महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
पाणी बचतीचा संदेश देणाऱ्या जलजागृती सप्ताहास प्रारंभ गुरुवार, १६ मार्च, २०१७
जिल्ह्यांमधील नद्यांचे पुनरुज्जीवन करण्याची महत्त्वाकांक्षी योजना

ठाणे :
जिल्ह्यामधील नद्यांचे पुनरुज्जीवन आणि संवर्धन करून त्या माध्यमातून मृत जलस्त्रोत परत जीवंत करण्याचे काम हाती घेतले असून पहिल्या टप्प्यात मुरबाडमधल्या कनकवीरा नदीचे खोलीकरण आणि रुंदीकरण करण्यात येत आहे. याचा आराखडा दोन दिवसांत तयार होईल, असे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी आज सांगितले.

पाणी नियोजन व पाणी बचतीबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने जलसंपदा विभागातर्फे आज पासून जलजागृती सप्ताह सुरु झाला असून जिल्हाधिकारी आणि इतर मान्यवरांच्या हस्ते जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या जल कलशाचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.

जिल्हाधिकारी म्हणाले की, कनकवीरा नदीच्या पुनरुज्जीवनाचा भाग म्हणून यात सिमेंट बांध, मजगी, लहान-लहान दगडी चेक डेम यासारखी कामे आम्ही घेणार आहोत. यामुळे ११ आजूबाजूच्या गावांतील सिंचन क्षमता वाढून ५०० हेक्टरपेक्षा जास्त जमिनीला याचा लाभ होईल. ३० कोटी रुपये खर्चाचा हा प्रस्ताव असून जेव्हा हे काम पूर्ण होईल तेव्हा संपूर्ण राज्यासाठी ते एक उदाहरण ठरेल.

कृषी आणि जलसंपदा विभागाने एकत्रितरित्या नियोजनबद्धरितीने १५ वर्षांचा विचार करून एक आराखडा तयार करण्याची गरज आहे. आज ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या १ कोटीच्या वर गेली असून पाण्याचे नियोजन तंत्रशुध्द रितीने होण्यासाठी या विभागांनी सध्याच्या तंत्रज्ञानाचा देखील जास्तीत जास्त उपयोग केला पाहिजे, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की, राज्य शासनाने जलनियामक प्राधिकरण हे देशातील जल क्षेत्रासंबधीचे पहिले प्राधिकरण स्थापन केले आहे, वाल्मीसारखी संस्थाही आहे. आज ग्रामीण भागात दरडोई दर दिवशी ४० लिटर तर शहरी भागात २४० लिटर पाणी गरजेचे आहे. शहरी भागात पाण्याची गरज जास्त असली तरी पाण्याची उधळपट्टीही इथेच जास्त होते हे योग्य नव्हे असे सांगून ते म्हणाले की पैशाच्या बचतीप्रमाणे पाण्याच्या बचतीबाबतही आपण तितकेच संवेदनशील होणे गरजेचे आहे. गेल्या वर्षभरात जलयुक्त शिवारमध्ये केलेल्या कामामुळे पाण्याचा संचय वाढला तसेच ६ हजार हेक्टर क्षेत्रावर भाजीपाला लागवड सुरु झाली अशी माहितीही त्यांनी दिली.

याप्रसंगी पर्यावरण दक्षता मंचच्या संगीता जोशी यांनी पर्यावरण संरक्षणासाठी मंचातर्फे कोणते उपक्रम केले जातात सादरीकरण केले. तर आयआयटीचे प्रा. अरुण इनामदार यांनी जलसंपत्ती कशी वाचवावी यावर मार्गदर्शन केले. जिल्हा कृषी अधीक्षक महावीर जंगटे यांनी सांगितले की, कुडशेत गावामध्ये गावकरी जलसाक्षर झाले असून त्या ठिकाणी जलयुक्त शिवारमुळे पाणी उपलब्ध झाल्याने तेथील जीवनमानच बदलले आहे. यावेळी जलसंपदा विभागाच्या जलरथाचे देखील उद्घाटन जिल्हाधिकारी यांनी केले.

यावेळी पाण्याचा सामाजिक बांधीलकेतून काटकसरीने वापर केला जाईल अशी प्रतिज्ञा सर्वांनी घेतली. प्रास्ताविक श्री पवार, लघु जलसंपदा विभाग यांनी केले. प्रारंभी शाखा अभियंता श्री. उगले यांनी पाण्याचे महत्त्व सांगणारे सामूहिक गीत सादर केले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result