महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या जनता तक्रार निवारण सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद सोमवार, ०४ फेब्रुवारी, २०१९


अकोला :
पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या जनतेच्या तक्रार निवारण सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तक्रार निवारण सभेमुळे सर्वसामान्यांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण होत असल्याने तक्रारकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. सार्वजनिक समस्यांसोबत वैयक्तिक तक्रारींचेही निराकरण होत असल्याने तक्रार निवारण सभा जनतेसाठी दिलासादायक उपक्रम बनला आहे.

मूर्तिजापूर तालुक्यातील राजनापूर (खिनखिनी) या गावातील विजेचा प्रश्न तातडीने निकाली काढल्याबद्दल गावकऱ्यांनी आज पालकमंत्री यांचे आभार मानले. या गावात कृषी पंपांसाठी स्वतंत्र डीपी देण्याबरोबरच वाढत्या लोकसंख्येमुळे घरांमधील विजेचा पुरवठा सुरळीत राहण्याकरिता आणखी एक डीपी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच प्रधानमंत्री हर घर बिजली योजनेतंर्गत दलीत वस्तीमधील ४६ घरांमध्ये वीजजोडणीकरिता सर्वेक्षणाचे काम सुरु झाल्याबद्दल गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

आज झालेल्या तक्रार निवारण सभेत विविध विभागांच्या ३७५ तक्रारी प्राप्त झाल्या. या सभेच्या माध्यमातून तक्रारदारांना दिलासा मिळाला असून अनेक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी स्वत: लोकांकडे जाऊन त्यांच्या तक्रारी स्विकारल्या. यावेळी त्यांनी तक्रारदारांची सहानुभूतीपूर्वक चौकशी करुन तक्रारींचा १५ दिवसांच्या आत निपटारा करण्यात येईल, असा दिलासाही त्यांना दिला.

जनतेच्या तक्रार निवारण सभेचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन सभागृहात करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, मनपा आयुक्त संजय कापडणीस, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. खिल्लारे, पालकमंत्री यांचे विशेष कार्यअधिकारी उज्ज्वल चोरे आदींसह विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.


पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी सामूहिक तक्रारींची त्वरीत दखल घेऊन संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांना तक्रारीवर कार्यवाही करण्याबाबत निर्देश दिले. यावेळी वन्यप्राण्यांकरीता चारा व पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी न्यू विदर्भ फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी वन्य प्राण्यांची वेशभूषा धारण करुन आलेल्या विद्यार्थ्यांमार्फत तक्रार सादर केली. अकोला तालुक्यातील मातोडी येथील पंधरा निराधार महिलांना घरकुल मिळावे यासाठी स्वत: या महिलांनी निवेदन दिले. चौहटाबाजार येथील विजय लबडे या तरुणाने स्वयंरोजगारासाठी बँकेकडून कर्ज मिळावे यासाठी निवेदन दिले. दुष्काळामुळे माफ करण्यात आलेले परीक्षा शुल्क महाविद्यालयाने घेऊ नये यासाठी बार्शिटाकळी येथील विद्यार्थ्यांनी सामूहिकरित्या तक्रार दिली, अशा विविध प्रकारच्या तक्रारी सभेत दाखल झाल्या. या प्रत्येक तक्रारींची स्वत: पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दखल घेऊन संबंधीत विभागांना तक्रारीचे निरासरन करण्याबाबत निर्देश दिलेत.

विभागनिहाय प्राप्त झालेल्या तक्रारींचा तपशील पुढील प्रमाणे आहे, महसूल विभाग - १४४  तक्रारी, पोलीस विभाग - २२, जिल्हा परिषद - ९२, मनपा - २२, विद्युत विभाग - १५, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था - ०५, भुमी अभिलेख - १५, कृषी विभाग - ०६, एस.टी. महामंडळ - ४, पाटबंधारे विभाग - ०२, जिल्हा शल्य चिकित्सक - ०३, जिल्हा अग्रणी बँक - २२, जिल्हा विपनण अधिकारी - ४, उपवनसंरक्षक - ०३, जात पडताळणी समिती - ०२, महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळ - ०१, उपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळ - ०१, महाबीज - ०१, औष्णिक विद्युत केंद्र, पारस - ०१, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना - ०१, सार्वजनिक बांधकाम विभाग - ०५, आयुक्त भविष्य निर्वाह निधी - ०२, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय - ०२ तक्रारी यावेळी प्राप्त झाल्या.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result