महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
पत्रकारितेत सामाजिक बदलाची ताकद - शेखर गायकवाड बुधवार, ०४ जानेवारी, २०१७
  • पत्रकार व अधिकारी कार्यशाळेस उत्तम प्रतिसाद

सांगली : पत्रकारितेत सामाजिक बदलाची ताकद आहे. त्यामुळे समाजात तेढ निर्माण करणारी, अपुऱ्या माहितीवरून गैरसमज निर्माण करणारी सनसनाटी बातमीदारी न करता, पत्रकारांची भूमिका समाजाला दिशादर्शक आणि सामाजिक सुधारणा घडविणारी असावी. यासाठी जिल्हा माहिती कार्यालय आणि सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालयाने आयोजित केलेली पत्रकार व अधिकारी कार्यशाळा उपयुक्त आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी येथे केले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे जिल्हा माहिती कार्यालय, सांगली आणि सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पत्रकार व अधिकारी कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, दै.पुण्यनगरीच्या मुख्य संपादिका राही भिडे, जिल्हा सरकारी वकील उल्हास चिप्रे, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन कवले, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर, समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवढे, सहाय्यक जिल्हा सरकारी वकील स्मिता शिंदे व्यासपीठावर उपस्थित होते.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, निर्भया योजना यांची उदाहरणे देऊन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड म्हणाले, एखाद्या घटनेमागची वस्तुस्थिती समाजाला माहीत नसते. बऱ्याचदा कायद्याचा गैरफायदा घेतला गेल्यामुळे खऱ्या पिडीतावर एक प्रकारे अन्यायच होतो. अशा घटनांची चांगली-वाईट बाजू समाजासमोर आणण्याची आणि समाजात सौहार्दाचे वातावरण राखण्याची जबाबदारी प्रसारमाध्यमांवर असते. त्यामुळेच निकोप समाजाच्या उन्नतीसाठी प्रसार माध्यमांची भूमिका महत्त्वाची असून प्रशासन व जनता यांच्यामध्ये ते समन्वय साधतात. त्यामुळे प्रसारमाध्यमांनी वस्तुस्थितीजन्य बातमी देण्याकडे भर द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करून श्री.गायकवाड यांनी प्रशासन करीत असलेल्या कामांची योग्य माहिती प्रसारमाध्यमांना होण्यासाठी कार्यशाळांचे आयोजन ही काळाची गरज आहे, असे स्पष्ट केले.

सामाजिक सुधारणा आणि पत्रकारिता या विषयावर मार्गदर्शन करताना मुख्य संपादिका राही भिडे यांनी पत्रकारितेचे स्वातंत्र्यपूर्व काळातील स्वरूप, जागतिकीकरणानंतरची स्थिती, सद्यस्थिती, अपेक्षा आणि वास्तव यांचा ऊहापोह केला. त्या म्हणाल्या, स्वातंत्र्यपूर्व काळापासून सामाजिक सुधारणांमध्ये पत्रकारितेचे मोठे स्थान आहे. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये पत्रकारितेचे स्वरूप एका व्रताप्रमाणे होते, हे सांगताना त्यांनी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळक, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, शि. म. परांजपे यांच्यासह दीनबंधु, दीनमित्र यासारख्या वृत्तपत्रांचे आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक बदल आणि सुधारणांमधील योगदान विशद केले.

राही भिडे म्हणाल्या, समाजाच्या सदृढतेसाठी शासनाचे काम शेवटच्या तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचवण्याचे काम प्रसार माध्यमे करतात. सध्याच्या व्यावसायिकीकरणाच्या युगामध्ये पत्रकारितेमध्ये अनेक स्थित्यंतरे होत आहेत. अशा स्पर्धेच्या युगात सामाजिक सुधारणांची पत्रकारितेची परंपरा टिकविण्याचे आव्हान निर्माण होऊन आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे. व्यावसायिकरणामध्ये वृत्तपत्र चालविणे कठीण झाले असले तरी शासनाच्या जाहिरात धोरणामुळे ग्रामीण भागातील छोट्या वृत्तपत्रांनाही आधार मिळाला आहे, असे सांगून श्रीमती भिडे म्हणाल्या, समाजामध्ये सौहार्दपूर्ण वातावरण, जाती-जातींमधील भेद नष्ट करणे, सामाजिक सलोखा निर्माण करणे यासाठी लिखाण करणे हीच काळाची गरज बनली आहे. समाजामध्ये खरोखरच जर सुधारणा घडवायची असेल तर पत्रकारांनी आपला विकास पत्रकारितेबाबतचा दृष्टीकोन सकारात्मक ठेऊन लिखाण केल्यास समाजामध्ये विकासाचे परिवर्तन नक्कीच घडेल, असा विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला.

उपजिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी पोस्ट ट्रुथ एरा ही संकल्पना विशद केली. ते म्हणाले, सामाजिक अभिसरण होईल, तेव्हा जाती व्यवस्था कमी होईल. त्यासाठी मूल्यांचे आंतरिकीकरण होणे आवश्यक आहे. तरच कायद्याचा धाक राहील. परंतु, सध्याच्या पोस्ट ट्रुथ एरा या संकल्पनेमध्ये तथ्य किंवा वस्तुस्थितीचे महत्त्व कमी झाले आहे व भावनांना अधिक महत्त्व आले आहे. त्यावरून जनमत तयार होते. अशा वेळी सामाजिक दृष्टीकोन, सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन पत्रकारांनी लिखाण करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

जिल्हा सरकारी वकील उल्हास चिप्रे यांनी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत सविस्तर माहिती दिली. पोलीस उपअधिक्षक हणमंत वाकुडे यांनी पोलीस अधिकाऱ्यांची जबाबदारी व कर्तव्ये याबद्दल माहिती दिली. सहाय्यक जिल्हा सरकारी वकील स्मिता शिंदे यांनी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, निर्भया योजना आणि पत्रकारांकडून अपेक्षा याबाबत मार्गदर्शन केले. पोलीस निरीक्षक राजु मोरे, सामाजिक कार्यकर्ते शाहिन शेख, पत्रकार शिवराज काटकर, हरिष यमगर, रविंद्र कांबळे, कुलदीप देवकुळे, प्रताप मेटकरी यांनी मनोगत व्यक्त केले तर पोलीस कॉन्स्टेबल मुरलीधर कुलकर्णी यांनी पोलीस या विषयावर कविता सादर केली.

प्रारंभी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन कार्यशाळेची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त सचिन कवले यांनी केले. सूत्रसंचालन ए. के. पाटील तर आभार समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवढे यांनी मानले.

या कार्यशाळेस जिल्ह्यातील वृत्तपत्रांचे संपादक, ज्येष्ठ पत्रकार, कवठेमहांकाळ, विटा, नांद्रे यासह जिल्ह्यातील विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधी, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी, समाज कल्याण विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result