महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
शिक्षण विभागाच्या प्रयत्नामुळे जिल्हा परिषद शाळा डिजिटल - सी. विद्यासागर राव मंगळवार, ०२ मे, २०१७
नवी मुंबई : महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या 100 टक्के शाळा डिजिटल करण्यासाठी शिक्षण विभागाचे प्रयत्न प्रशंसनीय आहेत. मातृभाषेतून शिक्षण दिल्याने मुलांची तंत्रज्ञान क्षमता देखील विकसीत होते, असे उद्गार महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी काढले.

आज भाईंदर येथे महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने डिजिटल शाळा अभियान राज्यस्तरीय प्रेरणा सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी राज्यपाल बोलत होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे शिक्षण व क्रीडामंत्री विनोद तावडे, खासदार विनय सहस्त्रबुध्दे, विश्वस्त अरविंद रेगे, शिक्षण सचिव नंदकुमार, कोकण विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, हर्षल विभांडीक आदी उपस्थित होते.

राज्यपाल म्हणाले की, हर्षल विभांडीक यांनी सुरू केलेले हे काम पाहून मी प्रभावित झालो आहे. विभांडीकने महाराष्ट्रात येऊन ब्रेन ड्रेन ऐवजी ब्रेन गेन काम सुरु केले आहे. डिजिटल शाळेचा उपक्रम हा चांगला उपक्रम आहे. ग्रामपंचायतीला देण्यात येणाऱ्या प्रत्यक्ष निधीतून महाराष्ट्रातील गावे विकसित होत आहेत. मातृभाषेच्या शिक्षणामुळे मुलांची आकलनशक्ती वाढली आहे. आदिवासी भागात डिजिटल शाळा करण्याबरोबरच आरोग्याची काळजी, कुपोषणमुक्ती, शाळा सोडण्याचे प्रमाण कमी करण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. डिजिटल शाळा हा उपक्रम मी दत्तक घेतलेल्या शाळात ही राबविण्यात यावा.

डिजिटल शाळा हे अभियान प्रधानमंत्र्यांच्या डिजिटल इंडियासाठी महत्त्वाचा सहभाग देणारे अभियान आहे. मी ज्या वेळेला पंतप्रधानांना भेटेन तेव्हा डिजिटल शाळा हे अभियान संपूर्ण देशात राबविण्याची विनंती करेन, असे राज्यपाल यांनी सांगितले.

शिक्षणमंत्री श्री. तावडे म्हणाले की, सामान्य माणसाला काम करण्याची इच्छा असते परंतू सक्षम नेतृत्व हवे असते. डिजिटल शाळामध्ये सामाजिक सहभाग वाढविण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. इंग्रजी शाळेतील 40 टक्के विद्यार्थी आता जिल्हा परिषद शाळेकडे वळत आहेत. डिजिटल शाळेचा प्रयोग म्हणजे ‘ओन युवर स्कूल’ असा प्रयोग आहे. डिजिटल शाळेचा दुरुपयोग होणार नाही त्यासाठी कार्यपद्धती निश्चित केली पाहिजे. बदलत्या काळात अधिकाधिक शाळा डिजिटल होतील यासाठी शिक्षण विभाग महत्त्वाची भूमिका बजावेल.

खासदार विनय सहस्त्रबुध्दे यांनी या उपक्रमाची माहिती दिली. शिक्षण सचिव नंदकुमार यांनी समयोचित भाषण केले. हर्षल विभांडीक यांनी डिजिटल इंडिया ते न्यू इंडिया हा प्रवास असल्याचे यावेळी सांगितले. यावेळी डिजिटल शाळा उपक्रमात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सर्वश्री ओमप्रकाश देशमुख, चंद्रकांत पुलकुंडवार, किशोर राजे निंबाळकर, मोहन देसले, उल्हास नारद, मीना यादव, अशोक पाटील आदींचा सत्कार करण्यात आला.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result