महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
विविध जाती धर्माच्या लोकांनी रायगड जिल्ह्याची सांस्कृतिक परंपरा जोपासली - पालकमंत्री रवींद्र चव्हाण बुधवार, ०१ मे, २०१९


महाराष्ट्र दिनानिमित्त पोलीस परेड मैदान येथे ध्वजारोहण

रायगड-अलिबाग :
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५९ व्या वर्धापनदिनानिमित्त आज सकाळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पोलीस परेड मैदान येथे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर आदींची उपस्थिती होती.

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी यावेळी जागतिक कामगार दिनाच्या समस्त कामगार वर्गाला शुभेच्छाही दिल्या. आगरी, कोळी, आदिवासी समाज यांनी येथील सांस्कृतिक परंपरा आणि वैशिष्ट्य टिकवून ठेवले आहे. विविध जाती-धर्माच्या लोकांचा सलोखा आणि एकूणच स्नेहाचे आणि शांततामय वातावरण असलेला हा रायगड जिल्हा म्हणजे एक वैशिष्ट्यपूर्ण जिल्हा आहे असे आपल्या शुभेच्छापर भाषणात ते म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेला रायगड किल्ला हा महाराष्ट्राचा मानबिंदू या जिल्ह्यात आहे. केवळ गड किल्ले नाही तर या जिल्ह्याला निसर्गाने मुक्तहस्ताने वरदान दिले आहे असे सांगून पालकमंत्री म्हणाले की, येथील विस्तीर्ण समुद्र किनारे, बहरलेली जंगले, नयनरम्य धबधबे, थंड हवेची ठिकाणे, प्राचीन धार्मिक स्थळे यामुळे ही भूमी खऱ्या अर्थाने कोकणचीच राजधानी म्हटले तर वावगे ठरणार नाही. घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे दिलेला चवदार तळ्याचा ऐतिहासिक लढा म्हणजे या भूमीतून झालेली सामाजिक न्यायाची अभूतपूर्व क्रांती होती. कान्होजी आंग्रे, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, महान विचारवंत विनोबा भावे, सीडी देशमुख यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे असेही ते म्हणाले.

ध्वजारोहणानंतर पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे ज्येष्ठ नागरिक, स्वातंत्र्यसैनिक, विद्यार्थी, कर्मचारी यांना भेटले आणि त्यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पोलीस दलाने बहारदार संचलनही केले.


जिल्हाधिकारी कार्यालयातही ध्वजारोहण
तत्पूर्वी सकाळी ७ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे देखील जिल्हाधिकारी डॉ विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी भरत शितोळे, निवासी उप जिल्हाधिकारी डॉ पद्मश्री बैनाडे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result