महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती करण्यासाठी शासन कटिबद्ध - गिरीष महाजन शुक्रवार, ०१ सप्टेंबर, २०१७
वसंतदादा मार्केट यार्ड सांगली येथे माझा बळीराजा ॲपचे उद्घाटन

सांगली :
शासनाने शेतकऱ्याला व शेतीला प्राधान्य दिले आहे. जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. ठिबक सिंचन व बंद पाईपलाईनद्वारे शेतीला पाणी देऊन शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री गिरीष महाजन यांनी आज येथे केले.

वसंतदादा बाजार समिती सांगली येथे सांगली कृषि उत्पन्न बाजार समितीच्या पद्मभूषण वसंतदादा पाटील स्मृती भवनाच्या सभागृहात माझा बळीराजा ॲप, ऑनलाईन बेदाणा विक्री व शुद्ध पेयजल एटीएम लोर्कापण उद्घाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कृषि व फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजयकाका पाटील, आमदार डॉ.पतंगराव कदम, आमदार सुरेश खाडे, माजी आमदार दिनकरतात्या पाटील, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत शेजाळ, मकरंद देशपांडे, पृथ्वीराज पाटील आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

माझा बळीराजा ॲपचे उद्घाटन झाल्याचे जाहीर करून जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री गिरीष महाजन म्हणाले, या ॲपचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज, बाजारभाव, शेतीविषयक तसेच इतर अनेक प्रकारची माहिती मोबाईलवर मिळणार आहे. सांगली कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये अडीच हजार कोटींची उलाढाल होत असून ही एक मोठी बाजारपेठ आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम मार्केट कमीटीमार्फत होत आहे. शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी शासन शेतकऱ्यांना पाणी, वीज व शास्त्रोक्त पध्दतीने शेती करण्यासाठी तंत्रज्ञान विकसीत करण्यासाठी प्रयत्नशील आहे. पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी ठिबकचा स्वीकार करावा लागेल. कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त शेती करण्यासाठी नियोजन करावे. ठिबकमुळे जमिनीची पोत चांगली होते, उत्त्पन्नातही वाढ होते. ठिबक सिंचन व बंद पाईपलाईनव्दारे पाणी दिल्यामुळे पाण्याची बचत होऊन जास्तीत जास्त क्षेत्राला पाणी मिळणार आहे. जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. सिंचन योजनांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. येत्या दोन वर्षात सर्व कामे पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

कृषि व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, सांगली बाजार समिती ही हळद व बेदाण्यासाठी आशिया खंडात एक नंबरची बाजार समिती आहे. या बाजार समितीत मोठ्या प्रमाणात परराज्यातून शेतमालाची आवक होते. राज्यातील व्यापाऱ्यांच्या व शेतकऱ्यांचा विश्वास या बाजार समितीने संपादन केला आहे. एक चांगला आदर्श कारभार बाजार समितीमध्ये सुरू आहे. महाराष्ट्र शासनाने जागतिक बँकेच्या माध्यमातून या बाजार समितीला 1 कोटी 40 लाख रूपयांचे अनुदान दिले असून सध्या 4 कोटी 20 लाख रूपयांची कामे सुरू आहेत. मोठी हळदपेठ म्हणून ही बाजार समिती नावारूपाला आलेली आहे. या बाजारपेठेतून हळद व बेदाणा जागतिक बाजारपेठेत जात आहे. व्यापाऱ्यांना व शेतकऱ्याला जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी या ठिकाणी निर्यात केंद्र उभारणे गरजेचे असल्याचे सांगून कृषि व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, निर्यात केंद्र सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव पणन मंडळाकडे सादर करावा. या प्रस्तावास मंजुरी देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

यावेळी खासदार संजयकाका पाटील व आमदार डॉ. पतंगराव कदम यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. स्वागत व प्रास्ताविक सभापती प्रशांत शेजाळ यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी माझा बळीराजा ऍ़पबाबत सविस्तर माहिती दिली. आभार उपसभापती रामगोंडा संती यांनी मानले. सूत्रसंचालन विजयदादा कडणे यांनी केले.

प्रारंभी विष्णू अण्ण्णा फळ मार्केट यार्ड येथे शुध्द पेयजल एटीएमचे व बाजार समिती सांगली येथे ऑनलाईन बेदाणा विक्रीचे उद्घाटन करण्यात आले.

या कार्यक्रमास कृषि उत्पन्न समितीचे पदाधिकारी, व्यापारी, तोलाई, हमाल संघटनेचे प्रतिनिधी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result