महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी साधला अधिकाऱ्यांशी सुसंवाद बुधवार, ०६ डिसेंबर, २०१७
सांगली : मला सांगा... तुमच्यापैकी किती जण दिवसातील काही वेळ स्वतःसाठी देतात, किती जण आपल्या पत्नीचे विचार शांतपणे ऐकून घेतात, किती जण सामाजिक कार्य करतात, किती जण घरी एकत्र जेवण घेतात, किती जण आपल्या मुला-बाळांना विश्वासात घेतात आणि विश्वास देतात... एकामागून प्रश्नांची सरबत्ती होत होती. प्रश्न विचारणारे ना कोणी अध्यात्मिक गुरू होते की ना मानसोपचार तज्ज्ञ. तर ते होते खुद्द सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री चंद्रकांत पाटील....

स्थळ होतं शासकीय विश्रामगृह आणि निमित्त होतं सांगली जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंत्यांसमवेत आढावा बैठकीचं. बैठकीचे स्वरूप कुठल्याही पद्धतीने शासकीय नव्हते. स्वागतासाठी न पुष्पगुच्छ, ना पुस्तक.. केवळ मनापासून नमस्कार. मंत्रीमहोदयांनी आपल्या मार्गदर्शनाची सुरवातच मुळी आपण सर्व जण आज कुटुंब म्हणून एकत्र आलो आहोत, या वाक्याने केली. तुमच्या अडचणी, समस्या समजावून घ्यायला आलोय, चांगले काम करणाऱ्यांच्या पाठिशी नेहमी आहे, हा विश्वास द्यायला आलो आहे, हे सांगत त्यांनी अधिकाऱ्यांच्या मनाला सुखद धक्का दिला. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, आमदार विलासराव जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.

आज कुठलेही दडपण न घेता, उपस्थित अधिकाऱ्यांनी आपल्या सूचना, तक्रारी, अडचणी मांडा, असा विश्वास त्यांनी दिला. हे सर्व प्रश्न विचारताना त्यांचे उत्तर सर्वांकडून एकच आले. मानसिक समाधान आणि समाजाप्रती असलेले उत्तरदायित्त्व. नेमका हाच धागा पकडून मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दादा रूपानं अधिकाऱ्यांकडून असलेल्या अपेक्षा व्यक्त केल्या.

कोणत्याही मोठ्या गोष्टीचा पाया, सुरुवात छोट्या बाबींनी होते. त्यातून आत्मिक समाधान मिळते. हे समाधान कामातून मिळवा. समाधानाच्या अंतर्लहरी चांगले काम करण्याच्या प्रेरणा देतात. नवी उमेद देतात. म्हणूनच समाजाप्रती असणाऱ्या आपल्या उत्तरदायित्त्वाचा विचार करा. प्रामाणिकपणे काम करा. आपल्या पत्नीप्रमाणे इतरांचेही विचार ऐकून घ्या. आपल्या शिक्षणाच्या अधिकाधिक चांगल्या वापराची झलक आपल्या दर्जेदार कामातून दिसू दे. नव्या नव्या चांगल्या संकल्पना मांडा, स्वीकारा आणि अंमलात आणा, मुलाबाळांना जसा विश्वास देता, तसा आपल्या सहकाऱ्यांना विश्वास द्या, हा मंत्र त्यांनी त्यांच्या कुटुंबाला दिला.

चांगले काम करणाऱ्यांना बक्षीस देऊन प्रोत्साहन देणार आहे, असे स्पष्ट करताना सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, मात्र, रस्ता दुरूस्ती, खड्डे दुरूस्तीबाबत गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक, महाविद्यालयीन तरूणी, सामाजिक कार्यकर्ते आणि संबंधित सरपंच अशा 5 व्यक्तिंचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. अशा प्रत्येक जिल्ह्यातील 50 अधिकाऱ्यांना आपण स्वखर्चातून भेटवस्तू देणार असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.

खड्डेमुक्तीसाठी मंत्रालयात वॉररूम सुरू केली आहे. आठ तासाच्या तीन पाळ्यांमध्ये काम सुरू आहे. या वॉररुमला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन समाधान व्यक्त केले आहे. तसेच, वेबिनारच्या माध्यमातून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय लोकांशी संवाद साधला आहे, असे सांगून मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, आतापर्यंत आपण सांगलीसह 30 जिल्ह्यांना भेट दिली आहे. गेल्या तीन वर्षात 2 हजार जणांना बढत्या दिल्या आहेत. मात्र, चुकीचे वागणाऱ्यांवर कडक कारवाई करत, 200 जणांना निलंबितही केले आहे. मात्र, आजची बैठक ही केवळ कर्मचाऱ्यांशी सुसंवाद साधण्यासाठी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

अधीक्षक अभियंता एस. एस. साळुंखे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पश्चिम विभाग आणि मिरज विभागाच्या कामांचा आढावा यावेळी घेतला. यावेळी कार्यकारी अभियंता पृथ्वीराज चव्हाण आणि डी. एस. जाधव, सर्व उपअभियंता, शाखा अभियंता व अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी भाऊसाहेब साळुंखे, पूजा बारटक्के, अजयकुमार ठोंबरे, एस. व्ही. बारवेकर, एस. बी. सोलनकर, शिवानंद बोलीशेट्टी, हेमंत गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result