महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर चारा छावण्यांच्या माध्यमातून जनावरांची सोय - पालकमंत्री पंकजा मुंडे शनिवार, ११ मे, २०१९


बीड :
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील जनावरांच्या चारा व पाण्याची सोय चारा छावण्यांच्या माध्यमातून राज्य शासनाने केली असून जिल्हयातील काही चारा छावण्या अतिशय चांगले काम करत आहेत, असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

दुष्काळ दौऱ्यासाठी जिल्हयातील विविध गावांना भेटी दरम्यान पालकमंत्री श्रीमती मुंडे यांनी आज गेवराई तालुक्यातील मादळमोहि येथील चारा छावणीस भेट दिली याप्रसंगी त्या बोलत होत्या. चारा छावणीतील पाहणी करुन आणि तेथे करण्यात आलेली चारा व पाण्याची व्यवस्था पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी चारा छावणीतील जनावरांसाठी मोफत पाणी योजनेचा त्यांनी शुभारंभ केला. सदर मोफत पाणी व्यवस्था बळीराम (बापू) रसाळ यांनी केली आहे. याप्रसंगी त्यांच्यासोबत आ. लक्ष्मण पवार उपस्थित होते.

यावेळी पुढे त्या म्हणाल्या, राज्य शासन दुष्काळ व पाणी टंचाईमध्ये प्रत्येकाला पाणी मिळाव यासाठी व्यवस्था करत आहे. माणसांची व जनावरांची काळजी घेतली आहे. यावेळी येथील चारा छावणीमध्ये मोफत पाणी पुरवून जनावरांची सेवा करण्याची व्रत छावणी चालकांनी घेतले असल्याने त्यांच्या या चांगल्या कामाचे मी अभिनंदन करते. जिल्हयातील चारा छावण्यांची संख्या ८०० वर पोहचली असून छावण्यांमधील जनावरांची संख्या बऱ्याच ठिकाणी ४०० ते ५०० आहे. अनेक ठिकाणी चांगले काम होत असून काही ठिकाणी चूकीचे काही करत घडत असल्यास त्याला सुधारण्यात यावे असे श्रीमती मुंडे म्हणाल्या.

यानंतर त्यांनी मण्यारवाडी येथील चारा छावणीस भेट दिली. पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दोन दिवस सुरु असलेल्या दुष्काळ पाहणी दौऱ्यामध्ये जिल्हयातील विविध तालुक्यांच्या गावांना व तांड्याना भेटी दिल्या. यादरम्यान त्यांनी पाणी टंचाई बाबत जनतेचे म्हनने ऐकून घेतले व प्रशासनास आवश्यक त्या सुचना केल्या. त्यांनी टँकरद्वारे पाणी पुरवठा विहिरी व बोर अधिग्रहन आदींबाबत उपाययोजनांची माहिती घेतली तसेच जिल्ह्यातील चारा छावण्या तेथील व्यवस्था व पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप अंतर्गत सुरु असलेल्या कामावर पालकमंत्री पंकजा मुंडें यांनी श्रमदानही केले होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result