महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
पारदर्शक निवडणूक प्रक्रियेच्या यशस्वीतेसाठी नियमांचे पालन करावे - निवडणूक निरीक्षक अब्दुल समद मंगळवार, ०९ एप्रिल, २०१९

जालना : लोकसभा निवडणूकीची प्रक्रिया निर्भय वातावरणात पारदर्शकरित्या यशस्वी करण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने सर्व उमेदवार, राजकीय पक्षांनी प्रशासनास सहकार्य करावे. त्यासाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांबरोबरच आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन निवडणूक निरीक्षक अब्दुल समद यांनी येथे केले.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारांना विविध बाबी, नियमांचे मार्गदर्शन करण्यासाठी  जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी  श्री.समद बोलत होते.  यावेळी कायदा व सुव्यवस्था निरीक्षक शाहनवास कासिम, निवडणूक खर्च निरीक्षक पवनकुमार, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र बिनवडे, निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) राजीव नंदकर, उप विभागीय अधिकारी केशव नेटके यांच्यासह विविध उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

श्री.समद म्हणाले की, निवडणूक प्रक्रिया अधिक सुलभ व पारदर्शी होण्याच्या दृष्टीकोनातून निवडणूक आयोगाने विविध ॲपची निर्मिती केली असून या माध्यमातून विविध परवानग्यांसह आदर्श आचारसंहितेचा भंग होत असल्याच्या तक्रारीसुद्धा या माध्यमातून निरीक्षक तसेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविता येणार आहेत. निवडणुकीसाठी आवश्यक असणाऱ्या विविध परवानग्यांसाठी एक खिडकीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. दिव्यांगांना मतदान केंद्रावर मतदानासाठी आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा पुरविण्यात येणार असून  अंगणवाडी सेविका, स्काऊटचे विद्यार्थी दिव्यांगांच्या मदतीसाठी मतदान केंद्रावर असणार आहेत. मतदारांना सुलभ मतदानासाठी फोटो छायाचित्र असलेल्या मतदार याद्या यंत्रणेमार्फत वाटप करण्यात येणार आहेत.  मतदानासाठी मतदारांना निवडणूक ओळखपत्र व निवडणूक आयोगाने मान्यता दिलेले 11 पुरावे ग्राह्य धरण्यात येतील. मतदानाला दि. 23 एप्रिल रोजी सकाळी 7.00 वाजेपासुन सुरुवात होणार असून मतदारांसाठीची सहाय्यकारी केंद्रे मतदान कक्षापासून 200 मीटर अंतरावर ठेवावीत. तसेच    इलेक्ट्रॉनिक माध्यम तसेच सोशल मिडियामधून प्रसारित करण्यात येणार जाहिराती माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समितीमार्फत पूर्वप्रमाणित करुन घेण्याच्या सुचनाही श्री.समद यांनी दिल्या.

ज्या उमेदवारांवर गुन्हे दाखल असतील अशा उमेदवारांनी गुन्ह्यांची माहिती मतदानाच्या दोन दिवस आधीपर्यंत वृत्तपत्रामधून तीन वेळेस तर इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे प्रसिद्ध करणे बंधनकारक असल्याचे सांगत राजकीय पक्षांनी निवडणुका निर्भय व मुक्त  वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे. तसेच निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहनही कायदा व सुव्यवस्था निरीक्षक शाहनवास कासिम यांनीही केले.

निवडणूक निरीक्षक (खर्च) पवन कुमार म्हणाले की, निवडणुकीमध्ये उमेदवारांना 70 लक्ष रुपयापर्यंत खर्चाची मुभा असुन दिलेल्या मर्यादेबाहेर खर्च होणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.  तसेच निवडणुकीदरम्यान उमेदवारांमार्फत करण्यात येणाऱ्या खर्चाची दैनंदिन नोंद ठेवणे नियमानुसार बंधनकारक आहे.  उमेदवारांमार्फत करण्यात आलेल्या खर्चाची तपासणी तीन वेळेस करण्यात येणार असुन या दरम्यान सर्व लेखे प्रशासनाच्या शॅडो रजिस्टरसोबत तपासण्यात येणार आहे. त्यावेळी तपासणी पथकास खर्चाचे लेखे उपलब्ध करुन देण्याचे आवाहन यावेळी केले.

जिल्हा प्रशासनातर्फे निवडणूक प्रक्रिया व्यापक स्वरुपात यशस्वी होण्यासाठी सर्व प्रकारची तयारी अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी यावेळी दिली.  उमेदवारांना आयोगाच्या सुचनेप्रमाणे निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने पूरक साहित्य यावेळी उपलब्ध करुन देण्यात आले.

या निवडणूक प्रक्रियेदरम्यान आचारसंहिता व निवडणूक आयोगाने वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे उल्लंघन होत असल्याचे कोणास आढळून आल्यास त्याबाबतची तक्रार निवडणूक निरीक्षकांकडे पुढील भ्रमणध्वनीवर संपर्क साधून देता येईल.

कायदा व सुव्यवस्था निरीक्षक शाहनवास कासिम-8790864422, निवडणूक निरीक्षक (खर्च) पवन कुमार-9405628446, निवडणूक निरीक्षक अब्दुल समद-8817001717 या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result