महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
कल्पक तरूणांसाठी सांगली फर्स्ट हे प्रदर्शन सुवर्णसंधी - पालकमंत्री सुभाष देशमुख शनिवार, २४ फेब्रुवारी, २०१८
सांगली : सांगली फर्स्ट हे प्रदर्शन कल्पकता असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. कारण हीच मंडळी सांगलीचे भविष्य घडवणार आहेत. मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र प्रमाणेच मेक इन सांगली हे उद्दिष्ट या प्रदर्शनातून सफल होईल, असा विश्वास सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे व्यक्त केला.

वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय येथे आयोजित सांगली फर्स्ट या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. खासदार संजय पाटील, दीपक शिंदे म्हैसाळकर, गोपाळराजे पटवर्धन, श्रीनिवास पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

प्रस्तावित ड्राय पोर्टमुळे जिल्ह्यातील शेतकरी, व्यापारी, कारखानदार यांना लाभ होणार आहे, असे सांगून पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, सांगलीची भौगोलिक परिस्थिती भिन्न आहे. मात्र, येथे शेतीची बाजारपेठ चांगली आहे. येथील मिरची, गूळ, हळद आणि बेदाणे ही कृषि उत्पादने जगविख्यात आहेत. त्यामुळे जगभरातील व्यापारी सांगलीकडे वळवा. सांगलीचा क्रमांक प्रथम असेल, यासाठी प्रयत्न करा. या प्रदर्शनात मिळालेल्या नवनव्या संकल्पनांतून तरूण, युवा उद्योजक नवनवी उत्पादने तयार करतील. सांगलीचे नाव वैभवशाली करतील. शासनाचे सहकार्य आपणास आहे, असे ते म्हणाले.

पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, निसर्गाचा लहरीपणा, शेतमालाचे भाव या गोष्टी शेतकऱ्याच्या हातात नाहीत. अशा वेळी उत्पादन खर्चाच्या 50 टक्के नफा धरून हमीभाव ठरवण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे. कर्जमाफीपेक्षा शेतकऱ्यांना कर्जमागणीची वेळ येऊ नये, यासाठी शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक वाढावी, यासाठी राज्य शासन प्रयत्न करत आहे. राज्य शासन शेतकऱ्याच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

खासदार संजय पाटील यांनी हे प्रदर्शन 3 दिवसांपुरते न राहता ही एक चळवळ बनावी. यातून भावी उद्योजक घडावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते प्राईड ऑफ सांगली पुरस्कारांचे वितरण तसेच, प्रयोगशील आणि यशस्वी शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्री. देशमुख यांनी सत्कारमूर्तींचे अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमानंतर श्री. देशमुख यांच्यासह अन्य मान्यवरांनी प्रदर्शनातील विविध स्टॉलना भेट देऊन पाहणी केली. प्रदर्शनाच्या उत्तम संयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले.

दीपक शिंदे म्हैसाळकर यांनी प्रास्ताविक केले. हे प्रदर्शन 25 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. या प्रदर्शनात यंत्रमाग उद्योगातील तंत्रज्ञान, कृषिपूरक अन्न प्रक्रिया उद्योगातील तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि आरोग्य क्षेत्रामधील विविध स्टॉल्स सहभागी झाले आहेत. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे. यावेळी विविध शासकीय अधिकारी, मान्यवर, नागरिक, युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result