महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
चंद्रपूरमध्ये जगाला दिशा दाखवू शकणाऱ्या कोहिनूर हीऱ्यांची खाण : सुधीर मुनगंटीवार शुक्रवार, १३ सप्टेंबर, २०१९


२०४७ मध्ये भारत विश्वगुरू होईल : डॉ विजय भटकर

चंद्रपूर :
जगाला आवश्यक असणाऱ्या सर्व क्षमतांची उपलब्धता ऐतिहासिक चंद्रपूर जिल्ह्याच्या तरुणाईमध्ये आहे. कोळशाच्या खाणींच्या या शहरात जग बदलण्याची क्षमता असणारे कोहिनूर उपलब्ध आहेत. याची मला वारंवार खात्री पटली असून कला, क्रीडा, विज्ञान, संशोधन या क्षेत्रातही चंद्रपूर जगाचे नेतृत्व करील, असा आशावाद राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज व्यक्त केला.

स्थानिक प्रियदर्शिनी सभागृहामध्ये आयोजित चंद्रपूर जिल्हा व्यवसाय नियोजन स्पर्धेचे उद्घाटन पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांच्याहस्ते आज चंद्रपूरमध्ये झाले. तरुणाईच्या उस्फूर्त प्रतिसादात जिल्हा नाविन्यता समितीद्वारे आयोजित उन्नत भारत अभियानाच्या व्यवसाय नियोजन स्पर्धेचा उद्घाटन सोहळ्याला संबोधित करताना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा आशावाद व्यक्त केला.

या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर पद्मभूषण डॉ.विजय भटकर, आ.नानाभाऊ शामकुळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कल्याणकर, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, टाटा टेक्नॉलॉजीचे संचालक पुष्कराज कौलगुड, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहुल पाटील, उन्नत भारत अभियानाच्या विदर्भ संयोजक श्रीमती अर्चना बारब्दे, श्री. रामपाल सिंग, तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ. चंद्रशेखर थोरात, डॉ. मनिष उत्तरवार, जिल्हा नियोजन अधिकारी गु.रु. वायाळ, जिल्हा कौशल्य विकास सहाय्यक संचालक भैय्याजी येरमे आदींची उपस्थिती होती.

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या सर्व क्षेत्रातील प्रगतीच्या क्षमतेचा आलेख मांडला. ज्यांनी कधी विमान बघितले नव्हते त्या आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी विमानाच्या उंचीएवढे एव्हरेस्ट सर केले, मिशन सेवा अंतर्गत जिल्ह्यामध्ये उपक्रम राबविला जात असतानाच आयआयटी स्पर्धा पूर्व परीक्षांमध्ये देशातून प्रथम येण्याचा बहुमान बल्लारपूरच्या मुलाने मिळविला, मिशन शक्तीसाठी जिल्हाभरातील क्रीडांगणावर मुले सराव करत आहेत. इथल्या युवकांमध्ये प्रचंड शक्ती असून या ऊर्जेला डॉ. भटकर यांच्या सारख्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळाल्यास निश्चितच मुले जगाचे नेतृत्व करतील असे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यामध्ये उभ्या राहिलेल्या पायाभूत सुविधांबाबत यावेळी त्यांनी माहिती दिली. जिल्ह्यातील दोन्ही रेल्वे स्टेशनचे नाव देशपातळीवर गौरवान्वित केले गेल्याचे त्यांनी सांगितले. मिशन शौर्य, मिशन शक्ती, यासोबतच मिशन सेवाच्या माध्यमातूनही जिल्ह्यातील युवकांना संधी मिळावी यासाठी प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी गोंडवाना विद्यापीठाकडून या सर्व नव्या प्रकल्पांमध्ये भरीव योगदान अपेक्षित असल्याचे सांगितले. विद्यापीठ हे आगामी काळामध्ये केवळ खर्चाचे नाहीतर निधी उभारण्याचे केंद्र झाले पाहिजे. अशा पद्धतीचे शिक्षण त्या ठिकाणावरुन मिळाले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

