महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
मुरबाडच्या शेतकऱ्याला प्रधानमंत्र्यांच्या हस्ते किसान सन्मान निधीचे सन्मानपत्र प्रदान रविवार, २४ फेब्रुवारी, २०१९
ठाणे : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा राष्ट्रीय पातळीवर शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज गोरखपूर, उत्तर प्रदेश येथून झाला. यावेळी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील अल्याणी गावचे गौतम चिंतामण पवार यांनी प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते सन्मानपत्र स्वीकारले. महाराष्ट्रातून या कार्यक्रमासाठी निवड झालेले हे एकमेव शेतकरी होते.

या योजनेचा जिल्हास्तरीय समारंभ जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे पालकमंत्री एकनाथ शिंदे , जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील, विभागीय कृषी सहसंचालक विकास पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने, कृषी विकास अधिकारी प्रफुल्ल बनसोडे, एम. सावंत, तहसीलदार राज तवटे यांच्या उपस्थितीत झाला.

याप्रसंगी लाभार्थी 13 शेतकऱ्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आला.
यामध्ये अंबरनाथचे विजय ठोंबरे, मोहन कडव, भिवंडीचे अशोक बसवंत, सदानंद भोईर, विजय जाधव, मुरबाडचे गणपत भवारी, जनार्दन शेळके, बाळकृष्ण भोईर, शहापूरचे विनायक चौधरी, विष्णू खुताडे,तसेच येऊरच्या द्रौपदी जनाटे, अर्चना जनाटे यांचा समावेश होता

पात्र कुटुंबांची 100 टक्के नोंद

जिल्ह्याच्या 6 तालुक्यांमधील 954 गावांमधून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थींची नोंदणी वेगाने पूर्ण होत असून परिशिष्ट अ प्रमाणे सध्या 71 हजार 697 पात्र शेतकरी कुटुंबे असून त्या सर्व शेतकऱ्यांची माहिती एनआयसीच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत कल्याण तालुक्यातील पात्र कुटुंबाची संख्या 7556 आहे. अंबरनाथ तालुक्यात ही संख्या 4970 आहे. तर, भिवंडी तालुक्यात पात्र कुटुंबांची संख्या 16223 इतकी आहे. शहापूर तालुक्यात पात्र कुटुंबांची संख्या 18921 इतकी आहे. मुरबाड तालुक्यात पात्र कुटुंबांची संख्या 21303 आहे. ठाणे तालुक्यातील पात्र कुटुंबांची संख्या 2724 आहेत.

याव्यतिरिक्त अद्यापही कागदपत्रे सादर न केलेल्या आणि ज्यांची जमीन पाच एकरपेक्षा कमी असेल अशा शेतकरी कुटुंबांनी तसेच जे कुटुंब स्थलांतरित झाले असतील किंवा ज्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला असेल त्यांच्या कुटुंबियांनी आपली कागदपत्रे आधार कार्ड, बँकेचे पासबुक आणि बँकेचा आयएफएस कोड यांच्यासह तातडीने गावचे तलाठी, कृषी सहायक अथवा ग्रामसेवक यांच्याकडे सादर करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी यावेळी बोलताना केले

शेतकऱ्यांचा विश्वास वाढतोय- पालकमंत्री

याप्रसंगी बोलताना पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, शेतकरी कर्जमाफी, किसान सन्मान निधी, सॉईल कार्ड, पीक विमा अशा विविध योजनांचा लाभ मिळत असल्याने शेतकऱ्यांत विश्वास निर्माण होत आहे. समृद्धी महामार्गालगत देखील आम्ही कृषी समृद्धी केंद्रे उभारणार आहोत त्याचाही मोठा फायदा होणार आहे


आज ठाणे जिल्ह्यातून भेंडी, ढोबळी मिरची निर्यात होते. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे जलयुक्तच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहेत. बारमाही शेती शक्य आहे फक्त शेतकऱ्यांची इच्छा शक्ती हवी असेही ते म्हणाले.


प्रारंभी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका कृषी अधिकारी शिल्पा निखाडे यांनी केले.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result