महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
शहापूर उप जिल्हा रुग्णालयात अद्ययावत सीटी स्कॅन मशीनचे आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन शनिवार, ११ मार्च, २०१७
ठाणे : शहापूर येथील उप जिल्हा रुग्णालय येथे बसविण्यात आलेल्या अद्ययावत सीटी स्कॅन मशीनचे उद्घाटन आज आरोग्य मंत्री डॉ दीपक सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रमुख उपस्थिती होती.

आदिवासी उप योजनेंतर्गत हे सीटी स्कॅन मशीन बसविल्याने या परिसरातील रुग्णांची खूप सोय होणार असून आता या कारणासाठी मुंबई ठाण्याकडे जाण्याची गरज उरली नाही. शिवाय गरीब रुग्णांचे पैसेही वाचतील असे सांगून आरोग्यमंत्री म्हणाले की, अशा प्रकारे २ कोटी ६० लाखांची तरतूद केल्याबद्धल पालकमंत्र्यांचा मी आभारी आहे. अशा प्रकारे निधी दोन तीन जिल्ह्यांमध्येच अशा प्रकारे या कारणांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. नजीकच्या काळात एमआरआय मशीन्सपण आपण उपलब्ध करून घेऊन रुग्णालयांना सुसज्ज केले पाहिजे हे पाहिले जाईल. गेल्या काही वर्षांपासून किडनीविषयक रोगात होत असलेल्या वाढीमुळे डायलेसीसची सारखी गरज पडत आहे. परंतु ही यंत्रे पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध नाहीत. मुंबई मनपाप्रमाणे ठाणे जिल्ह्यातील शासनाच्या व मनपा रुग्णालयांमध्ये सार्वजनिक खाजगी भागीदारी पद्धतीने डायलेसीस मशीन्स उपलब्ध करून देण्याचा मनोदय त्यांनी बोलून दाखविला. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांवर तोडगा काढला असून आता केवळ १० ते १५ टक्के पदे रिक्त आहेत अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. कुपोषण शून्यावर आणण्याचा आपला निर्धार असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या आता १ कोटीपेक्षा जास्त झाली आहे. त्या मानाने शासकीय रुग्णालयांची सुविधा कमी पडते व या यंत्रणेवर ताण येतो. ठाण्याच्या सिव्हील रुग्णालयाचे रुपांतर लवकरच सुपर स्पेशालिटीमध्ये झाल्यास अनेक सुविधा याठिकाणी उपलब्ध होतील.त्या दृष्टीने पाऊले टाकण्यात येत असून लवकरच या रुग्णालयांच्या पुनर्विकासास सुरुवात होईल. डॉक्टर्सकडून आपण च्नागल्या सेवेची अपेक्षा करतो तर मग त्यांना उत्तम सोयी सुविधाही दिल्या पाहिजेत तर याचा फायदा जिल्ह्यातील नागरिकांनाच होईल असेही ते म्हणाले. डॉ रत्ना रावखंडे यांचेही याप्रसंगी भाषण झाले. त्यांनी शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालय कसे सुसज्ज व सुविधायुक्त होत आहे याविषयी सांगितले.

याप्रसंगी आमदार पांडुरंग बरोरा यांनीही शहापूर तालुक्याच्या काही समस्या सोडविण्यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली. यावेळी आमदार शांताराम मोरे, माजी आमदार दौलत दरोडा, नगराध्यक्ष योगिनी धानके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ केम्फी पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बी.एस.सोनावणे, प्रकाश पाटील आदींची उपस्थिती होती.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result