महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
न्यायव्यवस्था ही प्रशासन आणि जनतेतील दुवा - न्यायमूर्ती अभय ओक शुक्रवार, ११ मे, २०१८
शहापूर येथील विधी सेवा शिबीरात हजारो नागरिकांना मिळाला थेट योजनांचा लाभ

ठाणे :
राज्य विधी सेवा प्राधिकरण ठाणे आणि तालुका विधी सेवा समिती शहापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सहकार्याने आज वन प्रशिक्षण केंद्र शहापूर येथे झालेल्या विधी सेवा शिबीरात हजारो नागरिकांना विविध योजनांचा थेट लाभ मिळाला. या विधी सेवा शिबिराचे उद्घाटन उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते झाले.

जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार, प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश विनय जोशी, राज्य विधी सेवाचे सदस्य सचिव श्रीकांत कुलकर्णी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव दि.य. गौड, शहापूर न्यायालयाचे न्यायाधीश तुषार वाझे यांची यावेळी उपस्थिती होती.

यावेळी न्यायमूर्ती श्री. ओक म्हणाले की, तळागळातील जनतेला शासकीय योजनांचा लाभ मिळावा व त्यांची प्रगती व्हावी याच उद्देशाने प्रशासन व जनता यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून न्याय व्यवस्थेकडे पाहिले जात आहे. समाजातील वंचित घटक, आर्थिक मागास असलेल्या नागरिकांना योजनांचा लाभ मिळण्यासाठी सरकार सर्वोतोपरी मेहनत घेत असते तरी देखील अधिक प्रयत्नांची आवश्यकता आहे.

जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर यांनी देखील जिल्ह्याच्या विकासासाठी प्राधान्यक्रम ठरवून कशा रितीने अंमलबजावणी सुरू आहे त्याची माहिती दिली.

योजनांचा मिळाला थेट लाभ
या शिबीरासाठी उच्च न्यायालयाने ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्याची निवड केली. शासनाच्या लोक कल्याणकारी योजना ह्या तळागातील लोकांपर्यत पोहाचाव्यात त्याचा लाभ जनतेला मिळावा या उद्देशाने आसपासच्या भागातील हजारो नागरिकांना, शेतकरी तसेच ग्रामस्थांना या विधी सेवा शिबीराच्या माध्यमातून विविध शासकीय विभागातर्फे असणाऱ्या लोक कल्याणकारी योजनाची माहिती देण्यासाठी 20 ते 25 स्टॉल मांडण्यात आले होते. यामध्ये महसूल विभागाचे आधारकार्ड ,जातीचे दाखले,उत्पनाचे दाखले,नॉन क्रिमिलिअर, डोमासाईल,नवीन रेशन कार्ड, दुय्यम रेशनकार्ड, जेष्ट नागरिक दाखला, शेतकरी दाखला, सातबारा, गॅस वाटप, अपंगांना सायकल वाटप, ताडपत्री वाटप, जाळे वाटप, घरकुल, अनुदान, शासकीय योजनांचे धनादेश आदींसह महा आरोग्य तपासणी कॅम्प, कुपोषित मुलांची ज्युपिटर येथील तज्ज्ञ डॉक्टर यांच्या मार्फत तपासणी, पंचायत समिती कृषी विभाग आदिवासी विकास प्रकल्प व जिल्हा परिषद येथिल योजनेचा लाभार्थीना थेट लाभ वाटप, तालुका कृषी योजनांच्या लाभासह, कृषी माहिती पत्रकाचे अनावरण, पोलीस स्टेशन मार्फत ग्रामसुरक्षा दला मधील सदस्यांना सर्टिफिकेट वाटप,दारुबंदी कमीटीच्या अध्यक्ष व सदस्य यांना सर्टिफिकेट वाटप,महीला बचतगटाचे उद्योग व्यवसाय,संयुक्त वन व्यवस्थापन समिती मार्फत लाभार्थीना थेट गँस वाटप, आरटीओ परवाने, वारली पेंटींग, तसेच विद्यार्थ्यांना लागणारे शैक्षणिक दाखले, शैक्षणिक कामासाठी लागणारे विविध प्रकारच्या दाखल्यांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result