महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
अनेक महत्त्वाकांक्षी योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी - पालकमंत्री मदन येरावार शनिवार, २६ जानेवारी, २०१९


अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाने प्रजासत्ताक दिन साजरा
अधिकाऱ्यांचा गावागावात मुक्काम हे सुशासनाचे उदाहरण

यवतमाळ :
केंद्र आणि राज्य शासनाने लोकहितासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या लोकोपयोगी निर्णयाचा फायदा नागरिकांना मिळत आहे. राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, प्रधानमंत्री आवास योजना, अधिकाऱ्यांचा लोकसंवाद, स्वच्छ भारत मिशन आदी महत्त्वाच्या योजनांची जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात प्रभावीपणे अंमलबजावणी होत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.

पोस्टल ग्राऊंडवर आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माधुरी आडे, खासदार भावना गवळी, नगराध्यक्षा कांचन चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा आदी उपस्थित होते.

गावागावातील पांदण रस्ते लोकसहभागातून मे अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, संपूर्ण जिल्ह्यातील 6705 हेक्टर वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 मध्ये परावर्तीत करण्यात आली आहे. जिल्ह्यात जवळपास 1200 कोटींच्या रस्त्यांची कामे करण्यात येत आहे. राष्ट्रीय महामार्गाकरीता एकूण 468.65 हेक्टर पैकी 381.24 हेक्टर जमीन भुसंपादीत करण्यात आली आहे. वर्धा-यवतमाळ-नांदेड या प्रकल्पाकरीता 1060.50 हेक्टर जमीन संपादीत झाली आहे. आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत जिल्ह्यात एकूण 3 लक्ष 86 हजार 544 कुटुंब पात्र ठरले आहेत. या कुटुंबातील जवळपास 15 लक्ष नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येईल.

पालकमंत्री म्हणाले, 100 टक्के अनुदानावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू असून अनेक विद्यार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत. जिल्ह्याच्या विकासासाठी सन 2018-19 मध्ये एकूण 496 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या मध्यवर्ती असलेल्या बसस्थानकाच्या नुतणीकरणासाठी 10 कोटी मंजूर झाले आहे. जिल्हाधिका-यांच्या मार्गदर्शनात अनेक योजनांना गती मिळाली आहे. विविध विभागाचे अधिकारी गावागावात मुक्काम करून नागरिकांसोबत लोकसंवाद करीत आहे. सुशासनाचे हे उत्तम उदाहरण जिल्ह्याने घालून दिले आहे. शासन आणि प्रशासनाच्या सतर्कतेमुळे यावर्षी किटकनाशक फवारणीमुळे जिल्ह्यात एकही दुर्देवी घटना घडली नाही. हे शासन आणि प्रशासनाचे यश आहे, असे त्यांनी सांगितले.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत जिल्ह्याला 373 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. शेतक-यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, पांदण रस्ते आदी योजना राबविण्यात येत आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने नाविण्यपूर्ण योजनेतून 4 कोटी 93 लाख रुपयांची यंत्रसामग्री खरेदी केली आहे. मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत जिल्हयात 6701 शेततळ्यांची निर्मिती करण्यात आली आहे. यापैकी 950 शेततळ्यांमध्ये मत्स्यव्यवसायाला चालना देण्यात आली असून मत्स्यबीजच्या माध्यमातून अतिरिक्त उत्पन्न मिळत आहे. धडक सिंचन विहिरीअंतर्गत जिल्ह्यात 13 हजार 239 विहीरी पूर्ण करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत आजपर्यंत एकूण 9804 विहीरी पूर्ण झाल्या आहेत. जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत चार वर्षांत जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 40 हजार 516 कामे पूर्ण करण्यात आली आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या 18 हजार घरकुल उद्दिष्टांपैकी 11 हजार 80 घरकुल बांधून पूर्ण झाले आहेत. तसेच जिल्ह्यात आतापर्यंत 4 लक्ष 25 हजार शौच्छालय बांधण्यात आली असून पायाभूत सर्वेक्षणातून सुटलेल्या 19 हजार कुटुंबांना शौच्छालये बांधून देण्यात येत आहे.

गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 101 लघु व मध्यम प्रकल्पातून जवळपास 11 लक्ष घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. ‘ई-डिस्ट्रीक्ट’ प्रकल्पांतर्गत सातबारा संगणकीकरण, ई-फेरफार, दस्तऐवजांचे डिजीटायझेशन या माध्यमातून एकूण 1 लक्ष 7 हजार 584 फेरफार प्रमाणीकरण करण्यात आले आहे. डिजीटल सातबारा अंतर्गत जिल्ह्यातील एकूण 2 लक्ष 58 हजार 584 डिजीटल सातबा-याचे काम पूर्ण झाले आहे. सुधारीत दिव्यांग विकास धोरणानुसार पुर्वीच्या 3 टक्के निधीत वाढ करून शासनाने दिव्यांग विकास निधी 5 टक्के केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत (शेतकरी कर्जमाफी योजना) जिल्ह्यातील 2 लक्ष 65 हजार 365 शेतक-यांना 1570.68 कोटी रुपयांचा लाभ मिळाला आहे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

राष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शनाकरीता निवड झालेल्या स्कुल ऑफ स्कॉलर्सचा विद्यार्थी अनिकेत काकडे व घाटंजी येथील माध्यमिक कन्या शाळेची विद्यार्थीनी प्राजक्ता निकम हिला पालकमंत्र्यांच्या हस्ते इन्स्पायर अवॉर्डने गौरविण्यात आले. यावेळी शिक्षक अतुल ठाकरे, आपत्ती निवारण दिनानिमित्त आयोजित वादविवाद स्पर्धेतील प्रथम क्रमांक पटकाविणारी वृषाली देशमुख, द्वितीय पुरस्कार स्वाती बाहे, तृतीय क्रमांक अजय जाधव, यांच्यासह दुरदर्शनचे जिल्हा प्रतिनिधी आनंद कसंबे, कलावंत गजानन वानखेडे, महेंद्र गुल्हाने, वंदना ठवळे, पद्माकर दुरतकर, सावित्रा वानखडे, राजू सुतार, नंदु मोहोड, बाळासाहेब पांडे, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक शेख नासीर रशिद, गुणवंत क्रीडा कार्यकर्ता जितेंद्र सातपुते, गुणवंत खेडाळू (महिला) पुर्वा बोडलकर, गुणवंत खेडाळू (पुरुष) साहील भालेराव, गुणवंत खेडाळू (दिव्यांग) मितेश हरसुले, अमोलोकचंद विधी महाविद्यालयातून एल.एल.बी. करणारे दिव्यांग विद्यार्थी रामेश्वर चव्हाण आदिंचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन चंद्रबोधी घायवटे व ललिता जतकर यांनी केले. कार्यक्रमाला स्वातंत्रसंग्राम सैनिक, माजी सैनिक, वीर माता, वीर पिता, वीर पत्नी, विविध विभागाचे अधिकारी, जि.प.सदस्य, नगरसेवक-सेविका, नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result