महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
सांगलीतील पासपोर्ट केंद्र मार्चअखेर कार्यान्वित - परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्वर मुळे मंगळवार, १६ जानेवारी, २०१८
मुंबईत देशातील पहिले विदेश भवन
फसवणूक टाळण्यासाठी ई मायग्रेट पोर्टल सुविधा
प्रवासी भारतीय विमा योजनेतून 10 लाखांचा विमा
केंद्र, राज्य शासनामध्ये समन्वयासाठी विदेश संपर्क सेवा

सांगली :
सध्या पासपोर्ट ही चैनीची, श्रीमंतीची वस्तू राहिली नाही. मात्र अनेकांकडे पासपोर्ट नाही. त्यामुळे पासपोर्ट ही आता जनतेची चळवळ बनली आहे. मार्च 2018 पूर्वी देशभरात 251 नवीन पासपोर्ट कार्यालये सुरु करण्यात येत असून, त्यातील 3 पासपोर्ट केंद्रे महाराष्ट्रात आहेत. 251 पैकी 60 पासपोर्ट कार्यालये सुरु झाली असून, सांगलीतील पासपोर्ट केंद्र मार्चअखेर कार्यान्वित होईल, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव (पासपोर्ट विभाग) ज्ञानेश्वर मुळे यांनी आज येथे दिली.

सांगली जिल्हाधिकारी कार्यालयातील दालनात ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर उपस्थित होते.

सचिव ज्ञानेश्वर मुळे म्हणाले, सामान्य माणसाच्या विचार कक्षेमध्ये परराष्ट्र मंत्रालय जवळजवळ नव्हतेच. त्या पार्श्वभूमिवर सामान्य माणसाला परराष्ट्र मंत्रालयातील जास्तीत जास्त सुविधांचा सुलभरीत्या लाभ उपलब्ध करून देण्यात येत आहेत. परदेशातील भारतीय नागरिकांच्या योजना व अडचणी, पासपोर्ट, व्हिसा व समुपदेशन अन्य विविध सेवांचा लाभ देण्यासाठी व परदेशात त्याच्या अडचणी सोडवण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय कटिबद्ध आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.

विदेशामध्ये जाणाऱ्या नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात, या दृष्टीने अनेक योजना कार्यान्वित केल्या असल्याचे सांगून सचिव ज्ञानेश्वर मुळे म्हणाले, परदेशात जाणाऱ्या नागरिकांसाठी विदेश में आपका दोस्त भारतीय दूतावास, ई मायग्रेट पोर्टल, प्रवासी भारतीय विमा योजना, प्रशिक्षित जावो, सुशिक्षित जावो अशा अनेक योजनांच्या माध्यमातून परदेशात जाणाऱ्या नागरिकांमध्ये जागरूकता आणून फसवणूक टाळण्यासाठी काम करत असल्याचे ते म्हणाले.

सचिव श्री.मुळे म्हणाले, प्रदेश में विदेश या संकल्पनेतून मुंबईमध्ये देशातील पहिले विदेश भवन बांधले आहे. या सात मजली इमारतीच्या माध्यमातून पासपोर्ट सेवा, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद कार्यालय, विदेश मंत्रालयाची शाखा अशा अनेक सेवा एकाच छताखाली दिल्या जात आहेत.

परदेशात जाताना सर्वप्रथम तेथील भारतीय दूतावासाचा पत्ता व संपर्क क्रमांक सर्वप्रथम घ्यावा. तसेच अन्य खबरदारी घ्यावी, असे स्पष्ट करून सचिव ज्ञानेश्वर मुळे म्हणाले, परदेशात नोकरीसाठी जाणाऱ्या नागरिकांची फसवणूक टाळण्यासाठी ई मायग्रेट पोर्टल सुविधा सुरू करण्यात आली आहे. या पोर्टलवर नोंदणीकृत एजंटची माहिती, परदेशातील अधिकृत नियोक्त्याची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.

