महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
व्यापाऱ्यांची पूर्ण माहिती घेऊनच द्राक्ष बागांची विक्री करावी - सदाभाऊ खोत मंगळवार, ०३ जानेवारी, २०१७
सांगली : जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांनी फसवणूक टाळण्यासाठी द्राक्ष खरेदीसाठी आलेल्या व्यापाऱ्यांची पूर्ण माहिती घेऊनच त्यांना द्राक्ष बागेची विक्री करावी, असे आवाहन कृषि व फलोत्पादन, पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले आहे.

श्री.खोत म्हणाले, सांगली जिल्ह्यामध्ये द्राक्षाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. द्राक्ष खरेदीसाठी परराज्यातून व्यापारी स्थानिक व्यापारी, शेतकऱ्यांच्या मदतीने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना दराचे आमिष दाखवून द्राक्ष बाग खरेदी करतात. द्राक्ष माल घेऊन गेल्यानंतर द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांची फसवणूक झालेल्या तक्रारी शासनाकडील विविध विभागाकडे दरवर्षी प्राप्त होतात. फसवणूक झालेले शेतकरी द्राक्ष खरेदीस आलेल्या व्यापाऱ्यांची पूर्ण माहिती (ओळखपत्र, परवाना प्रत) घेत नसल्याने पुढील कारवाईस अडथळे निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. तेव्हा द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांनी द्राक्ष विक्री करीत असताना आर. टी. जी. एस., ड्राफ्ट, रोखीनेच व्यवहार करावा. माल देत असताना संबंधित शेतकऱ्याने खरेदीदार, दलाल यांच्याशी करार करून घेणे आवश्यक आहे. तसेच डिलिव्हरी चलन तयार करून या डिलिव्हरी चलनामध्ये दलालाचे नाव, पूर्ण पत्ता, फोन नंबर, मोबाईल नंबर, गाडी नंबर, ड्रायव्हरचे नाव इत्यादीचा उल्लेख असावा. ही चलन प्रत तीन प्रतीत करावी.

दलाल, द्राक्ष खरेदीदार यांची संपूर्ण माहिती संकलित करून शेतकऱ्यांनी जवळ ठेवावी. उदा. पॅनकार्ड, ओळखपत्र, स्थानिक रहिवास पत्ता घ्यावा. एखादा दलाल, खरेदीदार प्रत्यक्ष बाजारभावापेक्षा अति जादा दराने द्राक्ष खरेदी करीत असेल तर अशा व्यवहाराबाबत शेतकऱ्यांने जागृत रहावे व अशा खरेदीदारांचे नाव संबंधित बाजार समिती, कार्यालयास तोंडी अथवा लेखी माहिती द्यावी. खरेदीदार, दलाल ज्या वजनकाट्यावर वजन करून द्राक्षे खरेदी करतो ती वजनकाटे प्रमाणित आहेत का याबाबत वजनकाटा प्रमाणित केल्याबाबतचा दाखला पाहणी करावी व वजन इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावरच करावे. घाई गडबडीने ॲडव्हान्स घेऊन द्राक्ष बाग विक्रीचा व्यवहार करू नये. खरेदीदाराची, दलालाची संपूर्ण माहिती घेऊनच द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याने व्यवहार करावा.

राज्यातील किंवा परराज्यातील दलाल किंवा खरेदीदार माल खरेदीस आल्यानंतर प्रथमत: स्वत: रोखीने द्राक्ष खरेदी करतात, विश्वास संपादन करतात व काही खरेदीदार तद्नंतर स्थानिक एखाद्या व्यक्तीस द्राक्ष खरेदीसाठी मध्यस्थ म्हणून नेमून खरेदी व्यवहार केला जातो. अशा व्यवहारात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी सदरची मध्यस्थ व्यक्ती ही स्थानिक प्रतिष्ठीत व्यक्ती किंवा स्थानिक सधन कुटुंबातील व्यक्ती आहे याची खात्री झाल्यानंतरच द्राक्ष विक्रीचा व्यवहार करावा. शक्यतो द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी आपली द्राक्षे संबंधित बाजार समितीचे परवानाधारक व्यापारी यांच्याकडे विक्री करावी.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result