महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
कृषि यांत्रिकीकरणासह लागवडीखालील क्षेत्र वाढीवर भर द्या - पालकमंत्री शनिवार, २५ मे, २०१९


सिंधुदुर्गनगरी–
यंदाच्या खरीप हंगामामध्ये कृषि संबंधित सर्व विभागांनी कृषि यंत्रिकीकरणासह लागवड योग्य पडीक क्षेत्रावर जास्तीत जास्त लागवड करण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीच्या नूतन दालनामध्ये पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम आढावा बैठक संपन्न झाली. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते.


या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, अधीक्षक कृषि अधिकारी शिवाजीराव शेळके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हरिश जगताप, वनसंरक्षक समाधान चव्हाण आदींसह जिल्ह्यातील संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


जिल्ह्यातील भात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना हंगामापूर्वी कृषि यंत्रे मिळतील यासाठीचे नियोजन करावे असे सांगून पालकमंत्री श्री. केसरकर म्हणाले की, भातासोबतच बांबू, मसाला पिके व फळ झाडांची लावगड वाढणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त उत्पादन मिळवून देण्यासाठी श्री पद्धतीने होणाऱ्या भात लागवडीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढ करावी. त्यासाठी सर्वांनी मिशन मोडमध्ये या कामास प्राधान्य द्यावे. कृषि यांत्रिकीकरणासाठीही प्राधान्याने काम करावे, लागवडीखालील क्षेत्रात वाढ होण्यासाठी व जनावरांपासून होणारे शेतीचे नुकसान टाळणे गरजेचे आहे. त्यासाठी वन विभागामार्फत इलेक्ट्रिक फेन्सिंग देण्याविषयी बैठकीमध्ये चर्चा झाली. यासाठी तालुका कृषि अधिकारी यांनी इलेक्ट्रिक फेन्सिंगसाठी इच्छुक शेतकऱ्यांचा सर्व्हे करावा अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.


यंदाच्या खरिप हंगामात 61 हजार 830 हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट निर्धारित केले आहे. तर रब्बी हंगामासाठी 15 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचा लक्षांक निर्धारित केले आहे. गतवर्षीच्या खरीप व रब्बी हंगाम तसेच यंदाच्या खरीप हंगामाचा सविस्तर आढावा जिल्हा नियोजन समितीच्या जुन्या सभागृहात आयोजित खरीप हंगाम आढावा बैठकीत घेण्यात आला.


यंदाच्या खरीप हंगामासाठी भात – 59 हजार 230 हेक्टर, नागली 1 हजार 520 हेक्टर, इतर तृण धान्य 65 हेक्टर, कडधान्य 390 हेक्टर, तेलबिया 625 हेक्टर या प्रमाणे लक्षांक निर्धारित केला आहे. रब्बी हंगामासाठी तृणधान्य 430 हेक्टर, उन्हाळी भात 1 हजार 706 हेक्टर, कडधान्य 7 हजार 335 हेक्टर, गळित धान्य 85 हेक्टर, भूईमूग 954 हेक्टर, भाजीपाला 2 हजार 100 हेक्टर, उस 2 हजार 390 हेक्टर या प्रमाणे लक्षांक निर्धारित केला आहे.


यंदाच्या खरिप हंगामासाठी बियाणांची एकूण मागणी 7 हजार 421 मे.टन इतकी असून त्यामध्ये 6 हजार 941 मे.टन सुधारित तर 480 मे.टन संकरीत वाणांचा समावेश आहे. जिल्ह्यातील बियाणे बदलाचे प्रमाण 30 टक्के गृहीत धरून खरीप 209 साठी 7 हजार 421 मे.टन बियाने वितरित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच खरीप हंगामासाठी 22 हजार 175 मे.टन रासायनिक खतांची मागणी आहे.


खरीप हंगाम हा जिल्ह्यातील महत्वाचा हंगाम असल्याचे सांगून जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे म्हणाले की, दिलेले इष्टांक पूर्ण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. इष्टांक पूर्ण होण्यासाठी नियोजना प्रमाणे सर्वांनी काम करावे. श्री पद्धीतीची भात लागवड जिल्ह्यासाठी उपयुक्त आहे. त्याचा प्रसार व्हावा. सर्व विभागांनी खरिपासाठीचे इष्टांक पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result