महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
५० कोटी वृक्षलागवड - तापमानवाढ रोखण्यासाठी वृक्षलागवडीला पर्याय नाही - राज्यमंत्री सदाभाऊ खोत रविवार, ०१ जुलै, २०१८
वृक्षलागवड बनली लोकचळवळ
दंडोबा डोंगरावर उत्साहात वृक्षारोपण

सांगली
: वाढते तापमान माणसाला विनाशाकडे नेत आहे. तापमानवाढ रोखण्यासाठी तसेच माणसाला शुद्ध हवा, भरपूर पाणी उपलब्ध होण्यासाठी वृक्षलागवडीला पर्याय नाही. 50 कोटी वृक्षलागवड या महत्वाकांक्षी मोहिमेतून संपूर्ण मानव जातीला वृक्षलागवडीचा संदेश मिळाला असून, जलयुक्त शिवार योजनेनंतर ही मोहीम लोकचळवळ बनली आहे, हे या उपक्रमाचे यश आहे. यातून पुढील वर्षापर्यंत राज्यात 50 कोटी वृक्षलागवड झालेली असेल, असा विश्वास कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला.

सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील दंडोबा डोंगर, भोसे येथे जुलै 2018 मध्ये 13 कोटी वृक्षलागवड मोहिमेंतर्गत मुख्य कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व खासदार संजय पाटील, आमदार सुरेश खाडे, जिल्हाधिकारी वि. ना. काळम, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, उपवनसंरक्षक (प्रा.) डॉ. भारतसिंह हाडा, सह्याद्रि व्याघ्र प्रकल्प (राखीव) च्या उपसंचालिका डॉ. विनिता व्यास, विभागीय वन अधिकारी विश्वास जवळेकर, पद्मश्री विजयकुमार शहा आदि उपस्थित होते.

वृक्षलागवड ही केवळ वन विभाग आणि सामाजिक वनीकरण विभागाची जबाबदारी आहे, अशी काहीशी भावना होती. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणेतून आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून राज्यात सन 2019 पर्यंत 50 कोटी वृक्षलागवड मोहीम हाती घेण्यात आली आहे. राज्याची लोकसंख्या 13 कोटी आहे. याचा अर्थ प्रत्येक व्यक्तीने किमान चार झाडे लावणे अपेक्षित आहे, असे स्पष्ट करून राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, या मोहिमेअंतर्गत शेतकऱ्यांनाही त्यांच्या बांधावर वृक्षलागवड करण्यासाठी विविध फळझाडांची रोपे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. शासकीय यंत्रणांच्या जोडीला हजारो हात वृक्षलागवडीसाठी पुढे आले आहेत. त्यातून ही लोकचळवळ बनली आहे. या मोहिमेतून संपूर्ण मानवजातीला वृक्षलागवडीच्या कर्तव्याचा संदेश दिला गेला. केवळ वृक्षलागवड करून न थांबता वृक्षसंगोपन ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे, हे जाणून निसर्गसंपदेचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी कटिबद्ध होऊया, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

खासदार संजय पाटील म्हणाले, सन 2017 ते 19 या कालावधीत संपूर्ण राज्यात 50 कोटी वृक्षारोपण मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत यावर्षी राज्यभरात 13 कोटी वृक्षलागवड करण्यात येणार आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी 50 कोटी वृक्षलागवड हा राज्य शासनाचा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. एक झाड दोन ते तीन पिढ्यांना उपयुक्त आहे. त्यामुळे हे समाजोपयोगी काम आहे. गत वर्षी 2017 च्या पावसाळ्यात 4 कोटी वृक्षलागवड कार्यक्रमांतर्गत सांगली जिल्ह्यास एकूण 8 लाख, 84 हजार उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले होते. त्यानुसार सांगली जिल्ह्यात 9 लाख 14 हजार वृक्षलागवड करण्यात आली होती. यावर्षीही 29 लाख 17 हजार वृक्षलागवडीच्या उद्दिष्टापेक्षा जास्त वृक्ष लागवड जिल्ह्यात होईल, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

50 कोटी वृक्षलागवड या महत्त्वांकाक्षी मोहिमेत गत वर्षी सांगली जिल्ह्यात केलेल्या वृक्षारोपणातील 85 ते 87 टक्के रोपे जिवंत आहेत, असे जिल्हाधिकारी वि. ना. काळम यावेळी म्हणाले.

पद्मश्री विजयकुमार शहा यांनी जिल्ह्यात 5 लाख विद्यार्थी आहेत. वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन करण्याचे त्यांनी मनावर घेतले तर जिल्हा हिरवागार होईल, अशी अपेक्षा व्यक्त करून विद्यार्थ्यांना वृक्षसंवर्धनाची प्रतिज्ञा दिली.

यावेळी वड, आंबा, पिंपळ, जांभूळ, बेल, कडुनिंब, सीताफळ आदि झाडे मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र साबळे, भूजल सर्वेक्षणचे दिवाकर धोटे, उपजिल्हाधिकारी किरण कुलकर्णी, मिरजचे उपविभागीय अधिकारी डॉ.विकास खरात, कवठेमहांकाळच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे, मिरजचे तहसीलदार शरद पाटील, मिरज पंचायत समितीचे आणि भोसे व खरशिंग ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांच्यासह वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, प्राणीमित्र संघटना, निसर्ग प्रेमी, शासकीय, निमशासकीय संस्था, विविध शाळा, विद्यालयांचे विद्यार्थी, नागरिक, महिला, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मोहिमेसाठी वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result