महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
अंधश्रद्धा दूर करूया, अवयवदानाचा संकल्प करूया - डॉ.संतोष दळवी सोमवार, ०४ सप्टेंबर, २०१७
मिरजच्या श्री दिंडीवेस गणेश उत्सव मंडळात संवादपर्व उपक्रम

सांगली :
अवयव दान केल्यास आपण अनेकांचे जीवन फुलवू शकतो. या माध्यमातून पुण्य तर मिळेलच. पण, दान केलेल्या अवयवांतून आपण या जगात जिवंत राहू शकतो. त्यामुळे अवयवदानाचा संकल्प करूया, असे आवाहन मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ.संतोष दळवी यांनी केले.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सांगली जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने मिरजच्या श्री दिंडीवेस गणेश उत्सव मंडळात आयोजित संवादपर्व उपक्रमात ते बोलत होते. माहिती महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या संकल्पनेतून, संचालक अजय अंबेकर व शिवाजी मानकर तसेच उपसंचालक सतीश लळित यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ.रोहिणी कुलकर्णी, राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत व्यवस्थापक (कौशल्ये व उपजिविका) बाळकृष्ण व्हनखंडे, कुंदन साळुंखे, डॉ.मोनाली पाटील, डॉ.स्वप्नील चोपडे, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर, मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत जाधव, उपाध्यक्ष लक्ष्मण शिंदे, सचिव शशिकांत चव्हाण, पत्रकार धनंजय पाठक उपस्थित होते.

यावेळी डॉ.संतोष दळवी यांच्यासह डॉ.मोनाली पाटील यांनी अवयवदानाची सविस्तर माहिती दिली. यामध्ये अवयवदानाच्या प्रतिक्षेत असलेल्या रूग्णांची संख्या, अवयवदानातील अंधश्रद्धा, समज आणि गैरसमज, मिरजमध्ये अवयव दानाची सुविधा, त्याबाबतचे नियम यांची माहिती दिली.

डॉ.रोहिणी कुलकर्णी म्हणाल्या, महानगरपालिकेच्या दवाखान्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी 15 दिवस मोफत औषधे दिली जातात. दर महिन्याच्या 9 तारखेला प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्त्व योजनेंतर्गत गर्भवती मातांची तपासणी केली जाते. यावेळी त्यांनी मोफत लसीकरण, रूग्ण कल्याण समिती, नवीन दवाखाने यांच्यासह महानगरपालिका क्षेत्रात दिल्या जाणाऱ्या अन्य आरोग्य सुविधांची माहिती दिली.

बाळकृष्ण व्हनखंडे म्हणाले, स्किल इंडियाच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगारांमध्ये कौशल्य निर्माण होण्यासाठी अनेक प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये जवळपास 600 विविध प्रकारच्या कौशल्य प्रशिक्षणाची संधी उपलब्ध आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र दिले जाते. उद्योग, व्यवसाय सुरू करण्यासाठी मदतही केली जाते. बचत गटांनाही मदत केली जाते. कुंदन साळुंखे यांनी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शहरी भागात घटक दोन, तीन आणि चारची माहिती दिली.

जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी श्री दिंडीवेस गणेश उत्सव मंडळाचे पदाधिकारी, नागरिक, महिला व युवा वर्ग उपस्थित होता.

दरम्यान या कार्यक्रमानंतर दत्त चौक येथील मिरज ऑटो रिक्षा गणेश उत्सव मंडळातही संवादपर्व उपक्रम घेण्यात आला. यावेळी उपस्थित रिक्षाचालक, ज्येष्ठ नागरिक व अन्य नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result