महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
आपत्तीच्यावेळी शासनाच्या सर्व यंत्रणांनी सतर्क राहून उपाययोजना कराव्यात- डॉ. दीपक म्हैसेकर शुक्रवार, ०३ मे, २०१९


विभागातील जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपा आयुक्त, अप्पर जिल्हाधिकारी यांची उपस्थिती

पुणे :
विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी मान्सून पूर्व आढावा बैठकी घेवून संभावित आपत्ती निवारणासाठी आपत्ती निवारण आराखडा तयार करावा. तसेच प्रत्येक विभागांनी आपली यंत्रणा सतर्क ठेवून आपत्ती कोसळल्यास पिडीतांना तातडीने मदत पोहोचविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज दिल्या.

येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली मान्सूनपूर्व आढावा बैठक पार पडली. त्यावेळी डॉ. म्हैसेकर बोलत होते. यावेळी साताऱ्याच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई, सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी, जिल्हा परिषद सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारूड, साताऱ्याचे कैलास शिंदे, कोल्हापूरचे अमन मित्तल, सांगलीचे प्रभारी विक्रांत बगाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता एस. एस. साळुंखे, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त दीपक तावरे, कोल्हापूरचे डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, उपायुक्त (महसूल) प्रताप जाधव, उपायुक्त (सामान्य प्रशासन) संजयसिंह चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

डॉ. म्हैसेकर म्हणाले, येणाऱ्या मान्सूनच्यापूर्वी सर्व विभागांनी आपल्या स्तरावर मान्सून पूर्व आढावा बैठका घेवून संभाव्य आपत्तीला तोंड देण्यासाठी आपत्ती निवारण आराखडा तयार ठेवावा. प्रत्येक जिल्ह्यात चोवीस तास आपत्ती निवारण कक्षाची स्थापना करावी. या कक्षात कार्यरत असणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना योग्य प्रकारे प्रशिक्षण द्यावे. विभागातील नदीच्या काठावरील सर्व गावे आणि शहरांनी आपल्या पूर रेषेची योग्य प्रकारे आखणी करावी. कोल्हापूर आणि सांगली या दोन शहरांना वारंवार पूराचा सामना करावा लागतो, या दोन्ही महानगरपालिकांनी विशेष दक्षता घ्यावी.

पूरस्थितीचा सामना करण्याबरोबरच या कालावधीत साथीचे आजार पसरणार नाहीत, याची काळजी घ्यावी. शहरातील नाला सफाई प्राधान्याने करून घ्यावी, तसेच सांडपाण्याचे मेन होल व्यवस्थित बंद करून घ्यावेत, तसेच सफाई कर्मचाऱ्यांना पावसाळ्यात काम करण्यासाठी गमबूट, रेनकोट, हॅण्ड ग्लोज यासारख्या सुरक्षेच्या साधनांचा पुरवठा करण्याच्या सूचना डॉ. म्हैसेकर यांनी दिल्या.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result