महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
धुळे जिल्ह्यासाठी बाजाराधारित पीक पद्धतीचे नियोजन करावे : जिल्हाधिकारी राहुल रेखावार गुरुवार, २५ एप्रिल, २०१९जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगाम आढावा आणि नियोजनाची बैठक संपन्न

 

धुळे : धुळे जिल्ह्यासाठी कृषी हा अत्यंत महत्त्वाचा घटक असून कृषी विज्ञान केंद्र व कृषी महाविद्यालयाने बाजाराधारित पीक पद्धतीचे नियोजन करीत आराखडा तयार करावा. या आराखड्याची जून 2019 पासून अंमलबजावणी करावी. जेणेकरुन अन्य शेतकऱ्यांना प्रेरणा मिळेल, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी येथे केल्या.

 

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आज दुपारी खरीप हंगाम 2018- 2019 चा आढावा व खरीप हंगाम 2019- 2020 नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरण डी., जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अशोक मुसमाडे, उपवनसंरक्षक दादासाहेब शेंडगे उपस्थित होते.

 

जिल्हाधिकारी श्री. रेखावार म्हणाले, कृषी विज्ञान केंद्र, कृषी महाविद्यालयाने या आराखडा तयार करताना बाजारपेठेचे विश्लेषण करुन कोणत्या काळात कोणते पीक घेतल्यास शेतकऱ्यांचा लाभ होईल याचा विचार करावा. यामुळे जिल्ह्यातील पीक पध्दती बदलण्यास मदत होवून शेतकऱ्यांना चांगला मोबादला मिळेल. प्रत्येक महसूल मंडळातून किमान एक शेतकरी अशा पध्दतीने पुढे आला पाहिजे. त्यासाठी आवश्यकता भासली, तर निधी उपलब्ध करुन दिला जाईल. कृषी विभागाने प्रत्येक गावाचे कृषी प्रोफाईल तयार केले आहे. ते जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यात खरीप पिकाखालील क्षेत्र, नावीण्यपूर्ण पिके, त्यांची उत्पादकता, सेंद्रीय शेती, प्रगतीशील शेतकऱ्यांची माहिती दिली आहे. ही माहिती स्थानिक उद्योजकांच्या विविध संघटनांना दिली आहे. त्यामुळे उद्योजक थेट संबंधित शेतकऱ्यांशी संपर्क साधू शकतील, असेही जिल्हाधिकारी श्री.रेखावार यांनी नमूद केले.

 

जिल्ह्यात गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिले. जुलै 2019 पर्यंत पाणी उपलब्ध असले, तरी नागरिकांनी पाण्याचा अतिशय काटकसरीने आणि जपून वापर करावा. कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, वन विभाग व जलसंपदा विभागाच्या समन्वयामुळे जनावरांसाठी पुरेसा चारा उपलब्ध आहे. आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बँकांनी तत्काळ पतपुरवठा करावा. कपाशीवरील बोंड अळी, मकावरील अमेरिकन लष्करी अळी निर्मूलनासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी. याशिवाय येत्या पावसाळ्यात वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित सर्व विभागांनी कार्यवाहीला गती देत महिनाअखेर अहवाल सादर करावा, असेही जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी विविध योजनांचा सविस्तर आढावा घेतला.

 

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. सोनवणे यांनी सांगितले, धुळे जिल्ह्यात खरीप हंगामात ज्वारी, बाजरी, कापूस, भात, सूर्यफूल, मका, मूग, सोयाबीन, उडिद, भूईमूग आदी पिके घेतली जातात. खरीप हंगामासाठी विविध प्रकारच्या बियाण्यांचे 40 हजार 325, तर कापसाच्या बियाण्याच्या 11.56 लाख पाकिटांची मागणी करण्यात आली आहे. तसेच खरीप हंगाम 2019 करीता 113900 टन खतांचे आवंटन मंजूर केले असून मार्च 2019 अखेर 29 हजार 852 टन रासायनिक खतांचा साठा उपलब्ध असल्याचे सांगितले. कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. पंकज पाटील यांनी गुलाबी बोंड अळी व मकावरील अमेरिकन लष्करी अळीच्या निर्मूलनासाठी करावयाच्या उपाययोजनांची माहिती दिली. तंत्र अधिकारी प्रियांका सोनवणे यांनी सूत्रसंचालन करुन आभार मानले. यावेळी विविध विभागांचे प्रमुख, तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result