महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस पोर्टलचा खरेदीसाठी वापर करण्याचे विभागीय डॉ. पाटील यांचे निर्देश मंगळवार, १० ऑक्टोंबर, २०१७
नवी मुंबई : शासकीय विभागांनी करावयाच्या कार्यालयीन खरेदी प्रक्रियेत पारदर्शकतेसाठी केंद्र शासनाने गव्हर्नमेंट ई - मार्केटप्लेस (GeM) पोर्टल विकसीत केले आहे. या पोर्टलवर कोकण विभागातील सर्व कार्यालयांनी आपल्या कार्यालयाची नोंदणी करून घ्यावी, असे आदेश विभागीय महसूल आयुक्त डॉ.जगदीश पाटील यांनी दिले. आज कोकण भवन येथे गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस पोर्टलच्या कार्यपद्धतीबाबत बैठक आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस उद्योग सहसंचालक शैलेश राजपूत, उद्योग सहसंचालक सदाशिव सुरवसे, उपायुक्त (सामान्य) महेंद्र वारभुवन उपस्थित होते.

डॉ.पाटील म्हणाले, या पोर्टलमुळे खरेदीसाठी जास्तीत जास्त पर्याय उपलब्ध होणार असून वस्तू व सेवा प्रचलित बाजारभावापेक्षा कमी किंमतीत उपलब्ध होणार आहेत. चांगल्या वस्तू व सेवा या माध्यमातून मिळणार आहेत. सर्व शासकीय, निमशासकीय संस्थांना या वेबपोर्टलद्वारे खरेदीची कार्यपद्धती स्वीकृत करून लागू करण्यात आली आहे. दि.1 डिसेंबर 2016 रोजीच्या सुधारित खरेदी धोरणातील तरतुदीचा अवलंब करून खरेदी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

श्री.राजपूत यांनी प्रास्ताविकात सांगितले की, गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस पोर्टलवर खरेदीदार विभागांना व उत्पादक पुरवठादारांना नोंदणीकृत होण्यासाठीची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. सद्या या पोर्टलवर 1 लाख 84 हजार वस्तू व 17 सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या पोर्टलच्या वापरामुळे शासकीय विभागाद्वारे होणाऱ्या खरेदीप्रक्रियेच्या कालावधीमध्ये बचत, उत्कृष्ट वस्तूंचा पुरवठा, वाजवी किंमत व संपूर्ण खरेदी प्रक्रियेमध्ये पारदर्शकता येणार आहे.

श्री.सुरवसे यांनी यावेळी गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस पोर्टलद्वारे ऑनलाईन खरेदी प्रक्रियेचे सादरीकरण केले. या बैठकीस कोकण भवन येथील विविध कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result