महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
नाविण्यपूर्ण कल्पनांना प्रकाशझोतात आणण्यासाठी ‘डिस्ट्रीक्ट बिजनेस प्लॅन कॉम्पिटीशन’मध्ये सहभागी व्हा शनिवार, ०९ फेब्रुवारी, २०१९

अकोला :  जनसामान्यांच्या नाविण्यपूर्ण कल्पनांना पुढे आणण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्यावतीने राबविण्यात येणारी डिस्ट्रीक्ट बिजनेस प्लॅन कॉम्पिटीशन अकोला जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. या स्पर्धेत नाविण्यपूर्ण कल्पना राबविणाऱ्या जास्तीतजास्त लोकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी केले.

डिस्ट्रीक्ट बिजनेस प्लॅन कॉम्पिटीशन योजनेद्वारा कृषि, सेवा, आरोग्य, तंत्रज्ञान या क्षेत्राशी निगडित उत्कृष्ट कल्पना मांडणाऱ्या 5 व्यक्तींची जिल्हास्तरावरुन निवड करण्यात येणार आहे. या 5 व्यक्तींना प्रोत्साहनपर 5 लाख रुपयांचे कार्यादेश देण्यात येणार आहे. विभाग स्तरावरील जिल्ह्यातून 15 स्टार्टअपची निवड करता येणार आहे. संबंधित प्रस्तावांची निवड जिल्हा समितीद्वारे करण्यात येईल. यासाठी जिल्हास्तरावर दि. 18 किंवा 19 फेब्रुवारी 2019 रोजी अकोल्यातील रतनलाल प्लॉट येथील आयटीआय येथे मेळावा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेचे नोडल अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांना नियुक्त करण्यात आले असून स्पर्धेत भाग घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयात फॉर्म उपलब्ध करुन देण्यात येतील. ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरुपात इच्छुकांना फॉर्म भरता येईल. विभागीय स्तरावरील मेळावा दि. 24 फेब्रुवारी 2019 रोजी अमरावती येथे घेण्यात येईल, अशी माहिती लोकशाही सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत पालकमंत्री यांनी आज दिली.

कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविताना प्रत्यक्ष कामाच्या जागी प्रशिक्षण देऊन लाभार्थ्यांना रोजगारक्षम बनविण्याचा मनोदयही पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी व्यक्त केला. जिल्ह्याच्या स्थानिक गरजा विचारात घेऊन दालमिल तसेच जेम्स ॲण्ड ज्वेलरी या क्षेत्रात कार्यरत उद्योजकांना कौशल्य विकास प्रशिक्षण संस्था म्हणून मान्यता देऊन त्यांना आपल्या गरजेनुसार कुशल मनुष्यबळ तयार करण्याची संधी देऊन रोजगारनिर्मिती व व्यवसायात वाढ ही दोन्ही उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. ज्या क्षेत्रात मागणी आहे त्याच  क्षेत्रातील कौशल्य विकास प्रशिक्षण तयार करुन मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती तयार करण्यात येईल. अकोला येथे राबविण्यात येत असलेला कुशल मनुष्यबळ निर्मितीचा पॅटर्न राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक प्राप्त करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result