महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी योग्य नियोजन करावे - पंकजा मुंडे गुरुवार, ३१ जानेवारी, २०१९


बीड : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाने योग्य नियोजन केले असून पुढील दोन-तीन महिन्याचा काळ खूप कठीण असला तरी पिण्यासाठी पाणी जनावरांना चारा आणि लोकांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याच्या सूचना पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बीड जिल्हा दुष्काळ, चारा छावणीबाबत आढावा बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. या बैठकीस खासदार प्रितमताई मुंडे, जिल्हाधिकारी एम. डी. सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, अपर जिल्हाधिकारी बी.एम.कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज नीला यांची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, जिल्ह्यासाठी येणाऱ्या तीन चार महिन्याचा कालावधी कठीण असून या कालावधीतील टंचाई परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत. नागरिकांच्या हाताला काम उपलब्ध होण्यासाठी नरेगाच्या माध्यमातून कामे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. तसेच नागरिकांना व जनावरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्ह्यातील गावस्तरावरील सर्व स्त्रोताची अद्यावत माहिती तयार करण्यात आली आहे. तसेच जनावरांना चारा मिळावा यासाठी जिल्ह्यात उपलब्ध असलेला साठा व पुढील कालावधीसाठी लागणार चारा याचे योग्य नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील नागरिकांसाठी येणाऱ्या काळात पाण्याचा प्रश्न गंभीर होणार असल्याने पाण्याचा वापर करताना नागरिकांनी अत्यंत सावधपणे व काटकसरीने वापरले पाहिजे. लोकांमध्ये याबाबत जनजागृती निर्माण केली पाहिजे. उपयुक्त असलेला पाण्याचा साठा योग्य रीतीने वापरला पाहिजे. त्याचबरोबर जनावरांच्या चाऱ्याचा विषय जिल्हा प्रशासनामार्फत चांगल्या प्रकारे हाताळण्यात येत असून गाळपेरा व विविध माध्यमातून चाऱ्याची उपलब्धता होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. चारा टंचाई कमी होण्यासाठी अधिकाऱ्यांनी या कामाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यातील नागरिकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कामे हाती घ्यावी. प्रत्येक गावातील मजूरांना काम उपलब्ध होण्यासाठी प्रत्येक गावामध्ये कमीत कमी ५ विहिंरीची कामे झाली पाहिजेत. तसेच पालकमंत्री पाणंद रस्ते, शोष खड्डे आदी कामांना विशेष प्राधान्य देण्याची गरज आहे. रोहयोच्या माध्यमातून शोष खड्डे, खड्डे यासारखी कामे सुरु केल्यास मजूरांच्या हाताला काम मिळेल व शोष खड्यामुळे पावसाळ्यात या खड्यामध्ये पाणी साठा झाल्यास त्याचा फायदा होणार आहे. जिल्ह्यातील रस्त्याच्या दुतर्फा रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शोष खड्डे करावे, या खड्डयामध्ये येणाऱ्या पावसाळ्यामध्ये वृक्षरोपण करण्यास मदत होईल, असे सांगून जिल्ह्यातील सर्व नागरिक, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एक दिवस श्रमदान करावे, या श्रमदानामध्ये मी ही सहभाग नोंदवणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी शेतकरी आत्महत्या, महिलांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने त्यांना शेळीपालन, कुक्कुट पालन, मेंढी पालन सारख्या योजनांचा लाभ द्यावा, आष्टी भागातील गावांना सीना, मेहकरी धरणातून पाणी उपलब्ध करून देण्यासाठी तसा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली, यामध्ये जिल्ह्यातील पीक परिस्थिती, पाणी टंचाई व उपाययोजना, चारा टंचाई व उपाययोजना, शेतकरी आत्महत्या, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना याबाबत पालकमंत्री महोदयांना सविस्तर माहिती दिली.

या बैठकीस जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती युद्धाजित पंडित, उपविभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी, गणेश निऱ्हाळी, प्रभोदय मुळे, उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांच्यासह सबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result