महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
पुरातत्व विभागाच्या कामाची ओळख करून देण्यासाठी प्रयत्न - संचालक डॉ. गर्गे रविवार, २४ सप्टेंबर, २०१७
दाऊद दळवी स्मृती व्याख्यानमाला़

ठाणे :
पुरातत्व विभागाच्या कामाची लोकांना ओळख व्हावी तसेच हा विभाग जास्तीत जास्त लोकाभिमुख कसा होईल यादृष्टीने आपण प्रयत्न करणार असल्याचे पुरातत्व विभागाचे संचालक डॉ.तेजस गर्गे यांनी सांगितले. प्रसिद्ध इतिहास संशोधक स्व.दाऊद दळवी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ काल येथील टाऊन हॉलमध्ये आयोजित व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफतांना ते बोलत होते. कोकण इतिहास परिषद आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती.

डॉ.गर्गे म्हणाले की, गेल्या दोन तीन वर्षांत पुरातत्व विभागाच्या कामकाजात सकारात्मक बदल आला असून किल्ले व इतर पुरातत्व वास्तू संवर्धनाला वेग आला आहे. सध्या राज्य पुरातत्व विभागाकडे 351 वास्तू संवर्धनासाठी असून अजून निधी आणि मनुष्यबळ मिळावे म्हणून आमचा प्रयत्न सुरु आहे. त्यांनी पुरातत्व विभागाच्या नजरेतून इतिहासाकडे कसे पहिले जाते आणि कशा रितीने उत्खनन, संरक्षण, संवर्धन केले जाते त्याची शास्त्रीय माहिती सादरीकरणाद्वारे दिली. प्राग इतिहास, इतिहास काळ, इतिहास पूर्व काळ म्हणजे काय ते सांगितले. उत्खननाचे टप्पे तसेच पुरातत्व विभागाच्या काही महत्वाच्या कायद्यांची माहिती त्यांनी दिली. इतिहास प्रेमींच्या दृष्टीने कागदपत्रांना महत्व असले तरी पुरातत्व विभागाला तिथेच थांबता येत नाही, आम्हाला प्रत्यक्ष दगड धोंड्यांमध्ये काम करून संशोधन करावे लागते असे ते म्हणाले. ठाणे किल्ला संवर्धनाचा विषयही पाठपुरावा करून मार्गी लावला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. लवकरच पुरातत्व विभागाची सर्वंकष अशी वेबसाईटही तयार होईल, असेही त्यांनी सांगितले.

प्रारंभी कोकण इतिहास परिषदेचे अध्यक्ष रवींद्र लाड यांनी आपल्या प्रास्ताविकात वस्तूचे संवर्धन ही फक्त शासनाची जबाबदारी नव्हे तर जनतेचेही यात योगदान हवे असे सांगितले. जिल्हा माहिती अधिकारी अनिरुद्ध अष्टपुत्रे, परिषदेचे कार्यवाह सदाशिव टेटविलकर, अरुण जोशी यांनी देखील आपले विचार मांडले. प्रवीण कदम यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. यावेळी स्व.दाऊद दळवी यांच्या पत्नी देखील उपस्थित होत्या. त्यांनी परिषदेला एक लाख रुपयांच्या देणगीचा धनादेश याप्रसंगी सुपूर्द केला.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result