सचिव ज्ञानेश्वर मुळे म्हणाले, परदेशी नोकरीसाठी जाण्यापूर्वी या पोर्टलवरून माहिती घ्यावी. या माध्यमातून नोंदणीकृत एजंटमार्फत जाणाऱ्या नागरिकांच्या नोंदी या पोर्टलवर उपलब्ध होतात. त्यांची माहिती तेथील दुतावासाला आपोआप समजते. त्यामुळे त्यांना काही अडचण आली तर नोंदणीकृत एजंटमार्फत जाणाऱ्या नागरिकांना तातडीने सहाय्य उपलब्ध करून देता येते. अशा प्रत्येक व्यक्तीसाठी प्रवासी भारतीय विमा योजनेच्या माध्यमातून 10 लाख रुपयांचा विमा देण्यात येतो. तसेच, परदेशात जाणाऱ्या अकुशल कामगारांसाठी प्रशिक्षित जावो, सुशिक्षित जावो या योजनेच्या माध्यमातून कौशल्य विकास प्रशिक्षण सक्तीचे करण्यात आले आहे, असे ते म्हणाले.

सचिव ज्ञानेश्वर मुळे म्हणाले, परदेशात 3 कोटी 11 लाख भारतीय आहेत. त्यातील 1 कोटी 30 लाख अनिवासी भारतीय आहेत तर 1 कोटी 70 लाख विदेशी नागरिकत्व असलेले भारतीय वंशाचे नागरिक आहेत. त्यांच्या विविध अडचणी असतात. अडचणीत सापडलेले मजूर, मृत्यु झालेल्या भारतीयाचा मृतदेह असो, एखादी व्यक्ती अचानक आजारी पडली तर त्वरित रूग्णालयात दाखल करण्यासाठीची मदत असो त्यांना सर्वतोपरी मदत केली जाते. तसेच, नोकरी गेलेला किंवा बेरोजगार असो, काही दिवसांसाठी त्यांची भोजन व निवास व्यवस्थेसाठी सात देशांमध्ये शेल्टर्स उभे केले आहेत. तसेच, गेल्या काही वर्षांत 90 हजार परदेशातील संकटग्रस्त नागरिकांना मायदेशी परत आणले. ही एक मोठी कामगिरी आहे. या माध्यमातून परदेशातील भारतीयाला भारत सरकार तुमची काळजी घेत असल्याबाबत आश्वस्त केले आहे, असे ते म्हणाले.

सचिव ज्ञानेश्वर मुळे म्हणाले, केंद्र आणि राज्य शासनामध्ये समन्वय साधण्यासाठी विदेश संपर्क ही सेवा सुरू केली आहे. या माध्यमातून दोन्ही ठिकाणचे अधिकारी एकमेकांच्या संपर्कात राहतात. परराष्ट्र मंत्रालयातील अधिकारी शहरांमध्ये जातात व स्थानिक प्रशासन, स्वयंसेवी संस्था आणि प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून नागरिकांशी संपर्क साधून जागरूकता निर्माण केली जाते. या माध्यमातून अवैध एजंटना प्रतिबंध घालणे तसेच, अवैध एजंटना शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले जातात, असे त्यांनी सांगितले.

सचिव ज्ञानेश्वर मुळे म्हणाले, परदेशातील भारतीयांसाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या अनेक योजना आहेत. त्यांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती योजना, नो इंडिया प्रोग्राम (Know India Program), आखाती देशांमधील श्रमिकांच्या भारतातील पाल्यांसाठी शिष्यवृत्ती, तरूणांसाठी नो इंडिया क्विझ (Know India Quiz) असे अनेक उपक्रम राबवले जातात. तसेच, परदेशातील तरूणांसाठी नो इंडिया प्रोग्राम अंतर्गत दरवर्षी परदेशातील 240 लोकांना भारतीय दर्शन घडवले जाते, अशी माहिती त्यांनी दिली.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result