महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
जलयुक्त शिवारच्या धर्तीवर आदर्श गावाचे काम गतीने करावे - प्रा. राम शिंदे शुक्रवार, १८ ऑगस्ट, २०१७
आदर्श गाव विदर्भ विभागीय कार्यशाळा व आढावा

वर्धा :
25 वर्षांपासून आदर्शगाव योजना सुरू आहे. मात्र एक आदर्श गाव करायला 5 वर्षांचा कालावधी लागणे योग्य नाही. जलयुक्त शिवार अभियानात निवडलेल्या गावात एकाच वर्षात कामे पूर्ण होतात आणि गाव जलयुक्त म्हणून घोषित केले जाते. याच धर्तीवर आदर्शगावाची कामे गतीने पूर्ण कारावीत अशा सूचना जलसंधारण मंत्री तथा आदर्शगाव राज्यस्तरीय समितीचे अध्यक्ष प्रा. राम शिंदे यांनी दिल्यात.

आदर्शगाव संकल्प व प्रकल्प योजनेची विदर्भस्तरीय विभागीय कार्यशाळा व आढावा बैठक आज सेवाग्राम येथे यात्री निवास मध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी कार्याध्यक्ष पोपटराव पवार, जलसंधारण व रोहयो विभागाचे सचिव एकनाथ डवले, नागपूर विभागाचे कृषी सहसंचालक कैलास मोते, अमरावतीचे सहसंचालक श्री.गवसाने, सेवाग्राम आश्रमाचे सचिव डॉ. श्रीराम जाधव, माधव कोटस्थाने सेवाग्राम च्या सरपंच रेश्मा जामलेरकर उपस्थित होत्या.

आदर्शगाव योजनेसाठी मंत्री म्हणून सकारात्मक पाठिंबा आहे असे सांगून ते म्हणाले, गाव आदर्श करण्यासाठी येणाऱ्या अडचणींचा आढावा राज्यस्तरीय समितीमध्ये घेऊन अडचणी सोडविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातील. अडथळा निर्माण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आदर्श गावासाठी तरतूद करण्यात आलेला निधी त्याचवर्षी खर्च करावा. निधी अखर्चित राहणे गावाच्या विकासाच्या दृष्टीने चांगले नाही. निधी एक वर्षात खर्च केल्यास निधी वाढवून देण्याची हमी सुद्धा त्यांनी यावेळी दिली.

यापुढे ज्या जिल्ह्यात दौरा असेल त्या जिल्ह्यातील आदर्श गावाला भेट देऊन गावाला येणाऱ्या अडचणी तिथेच सोडविण्यात येतील, असेही श्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

आदर्शगाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार म्हणाले, आदर्श गाव योजनेला 1992 मध्ये सुरुवात झाली, त्याला 25 वर्ष पूर्ण होत आहे. यामध्ये प्रामुख्याने जलसंधारणाच्या कामावर भर देऊन गावे दुष्काळमुक्त करण्यासोबतच उपजीविकेसाठी गावांचे स्थलांतर होणार नाही यावर काम करण्यात आले. 25 वर्षात 25 आदर्श गावे शासनाला दाखवून द्यायची आहेत. यामध्ये राज्यात 91 गावे आहेत. त्यापैकी विदर्भातील 31 गावे आहेत.

महाराष्ट्रातील पहिल्या दहा गावांमध्ये 5 गावे विदर्भातील आहेत. विदर्भासमोर विदर्भातीलच आदर्श गावांचे उदाहरण समोर ठेवले. त्यामुळे इतर गावांनाही त्याची प्रेरणा मिळेल. पाणी जिरवणे - पाणी साठवणे आणि साठलेल्या पाण्याचा विवेकाने व सामाजिक भान ठेवून उपयोग करणे महत्त्वाचे आहे, असेही पवार यावेळी म्हणाले. या आदर्शगाव योजनेत वर्धेतील 10 गावांची निवड व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी एकनाथ डवले यांनीही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत राज्यातून पहिल्या आलेल्या काकडदरा या गावाचा मंत्री महोदय आणि मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच जलयुक्त शिवार योजनेवर आधारित सिडीचे प्रकाशन, आदर्शगाव मासिकाचे प्रकाशन करण्यात आले. पूजा उमरेडकर या कराटे पटूने आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक मिळविले त्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कैलास मोते यांनी केले. संचालन कृषी उपसंचालक श्री कापसे यांनी केले तर आभार ज्ञानेश्वर भारती यांनी व्यक्त केले. यावेळी 31 गावातील सरपंच ग्रामसेवक, स्वयंसेवी संस्था आणि अधिकारी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result