महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
सहकारी संस्थांनी सामान्य माणसाची गरज लक्षात घेऊन काम करावे - सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील सोमवार, २३ ऑक्टोंबर, २०१७
सांगली : सहकारी संस्थांनी सामान्य माणसाची गरज लक्षात घेऊन काम करावे, असे प्रतिपादन सिक्कीम राज्याचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी आज येथे केले.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक व गुलाबराव पाटील प्रतिष्ठानच्या वतीने सांगली येथील विष्णुदास भावे नाट्यमंदीर येथे सहकार तपस्वी गुलाबराव पाटील पुरस्कार वितरण समारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री सुभाष देशमुख, आमदार जयंतराव पाटील, आमदार मोहनराव कदम, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील, गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर, जिल्हा विशेष लेखापरिक्षक किरण पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करून राज्यपाल श्रीनिवास पाटील म्हणाले, सामान्य माणसाला दिलासा मिळण्यासाठी शेळीपालन, मत्स्यपालन, दुग्धव्यवसाय सुरू करावेत. सामान्य माणसांची नाळ ओळखून त्याचे म्हणणे ऐकून काम करावे. सहकारी संस्थांनी चांगल्या योजना आखाव्यात, त्यांची अंमलबजावणी करावी व तिच्या यशस्वीतेनंतर कौतुक करावे.

पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, बंद पडलेल्या सहकारी संस्थाना जिल्हा मध्यवर्ती बँकेने मदत करावी. त्यांचे भविष्य उज्‍ज्वल करण्यासाठी पुढाकार घ्यावा. प्रत्येक संस्थेने एकतरी व्यवसाय सुरू करावा जेणेकरून तरूणांना रोजगारासाठी दूर जाण्याऐवजी त्यांच्या गावातच रोजगार उपलब्ध होईल. सहकारी संस्थांनी तरूणांना रोजगार मिळण्यासाठी प्रयत्न करावेत. गावातला पैसा गावातच ठेवण्यासाठी प्रयत्न करावा. सहकारी संस्थांनी लोकांचा विश्वास संपादन करावा. व्यवसाय सुरू करणाऱ्या संस्थांना पुरस्कार देण्याची योजना सुरू करावी. सहकारातून महाराष्ट्र समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. कर्जमाफी योजनेंतर्गत कोणताही पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही शेवटी त्यांनी दिली.

यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने जिल्ह्यातील उत्कृष्ट विविध कार्यकारी सेवा सोसायट्या, त्यांचे सचिव, जिल्हा बँक शाखा, त्यांचे अधिकारी व कर्मचारी यांना राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.

प्रास्ताविक सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील यांनी केले, स्वागत पृथ्वीराज पाटील यांनी केले. जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी आभार मानले. सूत्रसंचालन विजयदादा कडणे यांनी केले.

या कार्यक्रमास जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पदाधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result