महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
खड्डेमुक्त रस्त्यांची कामे ३५ टक्के पुर्ण - बांधकाम मंत्री पाटील शनिवार, १८ नोव्हेंबर, २०१७
हिंगणी-हिंगणा वर्धा  रस्ता पूर्णपणे सिलकोट करण्याच्या सुचना
वर्धा :
रस्ता बांधकामाच्या कामात दिरंगाई अथवा चुका आढळल्यास कारवाई करण्यात येईल तर, चांगली कामे व खड्डेमुक्त रस्ते तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांना बक्षिस आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरवीण्यात येईल. अधिका-यांनी 15 डिसेंबर पर्यंत रस्ते खड्डेमुक्त करावेत. हिंगणी-हिंगणा वर्धा हा रस्ता पूर्णपणे सिलकोट करण्याच्या सुचना राज्याचे बांधकाम व महसुल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज दिल्या.

सामाजिक न्याय भवन येथे सार्वजनिक बांधकाम मंडळ चंद्रपूर अंतर्गत वर्धा जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभागाची आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी श्री पाटील बोलत होते.

खड्डे भरण्याचे काम करण्यासोबत ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात खड्डे पडले असतील अशा ठिकाणी सिलकोट देण्यात यावा. रस्त्यांची अवस्था अतीशय वाईट असल्यास नव्याने रस्त्याच्या कामांचा प्रस्ताव सादर करावा. यासाठी प्रत्येक जिल्ह्याला आवश्यक निधी मंजूर करण्यात येत असून या निधीतून कामे करावीत. हिंगणी -हिंगणा-वर्धा महामार्गावरील रस्त्यावर पूर्ण सिलकोट देण्याच्या सुचनाही यावेळी श्री. पाटील यांनी केल्या.

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये रस्त्यांवरील खड्डे भरण्याची कामे सुरु असून 35 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. या कामासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी मंत्रालयातील एक अधिका-याची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली असून वर्धा जिल्ह्यासाठी फु.स.मेश्राम हे अधिकारी काम पाहणार आहेत. संबंधित अधिकारी कामाची पाहणी करुन कामाबद्दल सुचना, मार्गदर्शन करुन मंत्रालयाशी समन्वय साधणार आहेत. विभागांनी चांगल्या कंत्राटदारांकडून आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कामे पूर्ण करुन घ्यावीत, अशा सुचनाही यावेळी श्री पाटील यांनी केल्या.

चांगले काम करणा-या अधिका-यांना बक्षिस देण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांनी चांगली कामे केल्याबाबत सबंधित ग्रामपंचायत किंवा तेथील जेष्ठ नागरिकांचे प्रमाणपत्र द्यावे अशी अट ठेवण्यात आली आहे.

रस्ता बांधकामासाठी जिल्ह्याला प्राप्त झालेल्या योजनेत्तर निधीतून 50 टक्के निधी नविन मंजूर कामाच्या दुरस्तीवर खर्च करावा. तसेच 50 टक्के निधी सन 2014 ते 2017 मधील प्रलंबित कामे व जी कामे झाली आहेत, मात्र पैसे दिले नाही अशा कामावर खर्च करावा, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी बैठकीला मुख्य अभियंता उल्हास देबडकर, अवर सचिव सुनिल करमरकर, उप सचिव फु.स.मेश्राम, कार्यकारी अभियंता उज्वल मेहता, अधिक्षक अभियंता डि . के. बालपांडे, कार्यकारी अभियंता शरद चौधरी, जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. तेलंग उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result