महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
दुष्काळ व टंचाई स्थितीत संवेदनशिलतेने काम करा - विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर शुक्रवार, १० मे, २०१९पुणे
:
दुष्काळाच्या संकटावर मात करण्यासाठी प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे असे सांगून दुष्काळ व टंचाईच्या स्थितीमध्ये सर्वसामान्य माणसाचे जीवन सुसह्य होईल यासाठी संवेदनशिलतेने काम करा, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिले. यावेळी त्यांनी टंचाई निवारणार्थ आवश्यक उपाययोजना तातडीने गतिमान करून यात कोणतीही त्रुटी राहणार नाही याची खबरदारी घ्या. चारा छावण्याचे संचलन काटेकोरपणे करा. दुष्काळ व टंचाई स्थिती भागात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी अंतर्गत विविध यंत्रणांकडील कामे मोठ्या प्रमाणावर सुरू करा. ज्या ठिकाणी पाण्याचे टँकर भरले जात आहेत त्या ठिकाणी ब्लिचींग पावडरचा स्टॉक करून ओटी टेस्ट घ्या, अशा सूचनाही यावेळी दिल्या.

विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली पाणीटंचाई आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहामध्ये झाली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, महसूल उपायुक्त प्रताप जाधव, उपायुक्त पुनवर्सन दीपक नलावडे, उपायुक्त पुरवठा नीलिमा धायगुडे, अपर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम आदी उपस्थित होते.

पाणीटंचाई निवारणार्थ करण्यात येणाऱ्या उपाययोजनांच्या आराखडा अंमलबजावणी व आराखड्याव्यतिरीक्त किती ठिकाणी उपाययोजना सुरू आहेत याबाबतची माहिती घेतली. आवश्यक तेथे तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना देऊन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, ज्या ठिकाणी टँकर सुरू करण्यात आले आहेत त्या ठिकाणी जीपीएस कार्यप्रणालीचा काटेकोरपणे अवलंब व्हावा. टँकर भरून घेण्यासाठीचे स्त्रोत निश्चित करा. टँकरची देयके जीपीएसच्या लॉगबुक तपासूनच द्यावी. त्याबाबतची आवश्यक कागदपत्रे तपासून घ्यावी. टँकरची क्षमता प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडून प्रमाणित करून घ्यावी. टँकरला अजिबात गळती असू नये, असे त्यांनी सांगितले. ज्या ठिकाणी टँकरमध्ये पाणी भरले जात आहे त्या ठिकाणी ब्लिचिंग पावडरचा स्टॉक असावा. ओटी टेस्ट करूनच पाणी टँकरमध्ये भरले जावे. सदरची टेस्ट निगेटीव्ह आल्यास अशा पाण्याचे टँकर वापरले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिका व जिल्ह्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीच्या शहरातील पाणीपुरवठा स्थितीचा आढावा घेतला असता खानापूर वगळता अन्य ठिकाणी पाणी पुरवठा सुरळीत असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. यावर खानापूर शहरासाठी शहरालगतच्या विहीरी व कुपनलिका या अधिगृहीत करून त्यातून शहराला पाणीपुरवठा करावा असा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्या. सन 2018-19 मधील वितरीत 15 कोटी 38 लाखाच्या विनियोगाबाबत या बैठकीत आढावा घेवून सन 2017-18 मधील खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्रे तात्काळ द्यावीत अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या.

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या कामांचा आढावा घेवून दुष्काळ व टंचाई परिस्थिती असणाऱ्या तालुक्यांमध्ये या योजनेंतर्गत यंत्रणांची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू करावीत. रोजगार नाही म्हणून कोणीही कामापासून वंचित राहणार नाही यादृष्टीने नियोजन करण्यात यावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हास्तरावर चारा छावण्यांसाठी सात प्रस्ताव प्राप्त झाले असून पाच प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. तीन चारा छावण्या सुरू झाल्या आहेत. दोन चारा छावण्या लवकरच सुरू करण्यात येतील. आज आटपाडी तालुक्याती चार व जत तालुक्यातील चार चारा छावण्यांचे प्रस्ताव प्राप्त झाल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली. यावर मागणी व आवश्यकता लक्षात घेवून चारा छावण्यांचे प्रस्ताव तात्काळ मार्गी लावा असे सांगून डॉ. म्हैसेकर म्हणाले, चारा छावण्यातील पशुधनासाठी 15 किलो ऐवजी 18 किलो चारा देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे त्यादृष्टीने कार्यवाही व्हावी. चारा छावणीतील सर्व पशुधनाचे लसीकरण होणे आवश्यक आहे. या ठिकाणी शेड, इलेक्ट्रीसीटी व अग्नीशमन यंत्रणा असावी. चाऱ्याची तपासणी व्हावी. पशुपालक समितीची नियमीत बैठक व्हावी, आजारी जनावरांची स्वतंत्र व्यवस्था ठेवली जावी. एकूणच चारा छावण्यांचे संचलन काटेकोर व्हावे अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.  

जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी विभागीय आयुक्त यांनी दिलेल्या सर्व सूचनांचे जिल्हा प्रशासन तंतोतंत पालन करेल अशी ग्वाही देवून संवेदनशिलतेने व सदसदविवेक बुध्दीने सर्वसामान्य माणसासांठी काम करा असे सांगितले.

गुरूवार दिनांक 9 रोजी जत तालुक्यातील विविध कामांच्या पाहणी नंतर रात्री उशीर झाल्यामुळे कवठेमहांकाळ येथील चारा छावणीला भेट देता आली नसल्याचे सांगून आज शुक्रवार दिनांक 10 रोजी कवठेमहांकाळ व आटपाडी तालुक्यातील दुष्काळ व टंचाई निवारणार्थ करण्यात येत असलेल्या उपाययोजनांमधील कामांची भेट देवून पाहणी करणार असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले.

Share बातमी छापा