महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
गुणवत्तापूर्ण उत्पादनांची आकर्षक वेष्टनासह विक्रीचा प्रयत्न करावा- रवींद्र वायकर रविवार, ३० डिसेंबर, २०१८
रत्नागिरी : महिला बचत गटांच्या उत्पादनांना चांगली बाजारपेठ व उत्पादनांच्या विक्री व वृद्धीसाठी बचत गटांनी गुणवत्तापूर्ण उत्पादनांची आकर्षक वेष्टनासह विक्रीचा प्रयत्न करावा, असे आवाहन पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी गणपतीपुळे येथे आयोजित सरस प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी केले.

गणपतीपुळे येथे आयोजित सरस प्रदर्शन ३० डिसेंबर २०१८ ते ०३ जानेवारी २०१९ पर्यंत सुरु राहणार आहे. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा स्वरुपा साळवी, जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल, शिल्पा सुर्वे, महिला व बाल कल्याण सभापती साधना साळवी, महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आरगे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विवेक पनवेलकर, जिल्हा विकास अधिकारी आरिफ शहा, गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे सरपंच महेश ठावरे आदी उपस्थित होते.

बचत गटांच्या पदार्थांना घरगुती विशिष्ठ चव असते. महोत्सव, प्रदर्शन आदीमधून त्यांच्या पदार्थांना मोठी मागणी असते, असे सांगून श्री. वायकर म्हणाले की, कोकणी पदार्थ, वस्तू यांची विक्रीसाठी रेल्वे स्थानक तसेच रेल्वे मधूनही या पदार्थांच्या विक्रीसाठी मी प्रयत्न करेन. यामुळे रेल्वे प्रवाशांनांही कोकणी खाद्य पदार्थांचा स्वाद घेता येईल.

गणपतीपुळे येथे नुकत्याच बुडत असलेल्या पर्यटकांना वाचविणाऱ्या जीवरक्षकांचा गौरव करुन ते म्हणाले, रत्नागिरीच्या सर्व सागरी किनाऱ्यावर असे जीवरक्षक ठेऊन त्यांना आवश्यक असणारी साधने पुरविण्याबाबत आवश्यक प्रयत्न करणार आहोत. यामुळे रत्नागिरीत येणाऱ्या पर्यटकांचा सुरक्षितपणे सागरी किनाऱ्यांचाआस्वाद घेता येईल. बचत गटांना मोक्याच्या ठिकाणी स्वयंपाकगृह उपलब्ध करुन देण्याबाबत विचार करु यामुळे त्यांना कायमस्वरुपी उत्पादन विक्री होऊ शकेल.

श्रीमती साळवी म्हणाल्या, महिला बचत गटांच्या माध्यमातून अनुभव घेतला आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणात बचतगटांचा मोठा वाटा आहे. संपूर्ण कुटुंबाचा विचार करतानाच महिला बचत गटांच्या माध्यमातून विशेषत: ग्रामीण भागात कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत करण्याचा प्रयत्न करीत आहोत. सरससारख्या प्रदर्शनामधून बचत गटांच्या उत्पादित वस्तूंना चांगली बाजारपेठ मिळत आहे. बचत गटांच्या वस्तूंना चांगली बाजारपेठ व विक्री वाढण्यासाठी महिलांना विक्री व बाजारपेठ कौशल्याबाबत प्रशिक्षण देण्याची गरज आहे.

श्री.चव्हाण म्हणाले की, महिला या सबला आहेत. महिलांना व्यवस्थापन कौशल्याचे चांगल ज्ञान असते. कुटुंबाच्या चरितार्थासाठी उमेदच्या माध्यमातून महिलांची आर्थिक स्वयंपूर्णतेकडे वाटचाल सुरु आहे. बाजारपेठेचा कल लक्षात घेऊन बाजारपेठेच्या मागणीनुसार उत्पादनांची विक्री करण्याचा प्रयत्न महिलांनी करावा. रेल्वे स्थानकांवरुनही गटांच्या उत्पादनांची विक्री होऊ शकेल. या सरस प्रदर्शनात 100 हून अधिक महिला बचत गट सहभागी झाले आहेत ही विशेष आनंददायी आणि बचत गट चळवळीची उमेद वाढवणारी आहे.

श्रीमती गोयल म्हणाल्या की, सरस हे एक व्यासपीठ आहे. महिलांनी या प्रदर्शनात माहिती घ्यावी, उत्पादनाची विक्री कशी होते याचा अभ्यास करावा व आपण बचत गट आर्थिक सक्षम कसा होईल याचा प्रयत्न करावा. ग्राहकांबरोबर संवाद कौशल्य कसे करावे या बाबीही सरस प्रदर्शनातून समजावून घ्याव्यात. डी मार्टसारख्या मोठ्या संस्थांशी आम्ही संपर्क केला आहे. यामुळे वर्षभर महिला बचत गटांची उत्पादनांची विक्री होण्यास मदत होईल.

श्री.पनवेलकर प्रास्ताविकात म्हणाले, महिला बचत गट स्टॉलना प्रतिसाद उत्तम आहे. विक्री कौशल्याचा अनुभव यावा यासाठी सरस प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले ओहे. जिल्ह्यात 17 हजार 400 बचत गट असून त्यामाध्यमातून 1 लाख 20 हजार महिलांचा यामध्ये समावेश आहे. उमेद अंतर्गत 450 ग्रामसंघ स्थापन झाले आहेत. स्वयंसहाय्यता बचत गट चळवळ चांगली रुजली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांच्या संकल्पनेतून फिरता महिला विक्री करणार आहेत.

यावेळी तालुकास्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिक देऊन जिल्ह्यातील 9 तालुक्यातील स्वयंसहाय्यता गटांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. पुढारीचे वार्ताहार राजेश ज्योष्टे यांना सर्वोत्कृष्ठ पत्रकार म्हणून गौरविण्यात आले. तसेच उत्कृष्ठ बँक शाखा व्यवस्थापक म्हणून स्टेट बँक ऑफ इंडिया, देवरुख शाखेचे अमोल शांडगे यांचाही गौरव करण्यात आला. विक्रांत सरगल यांनी आभार मानले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result