महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
सोशल मीडियाचा वापर करतांना नागरिकांनी जागरुक असणे गरजेचे - उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर मंगळवार, २३ जानेवारी, २०१८
बीड : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक नागरिकांचा सोशल मीडिया व ऑनलाईन व्यवहार करण्याचे प्रमाण वाढले असून सोशल मीडियाचा वापर आणि ऑनलाईन व्यवहार करतांना आपली फसवणूक होणार नाही. यासाठी नागरिकांनी स्वत: जागरुक असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी केले.

ट्रान्सफॉर्मींग महाराष्ट्र प्रकल्पांतर्गत सायबर गुन्ह्याविषयी माध्यम प्रतिनिधीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने बीड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील बैठक हॉल येथे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी पशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना श्री.खिरडकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर फॉरेन्सिक तज्‍ज्ञ मयुर लोमटे, माध्यमाचे प्रतिनिधी सुभास चौरे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

श्री.खिरडकर म्हणाले की, आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात डिजिटल तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर होत असून यामध्ये सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढल्याचेही दिसून येत आहे. नागरिकांना आकर्षक फायद्याची विविध प्रलोभने दाखवून त्यांची फसवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता डिजिटल व्यवहारात होणारी फसवणूक थांबविण्यासाठी डिजिटल व्यवहाराबाबतची सविस्तर माहिती प्रत्येक नागरिकांनी जाणून घेतली पाहिजे. तसेच सोशल मीडियाचा वापर जाबाबदरीने करण्याची गरज असून आपल्या चुकीच्या मेसेजमुळे आपल्या विरुद्ध सायबर गुन्हा नोंद होऊ शकतो. यासाठी प्रत्येक नागरिकांनी फेसबुक, व्हॉटस्अॅप, ट्विटर यासारख्या सोशल मीडियाचा वापर करतांना समाजमाध्यमातून धार्मिक भावना भडकवणारे संदेश, व्हिडिओ संदेश, छायाचित्रे किंवा अश्लिल साहित्य पोस्ट करु नये अथवा फॉरवर्ड, लाईक व शेअर करु नये. याबाबत नागरिकांनी दक्ष राहण्याची गरज आहे असे सांगून सर्वसामान्य व्यक्तींमध्ये डिजिटल व्यवहाराबाबत पत्रकारांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून अधिकाधिक जनजागृती करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी डिजिटल व्यवहाराबाबत असलेल्या पत्रकारांच्या अडचणी व शंकांचे निरसनही तज्ज्ञांमार्फत करण्यात आले.

फेसबुक, व्हॉटस्अप, ट्विटर वापरणाऱ्या नागरिकांनी नेहमीच सजग राहण्याची गरज आहे. तसेच अँड्रॉईड मोबाईलवर विविध प्रलोभणे देणारे मेसेज येत असतात. फिशिंगच्या माध्यमातून सर्वसामान्यांची फसवणूक करण्याच्या प्रमाणातही मोठ्या प्रमाणात वाढ होत असून मेलवर आलेल्या अनोपयोगी लिंक्स कधीच उघडू नका. त्याचबरोबर मी बँक अधिकारी बोलतोय असे सांगून ग्राहकाकडून त्यांचा एटीएम क्रमांक, पीन क्रमांक मिळवून ग्राहकाच्या परस्पर त्याच्या खात्यातील रक्कम काढून घेतली जाते. बँकेकडून कधीच त्यांच्या एटीएम अथवा पीन क्रमांकाबाबत विचारणा होत नसल्याने अशा प्रकारचे फसवे फोन आपल्याला आल्यास त्याबाबतही ग्राहकाने सजगता बाळगण्याचे गरज आहे.

यावेळी पत्रकार महेश वाघमारे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सायबर तज्ज्ञ मयुर लोमटे यांनी संगणक डेटा कशा प्रकारे चोरी केला जातो व त्याला आपण कसा प्रतिबंध घालु शकतो याबाबत तसेच नेटबँकींगचा वापर करताना त्याचा पासवर्ड कसा असावा तसेच फेसबुक, व्हॉट्सअॅप, टि्वटर वापर संपल्यानंतर लॉग आऊट झाले पाहिजे यासह इतर तांत्रिक बाबींवर सखोल असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अभिमन्यु औताडे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बीड सायबर सेल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश टाक, शेख सलीम, संतोष म्हेत्रे, अश्विन सुरवसे शेख आसेफ, अनिल डोंगरे यांनी प्रयत्न केले. या प्रशिक्षणास जिल्हा माहिती कार्यालयाचे पर्यवेक्षक ना.गो.पुठ्ठेवाड यांच्यासह सर्व दैनिकांचे संपादक, जिल्हा प्रतिनिधी, ई-माध्यमांचे स्ट्रींजर, छायाचित्रकार, व्हिडीओग्राफर यांच्यासह सायबर विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result