महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण बुधवार, ०१ मे, २०१९


नंदुरबार :
महाराष्ट्र राज्याच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस कवायत मैदान येथे आयोजित कार्यक्रमात राज्याचे रोजगार हमी व पर्यटन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी खासदार डॉ. हिना गावीत, जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे, पोलीस अधीक्षक संजय पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, होमगार्ड समादेशक चंद्रकांत गवळी, सहायक जिल्हाधिकारी वान्मती सी. आदी उपस्थित होते.

यावेळी शानदार संचलनाद्वारे राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. संचलनाचे नेतृत्व परेड कमांडर संदीप रणदिवे आणि सेकंड इन कमांडर हर्षल बागल यांनी केले. संचलनात जिल्हा पोलीस दल, गृहरक्षक दल, श्वान पथक, बॉम्ब शोधक व नाशक पथक, २०७ वज्र आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी सहभाग घेतला.

याप्रसंगी श्री.रावळ यांनी नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, महाराष्ट्राच्या अनेक देशभक्तांनी स्वातंत्र्य संग्रामात बलिदान दिले आहे. शेतकरी आणि कामगारांनी राज्याच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आहे. कलाकार आणि खेळाडुंनी राज्याच्या नावलौकीकात भर घातली आहे.






छत्रपती शिवाजी महाराजांनी देशाला स्वाभिमान आणि स्वातंत्र्याचा वारसा दिला तसेच राज्यातील सामाजिक चळवळीने देशाला मार्गदर्शन केले, असे त्यांनी सांगितले. हुतात्म्यांच्या बलिदानामुळे मुंबईसह अखंड महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्याचे ते म्हणाले.

श्री.रावल यांनी नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे तसेच श्रमदान करून जलसंधारणाच्या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन देखील केले. कार्यक्रमाला स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी अधिकारी-कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र दिन साजरा
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उत्पादन शुल्क अधीक्षक मोहन वर्दे, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, दत्तात्रय बोरुडे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार, उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, जयसिंग वळवी, सुधीर खांदे, जिल्हा पुरवठा अधिकारी विजय भांगरे, तहसीलदार राजेंद्र दराडे आदी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result