महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करावे- पंकजा मुंडे शुक्रवार, २१ जुलै, २०१७
बीड : शासनाकडून ग्रामीण भागातील नागरिकांसाठी विविध विकासाच्या योजना राबविल्या जातात. या सर्व योजनांचा लाभ नागरिकांना मिळवून देवून ग्रामीण भागाच्या सर्वांगीन विकासासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

परळी तालुक्यातील लोणी येथील ग्रामपंचायत इमारतीचे लोकार्पण व ग्रामपंचायतीमध्ये बसविण्यात आलेल्या नवीन पाणी फील्टर (RO) प्लॅन्टचे उदघाटन तसेच संत सावता माळी मूर्ती प्रतिष्ठापना श्रीमती मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले, त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला नामदेव आघाव, कल्याण आखाडे, शिवाजी गुटे, जुगलशेट लोहिया, ह.भ.प बापूसाहेब उपळीकर महाराज, दत्ता देशमुख, पंचायत समिती सदस्य भरत सोनवणे, मोहन आचार्य, सरपंच प्रल्हाद शिंदे, बिभिषण फड, रामेश्वर महाराज फड, दिलीप बिडकर यांची उपस्थिती होती.

श्रीमती मुंडे म्हणाल्या की, ग्रामीण भागाच्या विकासाच्या योजनांचा लाभ प्रत्येक नागरिकांना तसेच गावांना झाला पाहिजे. त्या योजनाचा लाभ संबंधितांना मिळाल्यास त्या नागरिकांचा, त्या गावाचा निश्चितच विकास होण्यास मदत होणार आहे. लोणी येथील फील्टर प्लॅन्टमुळे या गावातील नागरिकांना स्वच्छ पाणी पिण्यासाठी मिळणार असल्याने या गावातील नागरिकांना दूषित पाण्यामुळे होणारे आजार कमी होण्यास मदत होणार आहे. गावकऱ्यांनी आपला परिसर स्वच्छ ठेवल्यास त्यांचे आरोग्य चांगले राहणार असल्याने या कामाकडे गावकऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. दाऊतपूर ते लोणी रस्त्यासाठी चार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून लवकरच रस्त्याचे काम हाती घेवून पूर्ण करण्यात येणार आहे. या गावासाठी सभागृह मंजूर करण्यात आले असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.

जिल्ह्यात विविध योजनाच्या माध्यमातून विकासाची कामे करण्यात येत आहेत. मागील दोन वर्षात जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून जलसंधारणाची मोठ्या प्रमाणात कामे झाली असल्याने मागील वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे पाणी साठ्यामध्ये वाढ झाली आहे. त्याचा फायदा सर्व शेतकरी व गावकऱ्यांना झाला आहे. जमिनीत पाणीसाठा वाढल्याने शेतकऱ्यांना चांगला फायदा झाल्याने त्यांच्या उत्पनात वाढ झाल्याचे दिसून आले असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील प्रलंबित असलेली विकासाची कामे येणाऱ्या काळात पूर्ण करण्यासाठी शासनस्तरावरुन प्रयत्न असल्याचे सांगून 2019 पर्यंत परळी तालुक्यासह जिल्ह्यातील सर्व गावे मजबूत व पक्क्या रस्त्यांनी जोडली जातील त्यादृष्टीने प्रयत्न करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result