महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
धुळे जिल्ह्यात 16 लाख 36 हजार 234 मतदार- राहुल रेखावार मंगळवार, १२ मार्च, २०१९

 


धुळे :
 भारत निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू केली असून 27 मे 2019 पर्यंत आचारसंहिता लागू राहील. लोकसभेच्या 2- धुळे मतदारसंघासाठी 2 एप्रिल 2019 रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिध्द करण्यात येईल, तर 29 एप्रिल 2019 रोजी मतदान होईल. धुळे जिल्ह्यात 16 लाख 36 हजार 234 मतदार असून 1646 मतदान केंद्रे राहतील, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी आज दिली.

 

जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात लोकसभा निवडणूक 2019 च्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी श्री. रेखावार बोलत होते. यावेळी पोलिस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. राजु भुजबळ, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रमोद भामरे, उपजिल्हाधिकारी मधुमती सरदेसाई, भागवत डोईफोडे, सुरेखा चव्हाण (भूसंपादन), गोविंद दाणेज (रोहयो), उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे (धुळे), डॉ. विक्रम बांदल (शिरपूर), मालेगाव बाह्यचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गणेश मिसाळ आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी धुळे लोकसभा निवडणूक कार्यक्रमाची रुपरेषा सादर करताना सांगितले की, मंगळवार 2 एप्रिल, 2019 रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिध्द करण्यात येईल. मंगळवार 9 एप्रिल 2019 हा नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक राहील. बुधवार 10 एप्रिल 2019 रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात येईल. शुक्रवार 12 एप्रिल 2019 रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक राहील. सोमवार 29 एप्रिल 2019 रोजी मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार असून झालेल्या मतदानाची मतमोजणी ही गुरुवार 23 मे, 2019 रोजी होणार आहे.

 

धुळे लोकसभा मतदारसंघात धुळे शहर, धुळे ग्रामीण, शिंदखेडा, मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य, बागलाण या विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून मतदारसंख्या 9 लाख 78 हजार 435 पुरुष, तर 8 लाख 95 हजार 857 स्त्री मतदारसंख्या आहे. इतर मतदारांची संख्या 18 आहे. एकूण 18 लाख 74 हजार 310 मतदार आहेत. सैन्य दलातील मतदारांची संख्या 2923 आहे. त्यांच्यासाठी पोस्टल बॅलेटऐवजी इलेक्ट्रॉनिक पोस्टल बॅलेट सिस्टिमचा वापर करण्यात येईल.

 

या निवडणुकीसाठी विविध 21 प्रकारचे पथक गठित करण्यात येणार आहेत. त्यासाठी मनुष्यबळाची उपलब्धता करण्यात आली आहे. निवडणूक कालावधीत बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. केंद्रीय निमलष्करी दलाच्या 4 तुकड्या तैनात करण्यात येतील. या निवडणुकीसाठी 3728 बॅलेट युनिट, 2129 कंट्रोल युनिट, 2311 व्हीव्हीपॅट मशीन उपलब्ध झाले आहेत.

 

मागील लोकसभा निवडणूक प्रक्रियेच्या तुलनेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती देताना जिल्हाधिकारी श्री.रेखावार म्हणाले, आदर्श आचारसंहितेवर नियंत्रण ठेवण्यासाठी C Vigil या मोबाईल ॲपचा वापर केला जाणार आहे. नागरिकांना एखाद्या ठिकाणी आचारसंहितेचा भंग होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्या प्रसंगाचे या ॲपमध्ये छायाचित्र अथवा व्हीडीओ काढून तक्रार नोंदविता येईल. त्याच्यावर 100 मिनिटांत कार्यवाही पूर्ण करावयाची आहे. दिव्यांगांना मतदार नोंदणी करणे, मतदान केंद्राचा शोध घेणे, व्हील चेअरची मागणी नोंदविणे आदी सोयी उपलब्ध करुन घेण्यासाठी PwD App या ॲपचा उपयोग होईल, असेही त्यांनी सांगितले.

 

लोकसभा निवडणूक 2019 ची प्रक्रिया निर्भय वातावरणात व पारदर्शीपणे पार पाडण्याची जिल्हा प्रशासनासह प्रसारमाध्यमांची सामूहिक जबाबदारी असून पेड न्यूज व जाहिरातीच्या प्रमाणिकरणासाठी जिल्हा प्रशासनाने माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती (एम.सी.एम.सी.) समिती स्थापन केली आहे.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result