महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
शेतकऱ्यांवर कर्जमाफीची वेळच येऊ नये यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील - पालकमंत्री शिंदे बुधवार, १८ ऑक्टोंबर, २०१७
शेतकऱ्यांना  दिवाळी भेट; कर्जमाफीच्या प्रमाणपत्रांचे वाटप

ठाणे :
शेतकऱ्यांवर कर्जमाफीची वेळच येऊ नये यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून त्यादृष्टीने राज्य शासन अनेक उपाय योजना राबवित असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी येथे केले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलेले कर्जमुक्ती वचन पूर्ण करू शकलो याचा आनंद असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. शेतकऱ्यांच्या दृष्टीने कर्जमाफीचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे त्यांनी आभार मानले.

शेतकऱ्यांना दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करत दिवाळीच्या मुहूर्तावर बुधवारी पालकमंत्री श्री.शिंदे यांच्या हस्ते ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषीकर्ज माफीच्या प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी खासदार राजन विचारे, डॉ.श्रीकांत शिंदे, कपिल पाटील, आमदार शांताराम मोरे, सुभाष भोईर, रवींद्र फाटक, संजय केळकर, नरेंद्र पवार, जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार, आदी उपस्थित होते.

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी पाण्याचा शाश्वत पुरवठा आवश्यक असून त्यासाठी रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती देण्यासोबतच शहरांमध्ये शेतमालाला असलेली मागणी लक्षात घेऊन अधिकाधिक आठवडी बाजार सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्री शिंदे म्हणाले. ठाणे जिल्ह्यामध्ये असलेल्या तलाव आणि बंधाऱ्यांमधला गाळ काढण्याचे काम देखील चांगले झाले असून त्यासाठी पुढाकार घेणारे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे आणि जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांचे श्री. शिंदे यांनी कौतुक केले.

राज्य शासनाने राबविलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील एकूण २०७ विकास सहकारी संस्था आणि २० राष्ट्रीयकृत बँका पात्र ठरल्या असून त्यांचे अनुक्रमे २१ हजार ४२५ आणि १ हजार ५१६ लाभार्थी आहेत. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जून २०१७ पासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची सुरुवात झाली असून लाभार्थींच्या पहिल्या यादीतील ३७ लाभार्थी शेतकऱ्यांचा पालकमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी लाभार्थ्यांना कृषी कर्जमाफीच्या प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result