महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
अकरा हजाराहून अधिक टपाली मतपत्रिका पाठवल्या - जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी शुक्रवार, १२ एप्रिल, २०१९
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक - 2019 :

सांगली :
लोकसभा निवडणूक 2019 अंतर्गत निवडणूक कामामध्ये नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या दि. 10 एप्रिलपर्यंत 5 हजार 385 टपाली मतपत्रिका संबंधित विधानसभा मतदारसंघातील सुविधा केंद्राकडे पाठवण्यात आल्या आहेत. पहिल्यांदा ETPBS ने सैनिक मतदारांना 6 हजार 55 मतपत्रिका दिनांक 9 एप्रिल 2019 रोजी पाठवल्या. ही माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी दिली.

जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.अभिजीत चौधरी म्हणाले, लोकसभा निवडणुकीसाठी सांगली जिल्ह्यातील मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले आहे. या अधिकारी-कर्मचाऱ्यांची मतदानाची संधी चुकू नये, यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार टपाली मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्याने नमुना क्रमांक 12 मध्ये टपाली मतपत्रिकेची मागणी करायची आहे. त्यासाठी 16 एप्रिल पर्यंत मुदत आहे.

जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.अभिजीत चौधरी म्हणाले, निवडणूक विभागाने निवडणूक कामी नियुक्त अधिकार, कर्मचारी यांना टपाली मतदान करण्यात यावे याकरिता दिनांक 10 एप्रिल 2019 रोजी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयातून विधानसभा मतदार संघ निहाय ज्या अधिकारी / कर्मचारी यांनी नमुना 12 पूर्ण भरून दिलेला आहे, त्या सर्व अधिकारी कर्मचारी यांना एकूण 5 हजार 385 इतके टपाली मतपत्रिका लिफाफे तयार करून विधानसभा मतदार संघामध्ये आयोजित दुसऱ्या प्रशिक्षणास फॅसिलिएशन सेंटर (facilation centre) मध्ये मतदान कक्षाद्वारे मतदान करण्याची सुविधा करण्यात आलेली आहे. दि. 11 व 12 एप्रिल 2019 रोजी होणाऱ्या प्रशिक्षणावेळी संबंधित सुविधा केंद्रातून या टपाली मतपत्रिका संबंधिताने प्राप्त करून घ्यावयाच्या आहेत.

तसेच, 22 एप्रिल रोजी म्हणजेच केंद्रावर जाण्याच्या आदल्या दिवशी सुविधा केंद्र स्थापन करून मतदान कक्ष तयार करण्यात आला आहे. तिथे सीलबंद पेटीत आपली मतपत्रिका टाकून टपाली मतदान प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. टपाली मतदान पारदर्शक पद्धतीने पार पडावे याकरिता याबाबत उमेदवाराने प्राधिकृत केलेले प्रतिनिधी यांनी उपस्थित राहण्याबाबत कळवण्यात आले आहे. मतमोजणी दिवशी म्हणजे दि. 23 मे रोजी सकाळी 7.59 पर्यंत टपाली मतपत्रिका स्वीकारण्यात येणार आहेत.
Share बातमी छापा