महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
अवघ्या दिड वर्षाच्या कालावधीत गावांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळणार - बबनराव लोणीकर गुरुवार, ३१ जानेवारी, २०१९

65 गावे ग्रीड पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन

परभणी : मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमातर्गंत पालम तालुक्यातील 65 गावांची ग्रीड पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून अवघ्या दिड वर्षात गावांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळणार असल्याची ग्वाही राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.

पालम तालुक्यातील चाटोरी येथे 65 गावे ग्रीड पाणी पुरवठा योजनेचा भुमिपूजन समारंभ आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी माजी आमदार विजय गव्हाणे, गणेश रोकडे, अभय चाटे, राहुल लोणीकर, जिल्हाधिकारी पी.शिवशंकर, उपविभागीय अधिकारी विश्वांभर गावंडे आदि मान्यवर उपस्थित होते.

श्री.लोणीकर म्हणाले की, तेलंगाणा, आंध्र प्रदेश या राज्यासह श्रीलंका, ईस्त्राईल आदि देशात प्रमुख अधिकाऱ्यांच्या गटासह भेटी देऊन प्रत्यक्ष वॉटर ग्रीडची पाहणी करुन नंतरच ही योजना राबविण्यात येत असून 65 गावे ग्रीड पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पालम तालुक्यातील उर्ध्व मनार प्रकल्प (लिंबोटी धरण) यातून पालम तालुक्यातील 64 व गंगाखेड तालुक्यातील एक अशा एकूण 65 गावांना पिण्यासाठी व घरगुती वापरासाठी केवळ 10 रुपयांत एक हजार लिटर पाणी मिळणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

परभणी जिल्ह्यात शासनाच्या विविध योजना राबवून विकासात्मक कामे केली जात आहेत तसेच रस्ते, वीज व पाण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यात येत आहे. 65 गावे ग्रीड पाणी पुरवठा योजना 100 वर्षे टिकावी यासाठी गुणवत्तापूर्ण काम करण्यावर भर दिला जात आहे असे सांगून संबंधित अधिकारी व कंत्राटदाराला गुणवत्तापूर्ण काम करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

65 गावे ग्रीड पाणी पुरवठा योजनेमुळे प्रकल्पातील पाणी थेट गावापर्यंत पोहोचणार असून 65 गावातील वॉटर ग्रीड सुरु झाल्यास उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचे सुयोग्य व्यवस्थापन होऊन टँकरमुक्त गाव होण्यास मदत होईल, असे जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत 65 गावे ग्रीड पाणी पुरवठा योजना राबविण्यात येत असून या योजनेची अंदाजित किंमत 56 कोटी 64 लाख रुपये आहे.

या शुभारंभ कार्यक्रमास चाटोरी गावचे सरपंच, पदाधिकारी, ग्रामस्थ यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

पालम येथे रस्त्याचे भूमिपूजन

पालम नगर पंचायतीअंतर्गत वार्ड क्र.17 मधील ठोक तरतूद अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी माजी आमदार विजय गव्हाणे, अभय चाटे, गणेश रोकडे, राहूल लोणीकर यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result