सैनिकी शाळा, अटल बिहारी प्लॅनेटोरियम, वन अकादमी बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये उभे राहत असलेले सीआयआयआयटी केंद्र अशा अनेक संस्था जिल्ह्यांमध्ये उभ्या राहत असून विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा, जिल्ह्याच्या प्रगतीमध्ये आपले योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

भारत २०४७ मध्ये विश्वगुरू : डॉ. भटकर

पद्मभूषण डॉक्टर विजय भटकर यांनी चंद्रपूर मध्ये गेल्या तीस वर्षानंतर आपले आगमन झाले असून या काळातला बदल लक्षवेधी असल्याचे स्पष्ट केले. राज्याचे अर्थमंत्री म्हणून काम करणारे आमदार सुधीर मुनगंटीवार हे महाराष्ट्राचे तडफदार नेतृत्व असून त्यांनी केलेला चंद्रपूरचा कायापालट डोळ्यात भरणारा आहे असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी गेल्या दोन दिवसात स्थानिक अभियांत्रिकी महाविद्यालय वन अकादमी रेल्वे स्थानक व उभ्या करण्यात आलेल्या पायाभूत सुविधांबद्दल समाधान व्यक्त केले. चंद्रपूर सारख्या कधीकाळच्या मागास भागाला चांगल्या नेतृत्वामुळे झळाळी मिळत असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

यावेळी उन्नत भारत अभियाना बद्दल बोलताना त्यांनी कधी काळी हा देश अतिशय संपन्न देश होता. वैदीक काळामध्ये आपल्याकडे जगाचे नेतृत्व होते. मात्र आता पुन्हा एकदा सर्व क्षेत्रात प्रगती करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले की, आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या नैसर्गिक संसाधनातून आपल्याला विश्वगुरू करण्यापासून कोणीही अडथळा आणू शकत नाही. मात्र त्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्नपूर्वक पुढे येणे गरजेचे असून संशोधन वृत्ती बाळगणे आवश्यक आहे. चंद्रपूरमध्ये बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या भव्य इमारतीचा गौरव करताना त्यांनी चंद्रपूर मधल्या बांबूवर प्रक्रिया करून त्यापासून पेट्रीफाईड बांबू तयार करता येईल. यापासून तयार होणारा पदार्थ हा स्टीलपेक्षा अधिक फायदेशीर ठरेल. त्यामुळे जे आपल्याकडे उपलब्ध आहे त्यातूनच काय उत्तम करता येईल यावर लक्ष वेधावे असेही आवाहन त्यांनी केले.

परिवर्तनाच्या नव्या प्रवाहात येताना समाजाला आवश्यक असणाऱ्या संशोधनाला क्लास रूममध्ये शिकवले गेले पाहिजे, घडणारा बदल, येणारे नवीन कारखाने कसे असतील हे विद्यार्थ्यांना शिकत असतानाच बघायला मिळाले पाहिजे. यासाठी उन्नत भारत अभियान काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. या अभियानांमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या कल्पना विद्यार्थ्यांनी व सर्व क्षेत्रातील नागरिकांनी द्याव्यात, यातून एखादे संशोधन मोठ्या प्रमाणात असेही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले. जे उन्नत, उत्तम आहे ते आपल्या जिल्ह्यात असावे, असा ध्यास घेणारे पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून जिल्ह्यात नवीन प्रकल्प राबविला जात असून उच्च शिक्षणातून व कल्पनांमधून ग्रामीण भागाचा विकास साधण्यासाठी विविध क्षेत्रातील कल्पना आम्ही मागीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. उन्नत गाव असेल तर उत्तम प्रदेश निर्माण होईल व उन्नत भारताची कल्पना पुढे येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी टाटा टेक्नॉलॉजीचे संचालक पुष्कराज कौलगुड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अर्चना बारब्दे यांनीदेखील संबोधित केले. कार्यक्रमाचे संचालन हेमंत शेंडे तर आभार प्रदर्शन भैय्याजी येरमे यांनी केले. या कार्यक्रमांमध्ये नावीन्यपूर्ण संकल्पना सादर करणाऱ्या बचत गटांचा सत्कार करण्यात आला.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result