महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
प्रधानमंत्री किसान योजना मिशन मोडवर; अधिकारी -कर्मचाऱ्यांकडून गावोगाव जोरदार मोहीम रविवार, १० फेब्रुवारी, २०१९
अमरावती : प्रधानमंत्री किसान योजनेचा लाभ अधिकाधिक शेतकरी बांधवांना मिळावा व हे काम वेळेत पूर्ण व्हावे यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली असून शनिवार व रविवारी सुद्धा अधिकारी कर्मचाऱ्यांकडून गावात कागदपत्रे संकलन व तपासणी याद्या तयार करण्याचे काम वेगात होत आहे.

केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत 2 हेक्टर धारण क्षेत्र असलेल्या शेतकरी खातेदार यांना प्रति वर्षी सहा हजार रूपये अनुदान वितरण करण्याच्या महत्वाकांक्षी योजनेच्या प्रभावी व अतिशीघ्र अंमलबजावणीसाठी अमरावती जिल्ह्यातील महसूल यंत्रणा कृषी व ग्रामविकास विभागाच्या समवेत शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशीही, विभागीय आयुक्त पियुष सिंह यांच्या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांच्या नेतृत्वात धडाडीने कार्यरत आहे.

दि. 4 फेब्रुवारी 2019 रोजी शासन परिपत्रकाद्वारे घोषित या योजनेअंतर्गत अमरावती जिल्ह्यात एकूण 1974 महसुली गावांपैकी 1918 एवढ्या गावातील खातेदार याद्या ई-फेरफार बेटा मॉडेल (e-ferfar beta module) वरून डाऊनलोड करण्यात आल्या असून प्रत्यक्षात 14 तालुक्यातील 1090 एवढ्या गावांमधील 1,31,135 खातेदार यांचे आधार ओळखपत्र, बँक खात्याचा तपशील संकलित करण्यात आलेला आहे.

अपर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे आणि सर्व उपविभागीय अधिकारी ग्रामस्तरावर जाऊन योजनेच्या अंमलबजावणीत क्षेत्रस्तरावर काही अडचणी आहेत किंवा कसे? हे जाणून घेत आहेत. सर्व तहसीलदार हे आपल्या यंत्रणेसह ही योजना नेमून दिलेल्या कालबद्ध कार्यक्रमाप्रमाणे 100 टक्के राबविली जाईल, असे कसोशीने प्रयत्न करीत आहेत. गाव स्तरावर तलाठी, ग्रामसेवक व कृषी सेवक खातेदांराची माहिती गतीने संकलित करीत आहेत.

सर्व शेतकरी बांधवांनी आगामी दोन दिवसात स्वतः हून आपले आधार ओळखपत्र, बँक खात्याचा तपशील संबंधित गावाचे तलाठी, कृषीसेवक, ग्रामसेवक यांना उपलब्ध करून द्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांनी केले आहे. उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी, व्यंकट राठोड, मनोहर कडू, तहसीलदार गजेंद्र मालठणे, पुरुषोत्तम भुसारी, आशिष बिजवल, मनोज लोणारकर, प्रदीप पवार यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result