महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
किटकनाशके वापरताना शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन शुक्रवार, ०६ ऑक्टोंबर, २०१७
वर्धा : सध्याचे परिस्थितीत तूर व कापूस पीक वाढीच्या अवस्थेत असून पिकांवर थोड्याफार प्रमाणात कीड व रोगांचा प्रादूर्भाव आढळून येत आहे. पीक सरंक्षण करताना वापरली जाणारी बहुतेक किडनाशके काळजी पूर्वक हाताळली नाहीत तर शेतकरी, शेतमजूर व पाळीव प्राण्यांनाही हानीकारक ठरु शकतात, यासाठी किडनाशके वापरताना काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी ज्ञानेश्वर भारती यांनी केले आहे.

किडनाशकाचा डबा, बाटलीवरील लेबल काळजीपूर्वक वाचून त्या सुचनाचे तंतोतंत पालन करावे, डब्यावरील लाल रंगाचे पतंगीच्या आकाराचे चिन्ह असलेली किटकनाशके सर्वात विषारी असतात. त्यानंतर पिवळा निळा व हिरवा असा क्रम लागतो. ही चिन्हे सोपी व सर्वसाधारण, निरक्षर व्यक्तीसाठी सुध्दा समजण्यासाठी असतात. हिरव्या रंगाचे चिन्ह असलेली किटकनाशके कमीत कमी विषारी असतात.

तणनाशके फवारणीचा पंप चुकुनही किटकनाशके फवारणीसाठी वापरु नये, फवारणी संरक्षक कपडे, बुट, हातमोजे, नाकावरील मास्क इत्यादीचा वापर करावा. ज्या पिकासाठी किडनाशके शिफारस केले असेल त्याच पिकाकरिता वापरण्यात यावे. शिफारस केलेल्या प्रमाणाचे तंतोतंत पालन करावे. किडनाशके थंड, कोरड्या व सुरक्षित जागी कुलूप लावून मुलांपासून दूर राहतील अशी ठेवावीत. धान्य किंवा आरोग्यविषयक औषधांजवळ किडनाशके ठेऊ नये. कीड नाशकाचे रिकामे डबे, बाटल्या, खोकी यांचा पुनर्वापर न करता ते नष्ट करावेत.

कीडनाशकाच्या पिशव्या फाडून न काढता सुरीने हळूवार कापून उघडाव्यात व सुरी स्वच्छ धुवावी. अतिविषारी कीडनाशकाचे द्रावण तयार करताना खोलगट भांडे वापरावे, जेणेकरुन ढवळताना द्रावण अंगावर उडणार नाही. भुकटी व दाणेदार किडनाशके लांब दांडीच्या चमच्याने काढावित. फवारणी, धुरळणी यंत्रात किडनाशके भरल्यानंतर आणि फवारणी पूर्ण झाल्यावर हात साबणाने स्वच्छ धुवावेत. फवारणीचे द्रावण तयार करण्‍यापासून फवारणी पूर्ण होईपर्यंत फवारणी करणाऱ्या सर्व व्‍यक्‍तींनी खाणे, पिणे, तंबाखू, धुम्रपान करु नये. हात स्वच्छ धुवुनच सर्व क्रिया कराव्यात. फवारणी, धुरळणी यंत्रे, द्रावण तयार करताना वापरलेली भांडी नदी, ओढे, शेततळी, विहीर इत्यादी पाणी साठ्याच्या ठिकाणी स्वच्छ करु नये. भांडे स्वच्छ करण्यासाठी वापरलेल्या पाण्यात विषारी अवशेष असल्याने पडीक जमिनीवर टाकावे अथवा मातीत गाडावे. नोझल साफ करताना तोंडाने फुंकर मारु नये किंवा तोंडाने आत ओढू नये.

फवारणीचे काम दर दिवशी सहा तासांपेक्षा जास्त वेळ करू नये. त्याचप्रमाणे उपाशी पोटी किडनाशके फवारु नये. जखम असणाऱ्या व्यक्तींनी फवारणी करु नये. उंच झाडावर फवारणी करताना अंगावर किडनाशके पडणार नाहीत याची काळजी घ्यावी. फवारणी करताना बैलगाडीचा वापर करताना बैलाच्या तोंडाला मुसक्या बांधाव्यात. किडनाशके मारलेल्या क्षेत्रावर गुरांना चरण्यास कमीत कमी दोन आठवडे बंद करावा.

किडनाशके पोटात गेल्यास प्रथमोपचार
पोटातील विष बाहेर काढण्यासाठी रोग्याला उलट्या करण्यास भाग पाडावे. त्यासाठी 15 ग्रॅम मीठ ग्लासभर कोमट पाण्यातून पिण्यास द्यावे. उलटीद्वारे येणारे पाणी स्वच्छ येईपर्यंत ही कृती करत रहावी. रोग्याला सारख्या उलट्या होत असतील तर असे उपचार करू नये. परंतु त्यास जास्त प्रमाणात कोमट पाणी पिण्यास द्यावे. रुग्ण बेशुध्दावस्थेत असेल किंवा रोग्याने पेट्रोलजन्य पदार्थ (उदा. रॉकेल, गॅसोलीन किंवा दाहक आम्ल किंवा कॉस्टीक अल्कलीसारखे स्नायू जलद झिजवणारे पदार्थ) गिळले असल्यास तोंडात व घशात जळजळ होते. अशावेळी त्याला उलट्या करण्यास प्रवृत्त करु नये.

त्वचेवर किडनाशके पडल्यास प्रथोमचार
कपडे काढताना त्वचेवर पाण्याची धार सोडावी. त्वचा साबन आणि पाण्याने पूर्णपणे धुऊन काढावे. ऑरगॅनो फॉस्फरस किटकनाशकाची विषबाधा झालेली असल्यास साबणाचा चांगला उपयोग होतो. कारण ते साबणामुळे लगेच विरघळून जाते. विषबाधा कमी होण्यासाठी त्वचा त्वरीत पाण्याने धुणे हे जास्त महत्त्वाचे आहे.

श्वसनाद्वारे किडनाशकाची विषबाधा झाल्यास
रुग्णाला तात्काळ उचलून मोकळ्या हवेत न्यावे. खिडक्या व दारे उघडावीत, रुग्णाचे कपडे सैल करावेत. श्वासोच्छवास नियमित होत नसल्यास त्यास कृत्रिम श्वासोच्छवास द्यावा. त्याच्या छातीवर अतिरिक्त भार देऊ नये. रुग्णास बडबड करु देऊ नये व तो जास्तीत जास्त शांत राहील याची काळजी घ्यावी. रुग्ण अतिशय अस्वस्थ असल्यास त्यास अंधाऱ्या व शांत खोलीत ठेवावे. रुग्णास कोणत्याही स्वरुपातील अल्कोहोल देऊ नये.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result