महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
आरोग्याच्या चांगल्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न- पंकजा मुंडे शुक्रवार, २१ जुलै, २०१७
बीड : जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सोई सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासनस्तरावरुन आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा आरोग्य सेवा समन्वय समितीच्या बैठकीत श्रीमती मुंडे बोलत होत्या. बैठकीला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सविता गोल्हार, सर्वश्री आमदार आर.टी. देशमुख, लक्ष्मण पवार, भीमराव धोंडे, आमदार संगीता ठोंबरे, जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, अपर जिल्हाधिकारी पवार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे आदींची उपस्थिती होती.

श्रीमती मुंडे म्हणाल्या की, जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा वेळेवर उपलब्ध झाल्या पाहिजेत, यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या जवळच्या शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालयात सर्व सुविधा मिळाल्यास त्यांचा आर्थिक व मानसिक त्रास दूर होण्यास मदत होणार आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दवाखाण्यात येणाऱ्या रुग्णांची योग्य तपासणी करुन वेळेवर उपचार केले पाहिजेत. त्यासाठी संबंधित आरोग्य विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रास नवीन इमारती व आवश्यक यंत्र सामग्री खरेदीसाठी शासनस्तरावरुन प्रयत्न करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांची रिक्त असलेली पदे भरण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. शासकीय रुग्णालयामध्ये डॉक्टराची संख्या अपुरी असल्याने रुग्णाना सेवा पुरविताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशावेळी शहरातील खाजगी तज्ज्ञ डॉक्टर स्वत: होवून शासकीय रुग्णालयात मोफत सेवा देण्यास तयार असतील तर त्यांची मदत घेण्यास हरकत नसावी. कोणतेही बालक कुपोषणाला बळी पडू नये यासाठी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. बालकांना वेळेवर योग्य आहार मिळाला पाहिजे यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात, असेही पालकमंत्री श्रीमती मुंडे यांनी सांगितले.

यावेळी समितीच्या सदस्यांनी चर्चामध्ये भाग घेवून सूचना केल्या.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result