महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
आचारसंहिता भंग करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करा - जिल्हाधिकारी दौलत देसाई रविवार, ३१ मार्च, २०१९


खर्चाच्या दृष्टीने संवेदनशील ठिकाणे निश्चित करण्याचे निर्देश

कोल्हापूर :
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करा, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता आणि निवडणूक कामकाजाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महाराणी ताराबाई सभागृहात आयोजित केलेल्या बैठकीत जिल्हाधिकारी दौलत देसाई बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, अपर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ यांच्यासह सर्व सहाय्यक निर्णय अधिकारी तसेच सर्व पथकांचे नोडल अधिकारी, विविध पथक प्रमुख व समन्वय अधिकारी उपस्थित होते.

निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेचे जिल्ह्यात काटेकोर पालन करण्यावर सर्व पथकांनी तसेच शासकीय यंत्रणांनी अधिक भर द्यावा अशी सूचना करुन जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, सीएसटी तसेच भरारी पथकासह अन्य सर्व पथकांनी आपआपल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडून आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे. शहर व गावात विना परवानगी होणाऱ्या सभा, मेळावे, कॉर्नर सभा याची माहिती घेऊन संबंधितावर कारवाई करण्यात निवडणूक पथकांबरोबरच पोलीस, तहसीलदार, गट विकास अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांनीही सक्रिय व्हावे, अशी सूचना त्यांनी केली.

खर्चाच्या दृष्टीने संवेदनशील ठिकाणे निश्चित करा - जिल्हाधिकारी
भारत निवडणुक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार खर्च समित्यांनी काटेकोरपणे कामकाज करावे, अशी सूचना करुन जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, लोकसभा निवडणूक निपक्ष आणि भयमुक्त वातावरणात व्हावी, याबरोबरच राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या निवडणूक खर्चाबाबतही खर्च समित्यांनी अधिक दक्षता घेऊन काम करावे. जिल्ह्यातील खर्चाच्या दृष्टीने संवेदनशील भाग निश्चित करुन त्यादृष्टीने आचानक तपासणी कराव्यात. राज्य उत्पादन शुल्क, पोलीस, आयकर या यंत्रणांकडून तसेच खर्च विषयक भरारी पथके, स्थिर सर्वेक्षण पथक यांच्यामार्फत निवडणूक काळात रोकड, मद्य, भेटवस्तूंचे कसल्याही परिस्थितीत वाटप होणार नाही याची दक्षता घेण्याची सूचनाही त्यांनी केली.

एसएसटी व भरारी पथकाने परिणामकारक काम करावे - जिल्हाधिकारी
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या स्थिर सर्वेक्षण पथके आणि भरारी पथकानी अधिक परिणामकारक काम करावे, अशी सूचना करुन जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, लोकसभा निवडणूक मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पडावी यादृष्टीने सर्व यंत्रणांनी योग्य समन्वय ठेऊन आपआपल्या जबाबदाऱ्या योग्य रितीने पार पाडाव्यात. स्थिर सर्वेक्षण पथक आणि भरारी पथकाने आचारसंहिता भंगाबाबत येणाऱ्या तक्रारीबरोबरच स्वत:हून प्राधान्यक्रमाने कारवाई करावी. याबरोबरच सर्वच पथकांनी आपआपली जबाबदारी प्रामाणिकपणे आणि कठोरपणे बजावावी. यामध्ये कसल्याही प्रकारची हयगय करू नये, अशी सूचनाही त्यांनी केली.

मतदान जनजागृती कार्यक्रम जिल्ह्यात अधिक गतिमान करा, अशी सूचना करुन जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, स्वीप उपक्रमाच्या सहाय्याने मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे यासाठी कृती आराखडा तयार करावा. जिल्ह्यात गावनिहाय मतदार जनजागृतीचा कार्यक्रम राबविण्याची सूचना त्यांनी केली. यामध्ये पथनाट्य, गृहभेटी, चुनाव पाटशाला याबरोबरच बहुरुपी, तृतियपंथीय यांचेही मतदान जागृतीसाठी सहकार्य घेण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रामध्ये विद्युत, पाणी यासह आवश्यक सुविधा १०० टक्के उपलब्ध करुन द्याव्यात असे निर्देश देऊन जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रांवर रॅम्प,व्हीलचेअर, मेडीकल किट, पालना घर, स्वयंसेवक अशा आवश्यक उपाययोजना प्राधान्याने कराव्यात, दिव्यांग मतदारांचे १०० टक्के मतदान करण्याच्या दृष्टीने निवडणूक यंत्रणेने आवश्यक सर्व उपाययोजना करण्यास प्राधान्य द्यावे. दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर सुलभपणे मतदान करता यावे यासाठी निवडणूक आयोगाने सूचित केलेल्या सुविधा उपलब्ध करून देण्याची दक्षता घ्यावी असेही ते म्हणाले.

यावेळी पोलीस, महानगरपालिका, जिल्हा परिषद यांनी करावयाच्या उपयोजनांचाही यावेळी विधानसभा मतदार संघ निहाय आढावा घेण्यात आला. तसेच सर्व नियुक्त पथकांच्या नोडल अधिकाऱ्यांच्याही कामाचा आढावा घेण्यात आला.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result