महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
मतदानाचे दिवशी मतदान केंद्रापासून २०० मिटरच्या आत कोणताही मंडप उभारण्यास बंदी शुक्रवार, १५ मार्च, २०१९

बुलडाणा : भारत निवडणूक आयोगाने सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2019 चा कार्यक्रम जाहीर केला आहे. तसेच आदर्श आचारसंहीता लागू केली आहे. तरी आचारसंहिता कालावधीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राहणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यातील मतदानाचे दिवशी मतदान केंद्रापासून 200 मिटरच्या आत कोणताही मंडप उभारण्यात येऊ नये. तसेच जेथे एकाच मतदान केंद्राच्या ठिकाणी किंवा त्याच्या जागेत एका पेक्षा अधिक मतदान केंद्र उभारण्यात आली असतील, तेथे अशा मतदान केंद्राच्या गटांसाठी त्या जागेच्या 200 मिटर अंतरापलीकडे उमेदवारांचा केवळ एकच मंडप असावा. 

तसेच सदर मंडप मतदान केंद्र, धार्मिक स्थळे, दवाखाने आणि शैक्षणिक संस्था यांच्या पासून 200 मिटरच्या आत नसावा, उमेदवाराला ज्या ठिकाणी मंडप उभारावयाचा त्या ठिकाणी दोन व्यक्तींचे  संरक्षण करण्यासाठी छत्रीचा किंवा ताडपत्रीचा अथवा कापडाच्या तुकडयाचा बनविलेला असेल व त्यात केवळ एक टेबल(मेज) व 2 खुर्च्या असतील.  मंडपामध्ये उमेदवाराच्या पक्षाचे नावनिवडणूक चिन्ह दर्शविणारा केवळ 1 बॅनर (3X41 1/2) फुटाचा लावता येईल. तथापी एकाच इमारतीमध्ये दोन मतदान केंदे उभारण्यात आली असल्यास दोन मतदान मंडपही उभारता येतील. ज्या उमेदवाराला असे मंडप उभारावयाचे असतील, अशा प्रत्येक उमेदवाराने त्याला या मतदान केंद्रावर मंडप उभारावयाचे आहेत. त्या मतदान केंद्राचे नाव, त्याचे अनुक्रमांक बाबतची लेखी माहिती निवडणूक अधिकाऱ्याला आगाऊ कळविण्यात यावी. सदर मंडप उभारतांना स्थानिक प्राधिकरणाकडून लेखी परवानगी घेतली पाहीजे. मतदारांना मतदान यादीतील अनुक्रमांक देण्याच्या एकमेव प्रयोजना करीता केवळ या मंडपाचा वापर करण्यात आला पाहीजे. अशा मंडपामध्ये कोणत्याही परिस्थितीत गर्दी करण्यास मुभा असणार नाही. 

मतदान केंद्रापासून मत देऊन बाहेर पडलेल्या व्यक्तीस मंडपात येण्याची मुभा असणार नाही. मंडप संभाळणाऱ्या व्यक्तींनी मतदान केंद्राकडे जाणाऱ्या मतदारांच्या मार्गात कोणताही अडथळा निर्माण करता कामा नये किंवा त्यांना दुसऱ्या उमेदवारांच्या मंडपात जाण्यास प्रतिबंध करता कामा नये. कोणत्याही व्यक्तीस मतदान केंद्राच्या 100 मिटरच्या आतील भागामध्ये आणि मतदान केंद्राचे ठिकाणी किंवा जवळपास जमाव करता येणार नाही. मतदारावर मतदान करण्यास किंवा मतदान न करण्यास दबाव आणू नये. तसेच मतदानाचे दिवशी उमेदवारांचे प्रचार चिन्ह प्रदर्शित करु नये. मतदान केंद्रात सेल्युलर फोनकॉडलेस दूरध्वनी, बिनतारी संच नेण्यास किंवा त्याचा वापर करण्यास बंदी  आहे. अन्यथा फौजदारी प्रक्रीया संहीता  कलम 144 (1) आदेशान्वये जिल्ह्यात उपरोक्त नियम लागू करण्यात आले आहेत. सदर आदेश संपुर्ण जिल्ह्याकरीता   दि. 27 मे 2019 चे मध्यरात्री 24 वाजेपर्यत लागू राहणार आहे.या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे   निदर्शनास आल्यास    भारतीय दंड संहीता 1860 चे कलम 188 नुसार कार्यवाही करण्यात येईल, असे  जिल्हादंडाधिकारी डॉ निरूपमा डांगे यांनी कळविले आहे. 

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result