महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
तीन वर्षात शेतकऱ्यांचे कृषी पंप सौर ऊर्जेवर चालविणार - चंद्रशेखर बावनकुळे शुक्रवार, १८ ऑगस्ट, २०१७
वर्धा : येत्‍या तीन वर्षात जिल्‍ह्यातील सर्व शेतकऱ्यांचे कृषिपंप सौर ऊर्जेवर चालविण्‍यात येणार आहे. यासाठी प्रत्‍येक गावामध्‍ये सौर वीज प्रकल्‍प उभारण्‍यात येणार आहे. तसेच दलित वस्‍ती सुधार योजने अंतर्गत प्रत्‍येक गावात सौर पथदिवे, ग्रामपंचायतच्‍या नळ योजना आणि जिल्‍हा परिषदेच्‍या सर्व शाळांना सौर वीज पुरवठा कार्यान्वित करण्‍यात येणार असल्‍याचे प्रतिपादन राज्‍याचे ऊर्जा व उत्‍पादन शुल्‍क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

आज विद्युत वितरण कंपनीचे कार्यालय येथे विविध विद्युत उप केंद्राचे भूमीपूजन, लोकार्पण सोहळा व जनता अदालत प्रसंगी ते बोलत होते. इंटीग्रेटेड पावर डेवलपमेंट योजने अंतर्गत भारत सरकारच्‍या शहरी विद्युत वितरण प्रणालीच्‍या सशक्‍तीकरणाच्‍या हेतूने अल्‍लीपूर, तरोडा, हिंगणघाट, पुलगाव व कारला चौक वर्धा येथे विद्युत उपकेद्राचे भूमीपूजन व खरांगना, मांडगाव व गिरोली उपकेद्राचे लोकापर्ण सोहळ्याचे आयोजन करण्‍यात आले. यावेळी कार्यक्रमाला खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर, जिल्‍हा परिषद अध्‍यक्ष नितीन मडावी, नगराध्‍यक्ष अतुल तराळे, जिल्‍हा परिषद सदस्‍य पंकज सायंकार, विद्युत विभागाचे विभागीय संचालक श्री.खंडाईत, अधीक्षक अभियंता श्री. देशपांडे उपस्थित होते.

प्रत्‍येक नागरिकाला घरगुती 24 तास विद्युत पुरवठा देण्‍यात यावा तसेच कृषी पंपासाठीचा 8 तासाचे वर विद्युत पुरवठा खंडीत करु नये, असे निर्देश असताना काही ग्रामीण भागात 8 तासाचे वर वीज पुरवठा ख‍ंडित केल्‍याबाबत यावेळी विद्युत विभागाच्‍या अधिकाऱ्यांविषयी नाराजी व्‍यक्‍त करून यापुढे असा प्रकार घडल्‍यास अधिकाऱ्यांच्‍या वेतनवाढी थांबविण्‍यात येणार असल्‍याचे यावेळी श्री. बावनकुळे म्‍हणाले. जिल्‍ह्यातील 68 हजार शेतकऱ्यांना सौर वीज कृषिपंप देण्‍यात येणार असून यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावे. वर्दळीच्‍या ठिकाणी असलेल्‍या जागेवरील विद्युत खांब, रोहित्र व तारामुळे सामान्‍य नागरिकांना त्रास होऊन अपघात होण्‍याची शक्‍यता असते यासाठी विद्युत विभागांनी अपघातस्‍थळावरील विद्युत तारा, रोहीत्र व खांब तात्‍काळ दुसरीकडे स्‍थानांतरीत करावे. प्रत्‍येक नागरिकाला केवळ वीज जोडणीचे अनामत रककमच घेऊन वीज जोडणी द्यावी. विद्युत खांब किंवा विद्युत तारा जोडणीची रक्‍कम घेऊ नये अशाही सूचना यावेळी दिल्‍यात.

वर्धा जिल्‍हात 2030 पर्यंत विद्युतीकरण पुर्ण होईल. यासाठी जिल्‍ह्याला 200 कोटी रुपये उपलब्‍ध झाले आहे. यामध्‍ये आणखी 250 रुपये कोटींची आवश्‍यकता असून लवकरच उपलब्‍ध करुन देण्‍यात येणार आहे. ज्‍या शेतकऱ्याला शाश्‍वत वीज दिली जाणार नाही त्‍या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्‍यात येर्इल, असा इशारा त्‍यांनी यावेळी दिला.

जिल्‍ह्यात 86 कोटी रुपयाचे देयक शेतकऱ्यांकडे थकित असतानाही शेतकऱ्यांची वीज कापण्‍यात आली नाही. जिल्‍ह्यात दोन वर्षात 9 हजार 500 वीज कनेक्‍शन देण्‍यात आले असून केवळ 2 हजार 300 कनेक्‍शन बाकी आहे. यावेळी विद्युत विभागाशी संबंधित 270 नागरिकांनी तक्रारी दाखल केल्‍या. सर्वच तक्रारींचे श्री. बावनकुळे यांनी निराकरण केले. यापुढे प्रत्‍येक शाखा अभियंत्‍यांनी महिन्‍यातून एकदा ग्राहक मेळाव्‍याचे आयोजन करावे. तसेच कार्यकारी अभियत्‍यांनी ग्राहक संवाद कार्यक्रमाचे आयोजन करुन ग्राहक सेवेचे व्रत जोपासावे, असेही श्री. बावनकुळे म्‍हणाले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result