्याचे काम करावे, धनगरवाड्या किंवा अन्य ठिकाणी प्रदूषित पाणी असेल अशा ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे टँकर आवश्यक असतील तर तशी तजवीज करावी, आदी सूचना त्यांनी यावेळी केल्या.

९० नळ पाणीपुरवठा विशेष दुरूस्ती, ४ तात्पुरत्या पुरक नळयोजना, ६३ नविन सिंचन विहीरी, ४ सिंचन विहिरींची विशेष दुरूस्ती, ८३ विहिरी खोल करणे व गाळ काढण्याची कामे अशी एकूण २८० कामे पूर्ण करण्यात येतील, अशी माहिती कार्यकारी अभियंता श्रीपाद पाताडे यांनी यावेळी दिली.
Share बातमी छापा