महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटिबद्ध - सदाशिव खोत शुक्रवार, २६ जानेवारी, २०१८
भारतीय प्रजासत्‍ताकाचा 68 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

वर्धा :
महात्मा गांधीचा जिल्हा म्हणून वर्धेची ओळख आणखी दृढ करण्यासाठी राज्य शासन वर्धेच्या विकासासाठी विशेष लक्ष देत आहे. जिल्ह्यातील पायाभूत विकासासोबतच शेतकरी, शेतमजूर, महिला दिव्यांग अशा सर्व घटकांच्या सर्वांगिण विकासासाठी राज्यशासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन कृषी,व फलोत्पादन, पणन व पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाशिव खोत यांनी केले.

भारतीय प्रजासत्‍ताकाचा 68 व्या वर्धापन दिनाचा मुख्‍य शासकीय ध्‍वजारोहण सदाशिव खोत यांचे हस्‍ते झाले. जिल्‍हा क्रीडा संकुल येथे संपन्‍न झालेल्‍या या कार्यक्रमाला प्रभारी जिल्‍हाधिकारी संजय दैने, मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे, जिल्‍हा पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस,निवासी उपजिल्‍हाधिकारी राजलक्ष्मी शाहा, स्‍वातंत्र्य संग्राम सैनिक तसेच अधिकारी उपस्थित होते.

यावेळी सदाशिव खोत यांनी सर्व स्‍वातंत्र्य संग्राम सैनिक आणि शहिदांना विनम्र अभिवादन करुन उपस्थित नागरिकांना शुभेच्‍छा दिल्‍या. गृह विभाग, होमगार्ड, एन.सी.सी. स्‍काऊट, गाईड पथकांनी पथसंचलन करुन मान्‍यवरांना मानवंदना दिली. तसेच सामान्‍य रुग्‍णालयातर्फे शेतकरी मानसिकदृष्ट्या सक्ष्म करण्यासाठी प्रेरणा प्रकल्प सादर करणारी उत्‍तम झॉंकी, आपात्कालीन वैद्यकिय सेवा, आरोग्‍य विभागाच्या योजनाची माहिती देणारा चित्ररथ, बेटी बचाव बेटी पढाओ, पर्यावरण जागृती,दंगल नियंत्रण, वज्र अशा विविध चित्ररथाच्‍या माध्‍यमातून जनजागृती पर संदेश देण्‍यात आला.

पुढे बोलताना श्री खोत म्हणाले, हवामान बदलाचा राज्याच्या शेतीवर व भूगर्भातील पाणीसाठ्यावर विपरित परिणाम दिसून येत आहे. मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षापासून दुष्काळ व नापिकीस वारंवार सामोरे जावे लागत आहे. शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या वापरासाठी सक्षम करण्याच्या उद्देशाने विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी हा हवामान अनुकूल कृषी प्रकल्प राबविण्यात येत आहे. यामध्ये वर्धा जिल्ह्यातील 125 गावाची निवड करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

शेतकऱ्यांच्या वहीवाटीसाठी असणारे पांदण रस्ते अतिक्रमणामुळे अरुंद झाले आहेत. याचा त्रास शेतकऱ्यांना होत असल्यामुळे राज्य शासनाने पालकमंत्री पांदणमुक्त रस्ता योजना सुरु केली. वर्धा जिल्ह्यात जिल्हा वार्षिक योजना, लोकवर्गणी आणि कंपनी सामाजिक दायित्व (CSR) निधीमधून ही योजना राबविण्यात येत आहे. आतापर्यंत 57 किलोमिटरचे रस्ते अतिक्रमणमुक्त करुन रस्त्याचे रुंदीकरण व सपाटीकरण करण्यात आले आहे. पावसाळ्यापुर्वी जूनपर्यंत 300 कि.मी.चे रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून या योजनेचा शेतकऱ्यांना सर्वाधिक लाभ होत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

यावेळी मान्यवराच्या हस्ते दहा शहीदाच्या कुटूंबियांना तसेच सेवानिवृत्त जवानांच्या आर्थिंकदृष्टया परिस्थिती खालावलेल्या वारसांना प्रति कुटूंब 25 हजार रुपये रोटरी क्लबच्या वतीने सानुग्रह अनुदान राशी देण्यात आली.भारतीय वायु सेनेमध्ये भूदल प्रशिक्षक पदावर असलेल्या राकेश देविदास काळे याने भारतीय वायु सेने तर्फे आयोजित मिशन 7 समिट मध्ये अंट्रार्टिका खंडातील सर्वांत उंच शिखर मांऊट विन्सन पादाक्रांत करुन भारताचा तसेच वायु सेनेचा झेंडा रोवला. यासाठी प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. ध्वज निधी संकलनासाठी प्रभारी जिल्हाधिकारी संजय दैने यांना स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. मैत्री ताकसांडे,(स्केटींग), गोपाल तडस,शितल पाल,(ज्युदो), संभाजी भुसनर,मदन चावरे(कुस्ती),जानराव लोणकर ,जाई नखाते या क्रीडापटूना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

संत तुकाराम वनग्राम योजने मध्ये लादगड येथील संयुक्त वन व्यवस्थापन समितीला 51 हजार रुपयांचा प्रथम, तावी येथील संयुक्त वन व्यवस्थापन समितीला 31 हजार रुपयाचा व्दितीय पुरस्कार तर मुबारकपुर वन व्यवस्थापन समितीस 11 हजार रुपयाचा तृतीय पुरस्कार देण्यात आला. जिल्हा उद्योग केंद्रामार्फत 2015व 2016 वर्षांचे उद्योजक पुरस्कार वितरीत करण्यात आले.यामध्ये मे.गुरू इंडस्ट्रीज,मे.पॉवर कॉन्झर्वेशन ॲन्ड डेव्हलपमेंट सेटर, मे.आशावरी इंडस्ट्रीज, मे.श्रीराम ॲग्रो प्रॉडक्टस, यांना पुरस्कार वितरीत करण्यात आले.

परेड संचालनामध्ये उत्कृष्ट्र परेडचा पुरस्कार वाहतूक पोलीस दलास तसेच उत्कृष्ट्र चित्ररथाचे पारितोषीक जिल्हा सामान्य रुग्णलयाच्या चित्ररथाला देण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे पारितोषीक सुध्दा मान्यवराच्या हस्ते वितरीत करण्यात आले. यावेळी मोठया संख्येने अधिकारी, शालेय विद्यार्थीं,शिक्षक तसेच नागरिक उपस्थितीत होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result