महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
तरुण पिढीने निष्ठा आणि समर्पणवृत्तीने कार्य करावे - पालकमंत्री पंकजा मुंडे रविवार, ०७ जानेवारी, २०१८
बीड : तरुण पिढीने आपल्या यशस्वी जीवनासाठी निष्ठा आणि समर्पणवृत्तीने सकारात्मकतापूर्वक प्रयत्नशील रहावे, असे आवाहन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी येथे केले. जवाहर शिक्षण संस्थेचे वैद्यनाथ कॉलेज, परळी वैजनाथ येथे विद्यापीठ अनुदान आयोगातंर्गत अकराव्या योजनेच्या अनुदानातून बांधण्यात आलेल्या मुलींचे अद्ययावत वसतीगृह इमारत, बंदिस्त क्रीडा संकुल, लोकनेते गोपीनाथराव मुंडे ॲकॅडमीच्या उद्घाटन सोहळा आज पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जुगलकिशोर लोहिया, प्रमुख पाहुणे प्रा. आनंद मुन्शी, प्रा. विष्णु घुगे, जवाहर शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष फुलचंद कराड, डॉ. दे.घ. मुंडे, सचिव दत्ताप्पा इटके आदी उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाल्या की, संयम, समर्पण, संवाद, आव्हाने स्वीकारण्याची तयारी, चांगल्या बदलासाठी त्याग करण्याची वृत्ती या गोष्टी आत्मसात केल्या म्हणजे माणूस त्याची स्वप्ने निश्चित पूर्ण करु शकतो. कोणत्याही परिस्थितीत खचून न जाता आपल्या क्षमतांवर विश्वास ठेऊन पुढे जात राहण्याची खंबीर मानसिकता तरुण पिढीने जाणीवपूर्वक जोपासण्याची गरज आहे. आज प्रगत तंत्रज्ञान, मोबाईलचा वाढता वापर हा आपल्या शारीरिक, मानसिक आरोग्याला घातक ठरणारा आहे. या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर हा अत्यंत गरजेच्यावेळी, आवश्यक त्या योग्य प्रमाणात करण्याची चांगली सवय विद्यार्थ्यांनी ठेवली पाहिजे.

श्रीमती मुंडे पुढे म्हणाल्या की, वैद्यनाथ महाविद्यालयाचे 64 विद्यार्थी संरक्षण सेवेत आहे ही अत्यंत अभिमानास्पद बाब असून याच पद्धतीने आपल्या जिल्ह्याचा नावलौकिक वाढवण्याच्या व्यापक उद्दिष्टांने विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पहावीत, ती यशस्वी करण्यासाठी सकारात्मकता पूर्वक प्रयत्न करावे.

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. आनंद मुन्शी यांच्यासह, प्रा.विष्णू घुगे, जुगलकिशोर लोहिया, फुलचंतद कराड, दत्ताप्पा इटके यांची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. आर. के. इप्पर यांनी केले तर आभार उपप्राचार्य डॉ. जे. व्ही. जगतकर यांनी मानले या कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, पत्रकार, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result