महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
जलयुक्तमुळे रब्बी पीक क्षेत्रात 15 हजार हेक्टरने वाढ, ९७ हजार हेक्टर संरक्षित सिंचन शुक्रवार, १७ नोव्हेंबर, २०१७

शासनाची महत्वाकांक्षी योजना असलेल्या `जलयुक्त शिवार` अभियानाचे दृष्य परिणाम राज्यात सर्वत्र दिसू लागले आहेत. सरकारला तीन वर्षे पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर जलयुक्त शिवार ही सर्वात मोठी उपलब्धी ठरली आहे. जलयुक्त शिवार योजनेमुळे केवळ सिंचन क्षमताच वाढली नाही तर असंख्य गावांचा पाण्याचा ताळेबंद तयार झाला आहे. वर्धा जिल्ह्यात मागील तीन वर्षात जलयुक्त शिवारमध्ये 564 गावाची निवड करण्यात आली. निवड केलेल्या गावात जलयुक्त शिवार अंतर्गत झालेल्या कामामधून 95 हजार 473 हेक्टर संरक्षित सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. याचा लाभ असंख्य शेतकऱ्यांना मिळाला असून, जलयुक्त शिवार हे अभियान शेतीसाठी संजीवनी ठरले आहे.

पावसाचे जास्तीत जास्त पाणी गावाच्या शिवारातच अडवून भूगर्भातील पाणी पातळीत वाढ करणे, विकेंद्रित जलसाठे निर्माण करणे, अस्तित्वात असलेल्या आणि निकामी झालेल्या जलस्रोतांच्या पाणी साठवण क्षमता पुनर्स्थापित करणे, उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करणे आणि पाणी अडविण्याच्या कामात लोकसहभाग वाढविणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. 2015 पासून सुरू करण्यात आलेली ही योजना जिल्ह्यात उत्तम पद्धतीने राबविल्या गेली आहे.

कृषी विभाग, जलसंधारण (राज्य), जिल्हा परिषद लघुसिंचन विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा, वन विभाग, सामाजिक वनीकरण, पाटबंधारे विभाग, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा इत्यादी विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात जलयुक्त शिवारची कामे करण्यात आलीत. या सर्व विभागाच्या नियोजनामुळे जलयुक्त शिवार अभियानाची यशस्वी वाटचाल जिल्ह्यात पहायला मिळते.

2015-16 मध्ये 8 तालुक्यातील 214 गावांची निवड या अभियानात करण्यात आली. 214 गावात विविध यंत्रणांमार्फत 2,808 कामे पूर्ण करण्यात आली. दुष्काळावर मात करण्यासाठी सुरु केलेल्या जलयुक्त शिवार योजनेचा परिणाम पाहता वर्धा जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेत 2015-16 मध्ये समाविष्ट करण्यात आलेली सर्वच 214 गावे शंभर टक्के वॉटर न्युट्रल झाली आहेत. या कामामुळे जिल्ह्यात या वर्षात 41 हजार 290 हेक्टर संरक्षित सिंचन निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे पावसाच्या खंड काळात कोमेजणा-या किंवा करपणा-या पिकांना जलयुक्त शिवार अभियान संजीवनी देणारे ठरले आहे.

शिवारात पावसाचे पडलेले पाणी व अडवलेले आणि जिरवलेले पाणी यांचा ताळेबंद करण्याची पध्दत जलयुक्त शिवारमध्ये ठरवून दिलेली आहे. त्यानुसार गावाची सिंचनाची व पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता जलयुक्त शिवारच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामामुळे पावसाच्या पाण्याचा जमा खर्च व ताळेबंद तयार करणे म्हणजेच वॉटर न्युट्र्रल टक्केवारी होय.

सन 2016-17 मध्ये 212 गावांची निवड करण्यात आली असून या गावात 2,323 कामे प्रस्तावित करण्यात आली होती. यापैकी 2,228 कामे पुर्ण करण्यात आली आहेत. पूर्ण करण्यात आलेल्या जलयुक्त शिवारच्या कामामधून 54 हजार 183 हेक्टर संरक्षित सिंचन निर्माण झाले आहे. या वर्षात निवडण्यात आलेल्या 212 गावांपैकी 143 गावे शंभर टक्के वॉटर न्युट्रल झाली आहेत. तर 61 गावे 80 टक्क्यांच्या वर वॉटर न्युट्रल झाली आहेत.

मागील दोन वर्षात जलयुक्त शिवारमध्ये झालेल्या कामामुळे जिल्ह्यात भाजीपाला पीक, फळपीक लागवड वाढली असून रब्बी पिकाच्या क्षेत्रात 15 हजार हेक्टरने वाढ झाली आहे.

सन 2017-18 मध्ये जिल्ह्यातील 138 गावांची निवड करण्यात आली असून विविध यंत्रणांमार्फत 1,400 कामे प्रस्तावित केली आहेत. यातील काही कामे सुरु झाली असून सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर अंदाजे 30 हजार हेक्टर संरक्षित सिंचन निर्माण होणार आहे. जलयुक्त शिवारमध्ये शेततळे, सिमेंट नालाबांध, नाला खोलीकरण, भूमिगत बंधारे, रिचार्ज शाफ्ट सह अन्य महत्वाची कामे करण्यात आली आहेत. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून 5 वर्षात महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा शासनाचा संकल्प आहे. मागील तीन वर्षात या अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात निर्माण झालेल्या 95 हजार 473 हेक्टर संरक्षित सिंचनामुळे शेतीला हक्काचे सिंचन मिळाले आहे.


- मनीषा सावळे
जिल्हा माहिती अधिकारी, वर्धा

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result